मूळव्याध आणि आहार पथ्य : मुळव्याध झाल्यास असा असावा आहार – Piles diet plan in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

त्रास मूळव्याधीचा..

आजकाल अनेकांना मूळव्याधीचा त्रास सतावत आहे. बैठी जीवनशैली आणि अयोग्य आहार ही प्रमुख कारणे मुळव्याध होण्यास कारणीभूत ठरत आहेत. मूळव्याध म्हणजे गुदद्वाराजवळ असलेल्या शिरांना सूज येते. यामुळे शौचाच्या वेळेस वेदना होणे, रक्त पडणे, खाज येणे अशी लक्षणे जाणवतात. मूळव्याध झाल्यास अनेक दिवस योग्य आहार घेणे आवश्यक असते. यासाठी येथे मूळव्याधीत काय खावे व काय खाणे टाळले पाहिजे, मूळव्याधीत पथ्य आणि अपथ्य कसे असावे याविषयी माहिती दिली आहे.

मूळव्याध आणि आहार पथ्य :

मूळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी योग्य आहाराची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण मूळव्याध हा मुळात पचनाशी संबंधित विकार आहे. अगदी शस्त्रक्रिया करून मोड काढून टाकला तरी पुन्हा पुन्हा याचा त्रास होऊ शकतो. यासाठी मूळव्याधीत पथ्य सांभाळणे, योग्य आहाराचे पालन करणे गरजेचे असते.

मुळव्याध झाल्यावर असा घ्यावा आहार :

मुळव्याध झाल्यावर आहारात फायबरयुक्त पदार्थ (तंतुमय पदार्थ) असणे आवश्यक असते. कारण फायबरमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत होते, पोट नियमित साफ होते. यासाठी आहारामध्ये सर्व प्रकारच्या पालेभाज्या, विविध फळे, फळभाज्या असाव्यात.

फायबर्सच्या सोबत पचन सुधारण्यासाठी तसेच मूळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी पाणी मुबलक प्रमाणात पिणे गरजेचे आहे. अपुर्‍या पाण्यामुळे शौचाला कडक होते. यासाठी बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी, डिहायाड्रेशनचा त्रास कमी करण्यासाठी तसेच शौचाला साफ होण्यासाठी पाणी योग्य प्रमाणात पिणे फायदेशीर ठरते. साधारण दररोज किमान 8 ग्लास पाणी प्यावे.

मूळव्याध पथ्य – मूळव्याध असल्यास काय खावे..?

मुळव्याधमध्ये आहारात आहारात जुने तांदूळ, ज्वारी, गहू, कुळीथ, मूग, तूर ही कडधान्ये वापरावीत. तसेच पडवळ, भेंडी, दुधी, तोंडली, वांगी, परवर, पालक, घोळ, शेपू, सुरण कंदमुळ यासारख्या भाज्या खाव्यात. लिंबू, आवळा, अंजीर, केळी, पिकलेला पेरू, काळी द्राक्षे, डाळींब इ. फळे खावीत. दूध, तूप लोणी, ताक यांचा समावेश असावा. बडिशेपेचे पाणी, जिरे घालून उकळलेले पाणी प्यावे.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

याशिवाय मूळव्याधीच्या त्रासात सुरण हे कंदमुळ अत्यंत उपयुक्त ठरते. सुरण ही भाजी मूळव्याधीत औषधच होय. सुरण वाफवून केलेली भाजी व ताक असा आहार काही दिवस घेतल्यास उत्तम फायदा होतो. मूळव्याधवरील प्रभावी औषध उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

मूळव्याध अपथ्य – मुळव्याध झाल्यावर शक्यतो काय खाऊ नये..?

• तिखट, खारट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. तिखट, मसालेदार पदार्थ यामुळे हा त्रास अधिक वाढतो. शौचाच्या ठिकाणी यांमुळे आग व जळजळ होते.
• मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, फास्टफूड, जंकफूड, चहा-कॉफी अतिप्रमाणात पिणे टाळावे कारण यामुळे पोट साफ न होण्याची तक्रारी सुरू होतात.
• जास्त प्रमाणात मांसाहार विशेषतः चिकन व अंडी खाणे शक्यतो टाळावे.
• पचनास जड असणारे पदार्थ खाणे टाळावे.
• अवेळी जेवण करणे टाळावे. जेवणाच्या वेळा न पाळल्याने पचनक्रियेत बाधा निर्माण होऊ शकतात. मूळव्याधवरील प्रभावी औषध उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Information about piles diet plan in Marathi.