गरोदरपणातील मधुमेह मराठीत माहिती (Diabetes in pregnancy Marathi)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Diabetes and Pregnancy in Marathi, Gestational Diabetes in Marathi, Diabetes in pregnancy Marathi, Garodarpanatil madhumeh, Pregnancy Problems in Marathi.

गरोदरपणातील मधुमेह (डायबेटीस) :

गरोदरपणात रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक झाल्यास गरोदरपणातील मधुमेह होण्याची समस्या निर्माण होते. गरोदरपणात होणाऱ्या मधुमेहाच्या प्रकारास Gestational Diabetes असे म्हणतात. हा डायबेटीस प्रकार फक्त स्त्री गर्भवती असतानाच होतो. गर्भवती स्त्रियांना होणाऱ्या त्रासांमध्ये याचं प्रमाण अधिक आहे. प्रामुख्याने गर्भारपणाच्या मधल्या टप्प्यात म्हणजे 24 ते 28 आठवडे या काळात हा त्रास निर्माण होतो.

ज्यांना प्रेग्नन्सीमध्ये मधुमेह झालाय त्यांची ग्लुकोज लेव्हल बाळाच्या जन्मासोबत नॉर्मलला येते. परंतु त्यांना भविष्यात मधुमेह होऊ शकतो. यासाठी त्यांनी दर सहा महिन्यांनी आपली ग्लुकोज तपासून घ्यावी.
अनेकवेळा स्त्रियांमध्ये गर्भावस्थेत वाढलेली साखर ही तशीच राहते आणि प्रसूतीनंतरही त्यांना मधुमेह असतो. बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव यामुळे भारतात गरोदरपणातील मधुमेह होण्याचे प्रमाण वाढत आहे. भारतात दरवर्षी सुमारे एक लाखांहून अधिक गर्भवती स्त्रियांमध्ये गरोदरपणातील मधुमेहाची समस्या निर्माण होते.

गरोदरपणात मधुमेह असल्यास आई आणि होणाऱ्या बाळाच्या आरोग्यावर पुढीलप्रमाणे परिणाम होतात.
गर्भवती स्त्रीस होणारे परिणाम –
• वेळेपूर्वीचं प्रसूती (प्रीमॅच्युअर डिलीवरी) होणे.
• ‎वाढलेल्या साखरेमुळे गर्भपात होण्याचा धोका असतो.
• ‎गरोदरपणातील मधुमेहामुळे गर्भाचे वजन वाढते त्यामुळे सिजेरियन डिलीवरी होण्याची अधिक शक्यता असते.
• ‎अशा गर्भवती स्त्रीस पुढील आयुष्यात टाइप 2 प्रकारचा मधुमेह होण्याची दाट शक्यता असते. अशावेळी योग्य काळजी न घेतल्यास त्यातून पुढे रेटिनोपैथी, हृदयरोग, किडनी रोग आणि Nurve loss हे मधुमेहामुळे होणारे दुष्परिणाम उद्भवतात.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

बाळांवर होणारे परिणाम –
• प्रीमॅच्युअर डिलीवरी झाल्यामुळे जन्मानंतर बाळास श्वास घ्यायला त्रास होतो.
• ‎हायपोग्लिशेमियाची स्थिती बाळामध्ये निर्माण होऊ शकते यात जन्मानंतर बाळाच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी असू शकते.
• ‎बाळाचे वजन जास्त रहाते त्यामुळे मोठेपणी त्याला टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते.

हे करा..
गरोदरपणातील मधुमेहात घ्यावयाची काळजी आणि उपाय :
• प्रजनन काळातील मधुमेह टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू न देणे.
• ‎गरोदरपणात फस्टिंग शुगरचे प्रमाण 90 पेक्षा कमी आणि जेवणानंतर 120 पेक्षा कमी राखल्यास बाळाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही.
• ‎गरोदरपणात नियमित रक्तातील साखरेची चाचणी करून घ्या. गरोदरपणात कधीकधी दिवसातून चार-पाच वेळा साखर तपासणी आवश्यक असते यासाठी रक्तातील साखरेचं प्रमाण नियमितपणे घरच्याघरी तपासण्यासाठी ‘ब्लड ग्लुकोज मीटर’चा वापरही करू शकता.
• ‎गर्भावस्थेत मधुमेह असल्यास किंवा मधुमेह होऊ नये म्हणून योग्य आहार घ्या. बाळाची वाढही नीट व्हायला हवी आणि आईची ग्लुकोजही नियंत्रित राहायला हवी अशा प्रकारे आहाराचं नियोजन केले पाहिजे. यासाठी तुमच्या डॉक्टरांशी यासंदर्भात चर्चा करा.
• ‎डॉक्टरांकडे जाताना प्रत्येक वेळी तुमची सर्व औषधं सोबत घेऊन जा. डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
• ‎गर्भावस्थेत करावयाचा व्यायामाची महितीही आपल्या डॉक्टरांकडून घ्या. स्वतःहुन किंवा इंटरनेटवर पाहून व्यायाम सुरू करू नका. असे करणे आपल्या आणि बाळाच्या जीवावर बेतू शकते. यासाठी आपल्या डॉक्टरांशी गरोदरपणात करावयाच्या व्यायामासंबंधी माहिती घ्या आणि त्याप्रमाणे व्यायाम करा.


गर्भारपणातील मधुमेह उपचार माहिती :

गरोदरपणात मधुमेह इन्शुलीनच्या साहाय्याने आटोक्यात ठेवता येतो. गर्भारपणातील मधुमेहात मेटफोर्मीन किंवा ग्लायक्लाझाईड यासारखी तोंडाने घेता येणारी मधुमेहातील औषधे वापरता येत नाहीत कारण त्यांचा गर्भावर परिणाम होण्याची भीती असते. यासाठी गर्भारपणातील मधुमेहात सुरक्षित उपाय म्हणून इन्शुलीनचं वापरले जाते.
जस जसे दिवस वाढत जातात तस तसे इन्शुलीनचा डोस वाढवावा लागतो. यासाठी नियमितपणे ग्लुकोजची लेव्हल तपासणे आणि डॉक्टरांच्या संपर्कात राहणे गरजेचे असते.
इन्शुलिन थेरपीच्या साहाय्याने रक्तातील साखरेची पातळी योग्य प्रमाणात राखता येते. रक्तातील साखरेचं प्रमाण योग्य पातळीवर ठेवल्याने तुमच्या बाळाचं वजन वाढण्यास मदत होते.


काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे :
गरोदरपणात मधुमेह असल्यास बाळंत झाल्यावर त्या स्त्रीला मधुमेह होऊ शकतो का..?

ज्यां स्त्रियांना गर्भारपणात मधुमेह झालाय त्यांची ग्लुकोज लेव्हल ही बाळाच्या जन्मासोबत नॉर्मलला येते. परंतु त्यांना भविष्यात मधुमेह होऊ शकतो. यासाठी त्यांनी दर सहा महिन्यांनी आपली ग्लुकोज तपासून घ्यावी आणि मधुमेहतज्ज्ञांशी चर्चा करून आहार-विहाराचे नियोजन ठेवावे.
मात्र अनेकवेळा स्त्रियांमध्ये गर्भावस्थेत वाढलेली साखर ही तशीच राहते आणि बाळांतपणानंतरही त्यांना मधुमेह असू शकतो.


जन्मलेल्या बाळाला भविष्यात मधुमेह होण्याची शक्यता असते का..?

आईला गरोदरपणात मधुमेह असल्यास जन्मणाऱ्या बाळाचे वजन हे जास्त रहाते त्यामुळे मोठेपणी त्याला टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. अशा बाळांना भविष्यात मधुमेह होणार की नाही ते त्यांच्या पुढील जीवनशैलीवर अवलंबून असेल. त्यांचा आहार विहार यांचे योग्य नियोजन केल्यास कदाचित त्यांना मधुमेह होणारही नाही. यासाठी मधुमेहतज्ज्ञांशी चर्चा करा. बाळाचा भविष्यातील आहार-विहार कसा असावा याचे ते आपणास
मार्गदर्शन करतील. जेणेकरून बाळाला भविष्यात मधुमेह होण्याची शक्यता कमी होईल.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)


गरोदर होण्याआधीही अनेक स्त्रियांना मधुमेह असल्यास काय होईल..?
म्हणजेचं मधुमेही स्त्री आई बनते तेंव्हा..

बदललेली जीवनशैली यामुळे मधुमेहाचे प्रमाण आज दिवसेंदिवस खूपचं वाढत आहे. गरोदर होण्याआधीही अनेक स्त्रियांना मधुमेह असतो. ज्या स्त्रियांना आधी पासून मधुमेह आहे त्यांचा मधुमेह हा कायम राहतो.
मधुमेही स्त्री जेंव्हा गरोदर बनते तेंव्हा गर्भाला पहिल्या दिवसापासूनचं आईच्या रक्तातील वाढलेल्या ग्लुकोजशी सामना करावा लागतो. गर्भाची वाढ होताना जर आईची ग्लुकोज नियंत्रणात नसेल तर बाळाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. अशावेळी बाळाला जन्मजात आजार होण्याची शक्यता अधिक असते. जन्मानंतर त्या बाळालाही मधुमेह होऊ शकतो.
मधुमेही स्त्रिया जेंव्हा गरोदर होतात तेंव्हा रोज घेत असलेली मधुमेहाची औषधं बदलून इन्शुलीन सुरू करावे लागते. अनेकवेळेला मधुमेह असणाऱ्या स्त्रीला जर आपण गरोदर झालो आहे हे लवकर न लक्षात आल्यास तोपर्यंत ती मधुमेहाची औषधे घेतंच राहील आणि त्या औषधांचा प्रतिकूल परिणाम गर्भावर होत राहील. अशावेळी बाळ काही वैगुण्यांसह जन्माला येण्याची शक्यता असते.
मधुमेही स्त्रियांनी गरोदरपणात नियमितपणे डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. आपण घेत असलेली पूर्वीच्या औषधांची माहिती आपल्या डॉक्टरांना द्यावी. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
आपली ग्लुकोज चोवीस तास नियंत्रणात आहे की नाही ते पहाणे आवश्यक असते. रक्तातील साखरेचं प्रमाण नियमितपणे घरच्याघरी तपासण्यासाठी ‘ब्लड ग्लुकोज मीटर’चा वापर करा.

हे सुद्धा वाचा..
गरोदरपणातील उच्च रक्तदाब समस्या
गरोदरपणात होणारे विविध समस्या आणि उपाय
गरोदरपणात घ्यावयाची काळजी
गरोदरपणात कोणता आहार घ्यावा
मधुमेह डायबेटीसची संपूर्ण माहिती मराठीत

Pregnancy problems in Marathi, Pregnancy diabetes diet plan in Marathi

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती देणारे उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.