उन्हाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये ते जाणून घ्या..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

उन्हाळ्याच्या दिवसातील आहार :

उन्हामुळे होणारी अंगाची लाहीलाही, प्रचंड उकाडा, अंगावर येणारा घाम, घस्याला कोरड पडून वारंवार लागणारी तहान यामुळे उन्हाळ्यात सर्वचजण हैराण होतात. उन्हाळ्यात भूकही कमी झालेली असते. पण आहार तर घेतलाच पाहिजे. कारण, सूर्याची उष्णता जसजशी वाढत जाते, तसे आपल्या शरीरातील पाण्याचा अंश कमी होतो. अशक्तपणा, थकवा वाढतो, घामावाटे पोषक द्रव्ये शरीराबाहेर निघून जातात. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराचे संतुलन राखण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे असते.

उन्हाळ्यामध्ये पचनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे आहाराचे योग्य प्रकारे पचन होण्यासाठी पचणास हलका आहार घ्यावा. तसेच घेतलेला आहार सहज पचण्यासाठी 2 ते 3 वेळा थोडा थोडासा घ्यावा. एकाचवेळी भरपेट जेवणे उन्हाळ्यात टाळावे. उन्हाळ्यात कोणता आहार घ्यावा, उन्हाळ्यात काय खावे, काय खाऊ नये याविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात काय खावे..? :

पाणी –
उन्हाळ्यात पुरेसे पाणी प्यावे. कारण उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असते यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक असते. शरीराला पुरेसे पाणी न मिळाल्यास डिहायड्रेशनची स्थिती होऊ शकते यासाठी दिवसभरात पुरेसे म्हणजे 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. उन्हाळ्यात माठात ठेवलेले पाणी प्यावे मात्र फ्रिजमधील थंडगार पाणी पिऊ नये.

आरोग्यदायी पेये –
शरीरातील पाण्याची पूर्तता करण्यासाठी विविध आरोग्यदायी पेये जसे कोकम सरबत, लिंबू सरबत, आवळा सरबत, शहाळाचे पाणी, उसाचा रस, विविध फळांचे रस, ताक, लस्सी, नाचण्याचे अंबिल इ. पेयांचे उन्हाळ्यामध्ये सेवन करणे चांगले असते.

दूध व दुधाचे पदार्थ –
उन्हाळ्यामध्ये दुध, दही, ताक, लस्सी, तुप यांचा वापर आहारामध्ये करावा. विशेषतः हिंग, सैंधव मीठ आणि जिरे घालून ताक आवर्जून प्यावे. यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यास मदत होते.

उन्हाळी फळे –
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये द्राक्षे, टरबूज, कलिंगड, करवंदे, फणस, आंबे, डाळिंब यासारखी उन्हाळ्यात फळे खावीत. अशा रसदार फळांमध्ये अनेक उपयुक्त पोषकघटक म्हणजे व्हिटॅमिन्स, खनिजे, अँटी ऑक्सिडंट आणि फायबर्स असतात.

पालेभाज्या व फळभाज्या –
उन्हाळ्यामध्ये पालेभाज्यांची टंचाई असते. आहारात विविध पालेभाज्यांचा आहारात समावेश असावा. याशिवाय काकडी, गाजर, बीट आणि कांद्याचे कोशिंबीर आहारात ठेवावे.

उन्हाळ्यात काय खाणे टाळावे..? :

मसाला –
उन्हाळ्यामध्ये मसाल्यांचा वापर अत्यंत कमी प्रमाणातच करावा. मुळात मसाले हे उष्ण गुणाचे असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात मसाले अतिप्रमाणात वापरणे टाळावे.

मांसाहार –
उन्हाळ्यामध्ये जाठराग्नि मंद असल्याने पचनास जड असणारे मटण, मासे, अंडी यासारखे मांसाहारी पदार्थ कमीच खावेत. तसेच मांसाहारामध्ये मसाल्यांचा अतिवापर करणे टाळावे.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

मद्यपान –
दारू, मद्य, बिअर, अल्कोहोल हे उष्ण गुणांचे असते. उन्हाळ्यात मद्यपान केल्यास शरीराला शोष पडण्याची शक्यता असते. त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते तसेच उष्माघात होण्याचाही धोका वाढतो. त्यामुळे उन्हाळ्यात मद्यपान करणे टाळावे.

आईस्क्रीम –
उन्हाळ्यात गारवा देणारे आईस्क्रीम वैगेरे थंडपदार्थ खाणे सर्वानाच आवडते. आईस्क्रीम आपण कधितरीचं खावे. उन्हाळा आहे म्हणून दररोज आईस्क्रीम खाणे टाळावे.

कोल्ड्रिंक्स व इतर पेये –
बाजारात असणारी विविध शीतपेये (कोल्ड्रिंक्स) ही उन्हाळ्याच्या दिवसात थंडावा देत असली तरीही ती शरीराला अपायकारकचं असतात. त्यामुळे किडनीचे आरोग्य धोक्यात येते. यासाठी अशा कोल्ड्रिंक्सपासून दूरच राहणे गरजेचे असते. याशिवाय उन्हाळ्यात चहा, कॉफी यासारखी पेयेसुद्धा कमी प्रमाणातचं प्यावीत.