एचआयव्ही म्हणजे काय – HIV in Marathi :

एचआयव्ही हा एक व्हायरस असून तो मानवी रोगप्रतिकारक शक्तीला हानी पोहोचवत असतो. त्यामुळे या व्हायरसला Human Immunodeficiency Virus अर्थात HIV असे म्हणतात. रोगप्रतिकारक शक्तीमुळे (immune system मुळे) वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून आपल्या शरीराचे रक्षण होण्यास मदत होत असते.

मात्र HIV व्हायरसमुळे ही रोगप्रतिकारक शक्ती धोक्यात येत असते. HIV व्हायरस हे immune system मधील CD4 पेशींवर हमला करतात व CD4 पेशींना नष्ट करत असतात.

एचआयव्ही व्हायरसची लागण अशी होते – HIV Causes :

HIV विषाणू बाधित रक्त, वीर्य, योनिस्त्राव, गुदातील द्रव, एचआयव्ही बाधित आईचे दूध यांद्वारे एचआयव्ही व्हायरसची लागण दुसऱ्या व्यक्तीमध्ये होत असते.

एचआयव्ही बाधित व्यक्तीशी असुरक्षित यौनसंबंध (सेक्स), एचआयव्ही बाधित व्यक्तीचे रक्त किंवा अशा व्यक्तींसाठी वापरलेल्या ब्लेड, सुया, इंजेक्शन किंवा टॅटूची साधने यांच्या माध्यमातून एचआयव्हीची दुसऱ्यांना लागण होत असते. याबरोबरच एचआयव्ही बाधित गरोदर स्रीद्वारे होणाऱ्या बाळालाही एचआयव्हीची लागण होत असते.

HIV ची लागण कशामुळे होत नाही..?

• HIV बाधित व्यक्तीशी व्यवहार केल्याने, त्याच्याशी बोलणे, त्याला स्पर्श करणे यामुळे एचआयव्हीची लागण होत नाही.
• एचआयव्ही बाधित व्यक्तीबरोबर राहणे, एकत्रित जेवण खाणे यामुळेही व्हायरस दुसऱ्यामध्ये पसरत नाही.
• एचआयव्ही बाधित व्यक्तीच्या खोकला किंवा शिंकेद्वारे हवेत विषाणू पसरत नाहीत.
• डास किंवा इतर कीटक चावल्यामुळेही HIV चे विषाणू पसरत नाहीत.

HIV चे निदान असे केले जाते :

एचआयव्हीची लागण झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी ब्लड टेस्ट, HIV antigen test, CD4 count, ELISA test करण्यात येतात.

HIV ची लागण किती दिवसात दिसून येते..?

एचआयव्हीची लागण झाल्यानंतर साधारण 23 ते 90 दिवसामध्ये HIV च्या antibodies त्या व्यक्तीच्या शरीरात तयार होत आतात. म्हणजे एचआयव्ही बाधित व्यक्तीशी असुरक्षित सेक्स केल्यास किंवा एचआयव्ही बाधित रक्ताच्या संपर्कात आल्यास पुढील 23 ते 90 दिवसांमध्ये एचआयव्ही वायरस असल्याचे टेस्टमधून दिसून येऊ शकते.

त्यामुळे असुरक्षित लैंगिक संबंध घडले असल्यास लगेच दुसऱ्या दिवशी टेस्ट करून HIV ची लागण झाली आहे की नाही हे ठरवता येणार नाही. HIV च्या antibodies शरीरात तयार न झाल्यामुळे टेस्ट निगेटिव्ह येत असते. त्यामुळे 2 ते 3 महिन्यांनी टेस्ट करणे आवश्यक असते. या टेस्टच्या आधारेच HIV ची लागण झाली आहे की नाही निश्चित होत असते.

एचआयव्ही ची लक्षणे – HIV Symptoms in Marathi :

एचआयव्ही व्हायरसच्या संपर्कात आल्यापासून एक ते दोन महिन्यात सुरवातीला ताप येणे, हुडहुडी भरणे, लिम्फ नोड्स सुजणे, त्वचेवर पुरळ येणे, अंगदुखी, अतिसार अशी काही लक्षणे जाणवू शकतात. HIV ची लागण झाल्यानंतर पुढीलप्रमाणे लक्षणे जाणवू शकतात.
• वारंवार ताप, सर्दी, खोकला असे आजार होणे,
• लाळग्रंथी सुजणे (लिम्फ नोड्स सुजणे),
• अंगदुखी व डोकेदुखी,
• त्वचेवर लालसर रंगाचे पुरळ येणे,
• तोंडात व घशात फोड येणे,
• घसा खवखवणे,
• मळमळ,
• एक महिन्याहून अधिक दिवस पातळ अतिसार होणे,
• रात्री झोपेत घाम येणे,
• भूक कमी होणे,
• वजन कमी होत जाणे,
• अशक्तपणा,
• मांसपेशी दुर्बल होणे अशी HIV मध्ये लक्षणे असतात.

एचआयव्ही आणि त्यावरील उपचार – HIV infection Treatments :

एचआयव्ही विषाणूंना नष्ट करणारे इलाज अद्यापही उपलब्ध नाहीत. मात्र अँटीरेट्रोव्हायरल औषधांच्या उपचाराने एचआयव्ही व्हायरससह अनेक वर्षे बाधित रुग्णाला जगता येणे शक्य आहे. त्यामुळे HIV ची लागण झाली म्हणजे सर्व काही संपले, असे रुग्णाने समजू नये. HIV व्हायरसवरील औषधोपचार चालू ठेवल्यास अनेक वर्षे व्यवस्थित जगता येते.

मात्र HIV ची लागण झालेली असल्यास आणि रुग्णाने त्यावर उपचार न घेतल्यास पुढे गंभीर स्थिती निर्माण होते. त्या स्थितीला AIDS असे म्हणतात. एड्सच्या स्थितीमध्ये इम्युन सिस्टीम ही खूपच कमजोर बनते. अशावेळी एड्सचा रुग्ण हा साधारण 3 वर्षापर्यंत जगू शकतो. त्यामुळे HIV विषाणूची लागण झालेली असल्यास समाज काय म्हणेल याची चिंता न करता त्यावर वेळीच उपचार चालू करावेत. उपचाराविषयी अधिक माहिती जवळच्या सरकारी दवाखान्यात मिळेल.

एड्स म्हणजे काय – AIDS in Marathi :

एड्स हा एक गंभीर असा संसर्गजन्य आजार आहे. एचआयव्ही विषाणूंची लागण झाल्यास त्यावर योग्य उपचार न घेतल्यास एड्स हा आजार होत असतो. HIV आणि AIDS यामध्ये फरक आहे. HIV ची लागण झाली म्हणजे AIDS होईल असेही नसते. AIDS ला Acquired Immune Deficiency Syndrome असेही म्हणतात.

HIV व्हायरस हे CD4 पेशींवर हमला करीत असतात. एका सामान्य व्यक्तीमध्ये साधारणतः 500 ते 1,500 /mm3 इतक्या सीडी4 पेशी असतात. आणि जर HIV बाधित रुग्णामध्ये सीडी4 पेशी ह्या 200 /mm3 पेक्षाही कमी झाल्यास त्या HIV बाधित रुग्णामध्ये AIDS ह्या आजाराचे निदान होते.

HIV व्हायरसची लागण झालेली असल्यास त्यावर उपचार न घेतल्यास साधारण 10 वर्षांमध्ये AIDS हा आजार होऊ शकतो. AIDS हा आजार झाल्यानंतर रुग्ण साधारण 3 वर्षापर्यंत जीवन जगू शकतो. मात्र जर HIV व्हायरसची लागण झालेली असल्यास व रुग्णाचा अँटीरेट्रोव्हायरल औषधांसह उपचार चालू असल्यास पुढे एड्स हा रोग होण्यास प्रतिबंध होऊ शकतो. HIV बाधित असूनही असा उपचार घेणारा रुग्ण अनेक वर्षे व्यवस्थित जीवन जगू शकतो.

एड्सची लक्षणे – Symptoms of AIDS :

ADIS मध्ये रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमजोर झालेली असते. त्यामुळे रुग्णास वारंवार ताप, सर्दी, खोकला, अतिसार असे आजार होत असतात. याबरोबरच खालील लक्षणे AIDS च्या रुग्णामध्ये असू शकतात.
• वजन भरपूर प्रमाणात कमी होऊ लागते,
• रुग्ण खंगत जातो,
• रुग्णाची भूक मंदावते,
• मांसपेशी अधिक दुर्बल बनतात,
• लसीका ग्रंथी अधिक सुजलेल्या असतात,
• तोंड, जीभ किंवा जननेंद्रिय यावर फोड व व्रण होतात,
• त्वचेवर गडद रंगाचे चट्टे व खाज येत असते अशी लक्षणे एड्स रुग्णांमध्ये असतात.

एड्सवरील उपचार – Treatments of AIDS :

एचआयव्ही विषाणूंना नष्ट करणारे इलाज अद्यापही उपलब्ध नाहीत. मात्र अँटीरेट्रोव्हायरल औषधांच्या मदतीने एचआयव्ही व्हायरसची लागण झालेली असतानाही अनेक वर्षे बाधित रुग्णाला जगता येणे शक्य आहे. त्यामुळे HIV ची लागण झाली म्हणजे सर्व काही संपले, असे रुग्णाने समजू नये. HIV व्हायरसवरील औषधोपचार चालू ठेवल्यास अनेक वर्षे व्यवस्थित जगता येते.

मात्र HIV ची लागण झालेली असल्यास रुग्णाने त्यावर उपचार न घेतल्यास पुढे AIDS ची गंभीर स्थिती निर्माण होते. एड्सच्या स्थितीमध्ये इम्युन सिस्टीम ही खूपच कमजोर बनते. अशावेळी एड्सचा रुग्ण हा साधारण 3 वर्षापर्यंत जगू शकतो. त्यामुळे HIV ची लागण झाल्यास समाज काय म्हणेल याची चिंता न करता त्यावर वेळीच उपचार चालू करावेत. उपचाराविषयी अधिक माहिती जवळच्या सरकारी दवाखान्यात मिळेल.

HIV आणि एड्स होण्यापासून असा करावा बचाव – HIV & AIDS Prevention tips :

HIV व्हायरसची लागण होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, HIV आणि एड्स यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती खाली दिली आहे.
एड्स रोगावर निश्चित असा उपचार नसल्याने त्यापासून बचाव करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.
• आपल्या जोडीदाराव्यतिरिक्त (म्हणजे पती आणि पत्नी) अन्य व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवू नका. ते शक्य नसल्यास, जोडीदाराव्यतिरिक्त अन्य व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर करावा.
• वेश्या, मुखमैथुन, गुदामैथुन यासारख्या प्रवृत्तीपासून दूरच राहणे गरजेचे आहे.
• ‎रक्त घेण्यापुर्वी ते HIV संक्रमित नसल्याची खात्री करुन घ्यावी.
• ‎दुषित सुया, इंजेक्शन यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. इंजेक्शन घेताना प्रत्येक रुग्णाने सतर्कता दाखवावी. इंजेक्शन घेण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन सिरींज आणि सुईचा वापर करावा.
• ‎अंगावर Tattoo गोंदवून घेताना नवीन सुया वापरल्या जातील याकडे लक्ष द्या.
• ‎सलूनमध्ये दाढी करून घेताना किंवा वस्तारा फिरवण्यापूर्वी नवीन ब्लेड वापरले आहे का याची खात्री करून घ्या.
• ‎गुप्तरोग झाला असल्यास त्यावर डॉक्टरकडे जाऊन त्वरित उपचार करावा.
• ‎मादक द्रव्यांचे सेवन करु नये.

एड्स हा एक सर्वात गंभीर असा संसर्गजन्य आजार आहे. या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन (World AIDS Day) म्हणून साजरा करण्यात येतो. HIV आणि एड्स विषयी याठिकाणी दिलेली सविस्तर माहिती समजून घेऊन त्याप्रमाणे काळजी घेतल्यास आपण स्वतःचा निश्चितच या घातक आजारापासून बचाव करू शकतो.

HIV व AIDS संबंधित खालील आजारांची माहितीही वाचा..
न्यूमोनिया म्हणजे काय व त्यावरील उपचार
क्षयरोग किंवा टीबी होण्याची कारणे व लक्षणे

HIV & AIDS causes, symptoms, prevention & treatments information in Marathi

© लेखक - डॉ. सतीश उपळकर
(महत्वाची सूचना - ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये.)