उष्माघात – Heat Stroke :

उन्हाळ्यात सूर्याच्या उष्णतेमुळे आपल्या शरीरातील तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढल्यानंतर शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होऊन त्यांच्या कार्यामध्ये बिघाड होतो त्यास उष्माघात असे म्हणतात. उन्हाळ्यात सर्वात जास्त त्रास हा उष्माघाताचा होतो. उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले की उष्माघाताचा स्ट्रोक येण्याची शक्यता असते.

शरीराचे तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास शरीरातील प्रथिनांमध्ये उष्णतेने बदल होतो. फॉस्पोलिपीड व लायपोप्रोटीन यामध्ये अस्थिरता निर्माण होते व शरीरातील मेद वितळतात याचा परिणाम मज्जासंस्था व रक्ताभिसरण संस्थेवर प्रत्यक्षरीत्या आघात होतो व त्यांच्या कार्यात अडथळा आल्याने शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांमध्ये खूप मोठ्या प्रमाणातद बदल होतो आणि त्यांचे कार्य थांबू शकते. वेळेत प्रथमोपचार व वैद्यकीय उपचार न मिळाल्यास रुग्णांचा मृत्यूही होऊ शकतो.

उन्हाळ्यात उष्माघातापासून सावध रहा..

उष्माघातामुळे मृत्यु झाल्याच्या अनेक घटना उन्हाळ्यात घडत असतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार दरवर्षी जगात सरासरी 25000 रुग्ण उष्माघाताने मृत्यू पावतात. तर भारतामध्ये सरासरी 1500 ते 2000 पर्यंत रुग्ण दगावतात आणि महाराष्ट्रामध्ये सरासरी 150 ते 200 रुग्णांचा मृत्यू होतो. यासाठीच उष्माघाताची लक्षणे आणि उष्माघात पासून बचाव करण्यासाठीचे उपाय सर्वांना माहीत असणे गरजेचे आहे.

उष्माघाताची ही आहेत लक्षणे :

सुरवातीला थकवा येणे, तहान लागणे, अस्वस्थ वाटणे, डोके दुखणे अशी लक्षणे अचानक होऊ शकतात. ह्या सुरवातीच्या लक्षणांकडे वेळीच उपाय न केल्यास त्यामुळे जीभ कोरडी पडणे, डिहायड्रेशन, रक्तदाब कमी होणे, ह्रदयाची धडधड वाढणे, त्वचा लाल होणे, पायाला गोळे येणे (cramps), आकडी येणे, बेशुद्ध पडणे, चक्कर येणे ही उष्माघातची लक्षणे जाणवतात आणि वेळीच उपचार न मिळाल्यास मृत्यूही येऊ शकतो.

उष्माघात होण्याची कारणे व उष्माघात कोणाला येऊ शकतो..?

1. भर उन्हात काम करण्यामुळे,
2. पुरेसे पाणी न पिण्यामुळे,
3. उन्हाळ्याच्या दिवसात मद्यपान व कॅफीनचे सेवन जास्त केल्यामुळे,
4. दुपारच्या वेळी पुरेसे पाणी न पिता व्यायाम केल्यामुळे,
5. हृदयरोग, फुफुसाचे आजार, यकृताचे आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा किडनीचे आजार असल्यामुळे,
6. नवजात बालके, लहान मुले, गरोदर स्त्रिया, वयोवृद्ध व्यक्तीमध्ये उष्माघात होण्याची जास्त शक्यता असते.

उष्माघातावर असे करतात उपचार – Heat stroke treatment in Marathi :

उष्माघाताच्या रुग्णावर वेळेत उपचार केल्यास तो बरा होऊ शकतो. त्यासाठी त्याला तातडीने प्रथमोपचार व वैद्यकीय उपचार वेळेत मिळणे आवश्यक आहे. तसेच प्रथमोपचाराबाबत लोकांमध्ये आरोग्य जागृती असणे गरजेचे आहे. त्यामुळे ही उपयुक्त माहिती तुमच्या अनेक मित्रांनाही शेअर करा.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

उष्माघातवर खालील प्राथमिक उपाय करावेत :

एखाद्या व्यक्तीमध्ये उष्माघाताची लक्षणे जाणवू लागल्यास काय करावे, कोणते प्रथमोपचार (Sunstroke first aid) करावेत याची माहिती खाली दिली आहे.
• उन्हामध्ये असल्यास त्या व्यक्तीस सावलीमध्ये घेऊन जावे.
• त्याची कपडे सैल करावेत.
• त्याला आडवे झोपवून त्याचे पाय उचलून धरावेत. त्यामुळे हृदय व मेंदूकडे रक्तपुरवठा होईल.
• थंड पाण्याने त्याचे शरीर पुसून घ्यावे.
• त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी थंड पाण्याच्या पिशव्या ठेवाव्यात.
• त्यास थंड पाणी अथवा नारळपाणी किंवा साध्या पाण्यात एक चमचा साखर आणि एक चमचा मीठ टाकून ते पाणी त्या व्यक्तीला द्यावे.
• शरीराचे तापमान कमी येते का ते पाहावे.
• रुग्ण बेशुद्ध असल्यास त्वरीत डॉक्टरांकडे उपचारांसाठी न्यावे.

आणि मुख्य म्हणजे 108 या टोल फ्री नंबरवर फोन करून अॅम्बुलन्स बोलावून घ्यावी व रुग्णास लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये दाखल करावे.

उष्माघातपासून असा करा स्वतःचा बचाव – Heat stroke prevention tips :

उष्माघात होऊ नये म्हणून काळजी कशी घ्यावी याची माहिती व उष्माघाताचे प्रतिबंधात्मक उपाय खाली दिले आहेत.
• उन्हाळ्यात दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.
• फलाहार, फळांचा रस, पालेभाज्या, सॅलेड, ऊसाचा रस यांचा आहारात उपयोग करावा.
• चहा, कॉफी जास्त पिणे टाळा.
• उन्हाळ्यात मद्यपान करणे टाळा.
• उन्हात कष्टाची कामे करणे टाळा. दुपारी 12 ते 4 या वेळात काम बंद ठेवावे.
• तीव्र उन्हात घराबाहेर पडू नका.
• उपाशीपोटी घराबाहेर पडू नका.
• एसी सारख्या एकदम थंड वातावरणातून थेट बाहेर उन्हात जाऊ नका.
• उन्हात घराबाहेर पडताना पाण्याची बाटली, गॉगल, स्कार्प, टोपी, समरकोट किंवा छत्री अशा वस्तू अवश्य जवळ ठेवा.
• उन्हाळ्याच्या दिवसात सैल व सुती कपडे वापरा.
अशाप्रकारे सर्वांनी दक्षता घेतल्यास उष्माघात पासून रक्षण होऊ शकते.