Dr Satish Upalkar’s article about Treatments of Warts in Marathi.

चामखीळ ची कारणे व उपाय याची माहिती Dr Satish Upalkar यांनी येथे दिली आहे.

चामखीळ म्हणजे काय ..?

चामखीळचा त्रास अनेकांना असतो. त्वचेवर चामखीळ होण्यासाठी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (human papillomavirus) कारणीभूत असतो. ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसला HPV व्हायरस असेही म्हणतात. चामखीळला warts असे म्हणतात. चामखीळ हे शरीरासाठी फारसे धोकादायक नसतात. मात्र अंगावर चामखीळ असल्याने त्वचेच्या सौन्दर्यावर थोडा परिणाम होऊ शकतो. शरीरावर चामखीळ का येतात, त्याची कारणे व उपाय याची माहिती डॉ सतीश उपळकर यांनी या लेखात दिली आहे.

चामखीळ येण्याची कारणे –

ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसमुळे (HPV व्हायरसमुळे) अंगावर चामखीळ येतात. शरीरावर असलेले चामखीळ नखाने कोचत राहणे यासारख्या सवयीमुळे चामखीळीतील स्त्राव शरीराच्या इतर ठिकाणीही लागण्याची शक्यता असते. त्यामुळे व्हायरसमुळे चामखीळ शरीराच्या इतर भागातही पसरत असतात. अशाप्रकारे शरीरावर चामखीळ येतात. यासाठी चामखीळ असल्यास त्यावर नखाने कोचत राहणे टाळावे.

तसेच चामखीळची लागण ही एकाकडून दुसऱ्याला होऊ शकते. यासाठी एकमेकांचे रेजर,अंतर्वस्त्रे, टॉवेल, कपडे, साबण, कंगवा इत्यादी वस्तू वापरणे टाळावे.

चामखीळचे प्रकार –

चामखीळचे एकूण पाच प्रमुख प्रकार (types) असतात. प्रत्येक प्रकारचे चामखीळ शरीराच्या वेगवेगळ्या भागावर येत असतात तसेच त्यांचे स्वरूपही वेगवेगळे असते.
1) Common warts
2) Plantar warts
3) Flat warts
4) Filiform warts
5) Periungual warts

1) Common warts –
ह्या प्रकारचे चामखीळ शरीरावर कोठेही होऊ शकतात त्यातही बोटांवर अधिक प्रमाणात येतात.

2) Plantar warts –
ह्या प्रकारचे चामखीळ पायाच्या तळव्यात येतात. इतर चामखीळ त्वचेच्या वर येत असतात तर या प्रकारातील चामखीळ पायाच्या तळव्याच्या त्वचेच्या आत येत असतात.

3) Flat warts –
ह्या प्रकारचे चामखीळ चेहरा, हात आणि पायावर येतात.

4) Filiform warts –
ह्या प्रकारचे चामखीळ नाक व तोंडाभोवती तसेच मानेवर आणि हनुवटीच्या खाली येतात.

5) Periungual warts –
ह्या प्रकारचे चामखीळ नखांच्या आत येतात. यामुळे नखांच्या वाढीवर परिणाम होऊन त्याठिकाणी वेदना होत असतात.

चामखीळ ज्या HPV व्हायरसमुळे येतात त्या HPV व्हायरसचे 100 हून अधिक प्रकार आहेत. हातापायावर येणारे चामखीळ हे फारसे धोकादायक नसतात. मात्र काही वेळा गुप्तांगावरही चामखीळ येऊ शकतात. त्याला genital warts असे म्हणतात. स्त्रियांमध्ये गुप्तांगावर येणाऱ्या चामखीळमुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग (cervical cancer) होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशावेळी दुर्लक्ष न करता स्त्रियांनी गुप्तांगावर चामखीळ असल्यास जवळच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

चामखीळ असल्यास डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे ..?

  • शरीराच्या sensitive ठिकाणी म्हणजे गुप्तांग, चेहरा, तोंड किंवा नाकाच्या ठिकाणी चामखीळ असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • चामखीळमधून रक्त किंवा पू येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • चामखीळच्या ठिकाणी जास्त वेदना होत असल्यास डॉक्टरांकडे जावे.
  • डायबेटीस किंवा रोगप्रतिकारक शक्तीचे HIV किंवा AIDS यासारखे आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

चामखीळ वरील उपचार – Warts treatments in Marathi :

बरेच चामखीळ हे कोणत्याही उपचाराशिवाय आपोआप कमी होतात. चामखीळ कोणत्या भागावर आहे, चामखीळचा प्रकार काय आहे यानुसार यावर उपचार ठरतात. शरीरावर चामखीळ असल्यास त्याठिकाणी Salicylic acid असणारी क्रीम आपण लावू शकता. चामखीळ पूर्णपणे कमी होण्यासाठी काही आठवडे ते महिने ही क्रीम दररोज चामखीळला लावावी. चेहऱ्यावर चामखीळ असल्यास तेथे ही क्रीम वापरणे टाळा किंवा केवळ चामखीळलाचं ती क्रीम लावावी. चेहऱ्याच्या इतर भागावर क्रीम लागणार नाही याची काळजी घ्यावी.

Wartosin हे हर्बल लोशनसुध्दा चामखीळमध्ये वापरले जाते. याचाही वापर गुप्तांग, चेहरा अशा नाजूक ठिकाणच्या चामखीळमध्ये करू नये. केवळ चामखीळलाचं Wartosin लावले पाहिजे. चामखीळशिवाय इतर भागावर हे लोशन लागणार नाही याची काळजी घ्यावी.

चामखीळमध्ये त्वचारोग तज्ञ डॉक्टर हे क्रायोथेरपी (Cryotherapy), सर्जरी, इलेक्ट्रोसर्जरी, लेझर ट्रिटमेंट अशा विविध पद्धतीव्दारे उपचार करू शकतात.

क्रायोथेरपीमध्ये (Cryotherapy) चामखीळला लिक्वीड नायट्रोजन लावले जाते. त्यामुळे चामखीळमधील पेशी नष्ट होतात व चामखीळ नाहीसे होते.

सर्जरीमध्ये स्थानिक भुल देऊन चामखीळ कट करून काढून टाकले जाते. इलेक्ट्रोसर्जरीमध्ये इलेक्ट्रिक उपकरणाने चामखीळच्या पेशी जाळल्या जातात. तर लेझर ट्रिटमेंटमध्ये लेझरच्या साहाय्याने चामखीळमधील पेशी नष्ट केल्या जातात.

चामखीळचे उपाय –

  • अंगावरील चामखीळला कापसाने लिंबाचा रस लावावा.
  • लसूण पाकळी मोडून ती चामखीळला लावावी.
  • दिवसातून दोनदा कांद्याचा रस चामखीळला लावावा.
  • बेकिंग सोड्यात थोडेसे एरंडेल तेल घालून पेस्ट तयार करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी चामखीळला याची पेस्ट लावावी.
  • कापलेल्या बटाट्याने चामखीळ असलेल्या ठिकाणी घासावे.
  • खायच्या चुन्यात थोडे तूप मिसळून पेस्ट तयार करावी. चामखीळला दिवसातून दोनदा ही पेस्ट लावावी. काही दिवसात चामखीळ निघून जाते.

चामखीळ आणि घ्यायची काळजी –

चामखीळ हे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होत असतात. या व्हायरसमुळे चामखीळ इतर भागातही पसरण्याची शक्यता जास्त असते. यासाठी चामखीळ असल्यास त्यावर नखाने कोचत राहणे टाळावे. चामखीळला स्पर्श केल्यास हात साबणाने स्वच्छ धुवावेत.

याशिवाय तुम्हाला डायबेटीस असल्यास चामखीळ अगरबत्तीने भाजणे, चामखीळला जखम करणे यासारखे कोणतेही उपाय न करता आपल्या डॉक्टरांकडून यावर उपचार करून घ्यावेत.

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुध्दा वाचा – चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

3 Sources

In this article information about Warts & their Causes, Types, Home remedies and Treatments in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *