चेहऱ्यावर काळे डाग येणे (Black spot on face) :
चेहऱ्यावर काळे डाग असल्यास सौंदर्य बाधित होऊन चेहरा खराब दिसतो शिवाय या काळ्या डागांमुळे मनात काहीसा न्यूनगंडही निर्माण होत असतो. चेहऱ्यावर काळे डाग येण्याची अनेक कारणे असतात.
चेहऱ्यावर काळे डाग येण्याची कारणे :
प्रामुख्याने मेलॅनीनच्या जास्त स्त्रावामुळे चेहऱ्यावर डार्क स्पॉट, पॅच आणि काळे डाग होऊ शकतात. मेलॅनीनचे जास्त स्त्राव होण्यामागे व चेहऱ्यावर काळे डाग येण्यासाठी खालील करणे जबाबदार असू शकतात.
• हार्मोनल बदलांमुळे चेहऱ्यावर काळे डाग येऊ शकतात.
• सतत जास्त सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यामुळे त्वचा काळवंडते आणि चेहऱ्यावर काळे डाग येतात.
• चेहऱ्यावर एखादी जखम झाल्यामुळे किंवा भाजल्यामुळे त्याठिकाणी काळे डाग होऊ शकतात.
• चेहऱ्यावरील मुरूम, पुरळ, चामखीळ यामुळे होणाऱ्या जखमांमुळेही काळे डाग येऊ शकतात.
• प्रेग्नन्सीमध्ये हार्मोनल बदलांमुळे गरोदर स्त्रियांमध्ये चेहऱ्यावर डाग (मेलॅजमा) होत असतात.
• हवेतील प्रदूषणामुळेही चेहरा आणि त्वचेवर काळे डाग येऊ शकतात.
• अँटीबायोटिक्ससारख्या काही औषधांच्या परिणामामुळे,
• काही पोषकघटक आणि व्हिटॅमिनच्या अभावामुळे,
• तसेच अनुवंशिकता, अपुरी झोप आणि वाढते वय ह्यामुळेही चेहऱ्यावर डाग येत असतात.
चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी हे करा घरगुती उपाय :
चेहऱ्यावर असणारे काळे डाग घालवण्यासाठी अनेकजण जाहिराती पाहून बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त क्रीम्सचा वापर करतात. मात्र यामुळे फायद्याऐवजी नुकसानच जास्त होण्याचा धोका असतो. यासाठी चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी खाली काही घरगुती आयुर्वेदिक उपाय दिले आहेत.
हळद –
चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी हळद खूप गुणकारी ठरते. कारण हळद ही स्कीन लाइटनिंग एजेंट सारखे काम करते. हळद फ्री-रैडीकल्स रिपेयर करते आणि त्वचेच्या पिगमेंटेशनला कमी करून चेहऱ्यावरचे काळे डाग कमी करते.
यासाठी हळद पावडर दुध किंवा लिंबाच्या रसामध्ये मिक्स करून काळ्या डागावर लावावी. त्यानंतर अर्ध्या तासाने चेहरा धुवावा. यामुळे चेहऱ्यावर असणारे काळे डाग कमी होतात. हा उपाय सूर्य किरणांमुळे चेहऱ्यावर झालेले डाग आणि रिंकल्स बरे करण्यासाठीही खूप उपयुक्त ठरतो.
लिंबाचा रस –
लिंबाच्या रसात मुबलक प्रमाणात विटॅमिन-C असते. व्हिटॅमिन-सी चेहऱ्यावर लावल्याने काळे डाग कमी होतात. ते मेलॅनीनचं प्रमाणही कमी करून चेहऱ्याची त्वचा उजळण्यास मदत करते.
यासाठी एका लिंबाच्या रसात कापूस भिजवून चेहऱ्यावर लावावा. त्यानंतर अर्ध्या तासाने थंड पाण्याने चेहरा चांगला धुवून घ्या. जर तुमची त्वचा जास्त सेन्सिटीव्ह असल्यास लिंबाच्या रसासोबत मध किंवा गुलाब जल मिक्स करावे.
मध आणि लिंबाचा रस –
मध आणि लिंबाचा रस यांचे मिश्रणही चेहऱ्यावरील काळ्या डागांवर उपयुक्त ठरते. यासाठी दोन चमचे मधात थोडासा लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावरील काळ्या गडद डागांवर लावावा. काही मिनिटे हा लेप चेहऱ्यावर ठेवावा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.
कच्चे बटाटे –
कच्च्या बटाट्यात नॅचरल ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात त्यामुळे चेहऱ्यावरील डाग घालवण्यास मदत होते. तसेच बटाट्याचे स्टार्च हे पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करते. यासाठी बटाट्याचे तुकडे चेहऱ्यावर काळे डाग असलेल्या भागावर चोळावे यामुळे काळे डाग निघून जातात. अशाचप्रकारे आपण काळ्या डागांच्या ठिकाणी टोमॅटोचे कापही लावू शकता.
ताक –
चेहऱ्यावरच्या काळ्या डागापासून सुटका करण्यासाठी ताकसुद्धा खूप फायदेशीर आहे. ताकामध्ये लॅक्टिक ऍसिड असते जे हळूहळू त्वचेचे पीगमेंटेशन कमी करते आणि काळे डाग घालवते. यासाठी ताक आणि टोमॅटो रस दोन्ही मिक्स करून चेहऱ्यावर लावावे. 15 मिनिटानंतर थंड पाण्याने चेहरा चांगला धुवून काढावा. या उपायानेही चेहऱ्यावरचे काळे डाग कमी होतील.
गुलाबजल –
गुलाबजलमध्ये कापसाचा बोळा भिजवून काळे डाग असणाऱ्या ठिकाणी दररोज लावावे. यामुळेही चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यास मदत होते.
चेहऱ्यावर काळे डाग होऊ नयेत यासाठी अशी घ्यावी काळजी :
पुरेसे पाणी प्यावे..
दिवसभरात पुरेसे म्हणजे साधारण 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. पुरेसे पाणी पिण्यामुळे शरीरातील अपायकारक घटक, रक्तातील अशुद्धी लघवीवाटे बाहेर निघण्यास मदत होते. तसेच पाण्यामुळे त्वचाही हायड्रेट राहते पर्यायाने चेहऱ्यावर काळे डाग होत नाहीत.
योग्य आहार घ्यावा..
चेहऱ्याच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन्स, मिनरल्स अशा पोषकतत्वांनीयुक्त असणारा आहार घ्यावा. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे, सुखामेवा यांचा समावेश असावा. वारंवार फास्टफूड, जंकफूड आणि तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
मेकअप करतानाही काळजी घ्यावी..
मेकअपच्या साहित्यांचीही स्वच्छता ठेवावी. मेकअपसाठी वापरण्यात येणारे ब्रश, प्लकर यांना नियमितपणे साफ ठेवावे. यामुळे चेहऱ्यावर इन्फेक्शन होणे टाळले जाते. केमिकल्सयुक्त मेकअप क्रीम वापरणे टाळावे. तसेच रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढूनच झोपावे. रात्री झोपण्यापूर्वी मेकअप न काढल्यामुळे त्वचेतील रोमछिद्र बंद होऊन चेहऱ्यावर काळे डाग, मुरूम येण्याची समस्या निर्माण होते.
बाहेर फिरताना सनस्क्रीनही लावावे..
उन्हामुळे चेहऱ्याची त्वचा काळवंडून चेहऱ्यावर काळे डाग पडण्याची शक्यता अधिक असते. यासाठी बाहेर फिरताना सनस्क्रीन जरुर लावावे.
चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून घ्या.
Read Marathi language article about Home remedies for Black spot on face. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.