घामोळ्यांचा त्रास आणि घामोळ्यावर उपाय – Heat rashes in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Ghamolya upay in Marathi, summer heat rashes in Marathi

घामोळे येण्याची कारणे व लक्षणे (Heat rash) :

उन्हाळ्याच्या दिवसात होणारा हा एक सामान्य त्वचाविकार आहे. प्रामुख्याने ज्यांना घाम जास्त येतो, अशा व्यक्तींना घामोळ्यांचा त्रास जास्त होतो. घामामुळे आपल्या त्वचेतील घामाच्या ग्रंथी बंद होतात आणि त्यामुळे घामोळ्या येतात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत हा त्रास कोणालाही होऊ शकतो.

घामोळ्या प्रामुख्याने मानेवर, पाठीवर, छातीवर, खांद्यावर, कपाळावर येतात. घमोळ्यामुळे त्वचेला खाज सुटते व शरीरावर लाल रंगाचे बारीक पुरळ ही येतात. त्यामुळे त्वचेचा मुलायमपणा जाऊन ती खरबरीत लागते.

घामोळ्यांचा त्रास होऊ नये म्हणून काय करावे..?

उन्हाळ्यात येणाऱ्या घामामुळे घामोळ्याचा त्रास होत असतो. मात्र योग्य काळजी घेतल्यास घामोळ्या होण्यापासूनच दूर राहता येते. यासाठी खाली घामोळ्यांचा त्रास होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती दिली आहे.

पुरेसे पाणी प्यावे..
उन्हामुळे भरपूर घाम येत असतो. घामावाटे शरीरातील पाणी कमी होत असते. पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशन होऊ शकते त्यामुळे त्वचा कोरडी पडण्याची समस्या होऊ शकते. यासाठी उन्हाळ्यात पुरेसे पाणी पिणे गरजेचे असते. साधारण 8 ते 10 ग्लास पाणी दिवसभरात प्यावे. याशिवाय नारळपाणी, फळांचे ज्यूस, लिंबूपाणी, कोकमचे सरबतही आपण उन्हाळ्यात पिऊ शकता मात्र कोल्ड्रिंक्स वैगेरे पिणे टाळावे.

सुती कपडे वापरा..
उन्हाळ्यात सुती व सैलदार कपडे वापरा. कृत्रिम धाग्याचे कपडे टाळा. कृत्रिम धाग्यामुळे त्वचेला आलेला घाम शोषला जात नाही. त्यामुळे घाम तसाच राहिल्याने त्वचेला रॅश येणे, घामोळ्या हे त्रास होतात. सुती व सैल कपडे उन्हाळ्यात वापरल्याने आलेला घाम शोषला जातो तसेच सैलसर कपडे असल्याने आत हवाही खेळती राहते.

दुपारच्या वेळी उन्हात फिरू नका..
उन्हाळ्यात दुपारच्या वेळी सुर्यकिरणे जास्त प्रखर असकात. त्या प्रखर उन्हामुळे त्वचेवर काळे डाग पडतात, त्वचा कोरडी पडते, घाम जास्त येतो त्यामुळे उन्हाळ्यात दुपारच्या वेळी उन्हात फिरू नये. तसेच दुपारच्या वेळी जास्त श्रमाची कामे आणि व्यायाम करू नये.

आंघोळ करा..
बाहेरून आल्यानंतर थंड पाण्याने आंघोळ करा. उन्हाळ्यात थंड पाण्याने दुपारीसुद्धा आंघोळ करा किंवा थंड पाण्यात भिजवलेला टॉवेलने अंग पुसून घ्यावे. आंघोळ करताना जंतूनाशक साबणाचा वापर करा त्यामुळे त्वचेवरील जिवाणूंची (बॅक्टेरियाची) संख्या आटोक्यात राहील. यामुळे आलेला घाम निघून जाईल व घामोळ्याचा त्रास होणार नाही.

Prickly heat पावडर वापरा..
उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या पाठीला, मानेला, छातीला prickly heat पावडर फवारावी. यामुळे त्वचेला होणारी जळजळ किंवा खाज कमी होते, घामामुळे होणाऱ्या बॅक्टेरियाही कमी होतात आणि घामोळ्यांचा त्रास होत नाही. तसेच कामानिमित्त उन्हाळ्यात घराबाहेर पडताना आपल्या त्वचेवर सनस्क्रीन लोशनही लावावे.

घामोळ्या झाल्यास हे करा..

घामोळ्यांवर जास्त खाजवल्यामुळे इन्फेक्शन झालं नसेल तर त्या काही दिवसांतच गायब होऊन जातात. तीव्र स्वरूपाच्या घामोळ्या मात्र काही आठवड्यापर्यंत त्रास देऊ शकतात. घामोळ्यावर घरगुती उपाय आणि औषधे यांची माहिती खाली दिली आहे.

घामोळे घरगुती उपाय –
कडुनिंबाची पाने बारीक वाटून त्याचा लेप घामोळ्यांच्या ठिकाणी लावावा. यामुळे थंडावा मिळून जळजळ कमी होते व घामोळ्याही कमी होतात. अशाप्रकारच आपण घामोळ्यांच्या ठिकाणी मुलतानी माती, चंदन पावडर, बर्फ किंवा कोरपडीचा गरही लावू शकतो.

कॅलेमाईन लोशन –
खूपच खाज येत असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅलेमाईन लोशनचा वापर करू शकता. यामुळे त्वचेला होणारी जळजळ किंवा खाज कमी होण्यास मदत होते. पुरळात पू होत असेल, सूज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हे उपाय करून घामोळ्यांपासून सुटका करता येईल.

हे सुद्धा वाचा..
उन्हाळ्यात कोणता आहार घ्यावा, काय खावे, काय खाणे टाळावे याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

home remedies for summer heat rashes in Marathi, Heat rashes treatment in Marathi, Home Remedies For Prickly Heat Rash in Marathi.

© कॉपीराईट सुचना -
कृपया ह्या वेबसाईटमधील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. येथील माहिती कॉपी करून आपल्या नावाने प्रसिद्ध किंवा शेअर किंवा Video बनवता येणार नाही.