पुरळ उठणे : लक्षणे, कारणे आणि उपाय (Skin rashes in Marathi)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Skin rashes in Marathi. Skin rash causes and treatments in Marathi. Skin diseases in Marathi.

अंगावर पुरळ उटणे :

पुरळ म्हणजे अंगावर लालसर किंवा इतर रंगाचे चट्टे, फोड उठतात. त्यामध्ये सूज असेल तर हे पुरळ दुखतात किंवा त्या ठिकाणी खाज उठते. पुरळ हा काही स्वतंत्र आजार म्हणता येणार नाही अनेक रोगांमध्ये पुरळ उठणे हे लक्षण असलेले दिसते. पुरळाचे अनेक प्रकार असतात. त्यांची तीव्रता कमी-अधिक असू शकते. शिवाय त्यातील काही गंभीर आजारही असू शकतात.

पुरळांचे कारण :

जंतूसंसर्ग (इन्फेक्शन) हे प्रमुख कारण आहे. पुरळ हे खालील रोगांमध्ये जंतुसंसर्गमुळे उठतात.
• विषाणूजन्य आजार जसे गोवर, जर्मन गोवर, कांजिण्या, नागीण
• जिवाणूजन्य आजार जसे इंपेटिगो, स्कार्लेट फीवर
• बुरशीजन्य आजार गजकर्ण, नायटा इ.,
• तसेच अॅलर्जीमूळेही पुरळ उठतात.
• औषधांच्या साईड इफेक्टमुळे, पोटात घ्यायच्या किंवा बाहेरून लावायच्या औषधांमुळे पुरळ उठू शकतात,
कीटकदंशामुळेही पुरळ उठते.
• काही विशिष्ट वनस्पती, प्रदूषण, रसायनांशी संपर्क आल्यानेदेखील पुरळ उठते.
• ‎याखेरीज काही गंभीर आजारांमध्येही उदा. ल्युपस आजार, डरमॅटोमायोसायटिस, संधी विकार इ. त्वचेवरील पुरळ हे प्रमुख लक्षण असतं.

पुरळाचे निदान कसे करतात..?

पुरळाचे निदान त्याचे स्वरूप, लक्षणं यावरून केलं जातं. काही पुरळ सपाट असतात, तर काही त्वचेवर उठाव असलेले असतात. कधी फोडांसारखे असतात तर काही वेळा अशा फोडामध्ये पाणी, रक्त, पू असू शकतं.
काही पुरळाबरोबर ताप, काखेत – जांघेत व मानेत लिम्फ ग्रंथींना सूज येते. श्वासोच्छ्वासाला त्रास होणं, उलटी, पोटात वेदना, चक्कर येणं, बेशुद्धावस्था अशी गंभीर लक्षणही पुरळासोबत असू शकतात.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

अशा वेळी डॉक्टरांकडे जाणे आवश्यक असतं. तसेच काही तपासण्याही रक्त, लघवी, शौच इ. कराव्या लागतील. एखादे पुरळ किती दिवस टिकेल हे त्याच्या कारणावरून ठरते. काही पुरळ दोन-तीन दिवसात जातात. काही बरेच महिनेही त्रास देतात.

पुरळ कसे टाळावेत..?

• जंतूसंसर्ग टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता ठेवा.
• ‎आपल्याला अॅलर्जी आहे असे पदार्थ टाळा.
• ‎डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नेहमी औषधे घ्या. शक्यतो घरगुती उपाय करणे टाळा.
• ‎विषारी वनस्पतींचा, प्रदूषण, रसायनांचा संपर्क टाळणं यांसारखे उपाय करता येतील.

हे सुद्धा वाचा..
अंगावर पित्त उठणे व उपाय
कांजिण्या (Chicken pox)
गोवर उठणे