पपई – Papaya :

पपई हे आरोग्यासाठी फायदेशीर असे फळ आहे. पपई हे पोषकतत्वांनी समृद्ध असून चवीलाही स्वादिष्ट असणारे फळ आहे. पपईमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त अशी अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, खनिजे, क्षार आणि फायबर्स हे घटक भरपूर प्रमाणात असतात. पिकलेली पपई खाण्यासाठी चविष्ट तर असतेचं शिवाय आरोग्यासाठीही चांगली असते.

पपई खाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. पपई खाण्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामुळे पपई ही हृद्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. पपईमुळे हृदयविकार, पक्षाघात, मधुमेह अशा आजारांचा धोका कमी होतो. पपई खाल्याने वजन आटोक्यात राहते. पपईतील फायबर्समुळे पोट साफ होण्यास मदत होते.

पपई खाण्याचे आरोग्यदायी 9 फायदे –

1) पपई खाणे हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते.
पपईमध्ये व्हिटॅमिन-A मुबलक प्रमाणात असते. व्हिटॅमिन-A हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्वाचे असते. व्हिटॅमिन-A मुळे रातांधळेपणा आणि डोळ्यांचे अन्य आजार होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे पपई खाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते.

2) हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते.
पपई खाण्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. वाईट कोलेस्टेरॉल नियंत्रित राहिल्याने हृदयविकार, पक्षाघात अशा गंभीर आजरांचा धोका यामुळे कमी होतो. पपईतील लाइकोपीन (lycopene) अँटिऑक्सिडंट्स , व्हिटॅमिन-C आणि फायटोकेमिकल्स हे घटक हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. याशिवाय पपईमध्ये पोटॅशियमही मुबलक असते. पोटॅशियममुळे ब्लड प्रेशर आटोक्यात राहते. ब्लडप्रेशर व वाईट कोलेस्टेरॉल नियंत्रित राहत असल्याने पपई खाणे हे हृद्यासाठी चांगले असते.

3) मधुमेहींसाठी उत्तम असते.
पपईमध्ये फायबर्स असते. त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेही रुग्णसुध्दा आपल्या आहारात काही प्रमाणात पपईचा समावेश करू शकतात.

4) पपई खाल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
पपईमध्ये फायबर्सचे प्रमाण भरपूर असून यात कॅलरीज कमी असतात. यामुळे पपई खाल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. त्यामुळे लवकर भूक लागत नाही. भूक नियंत्रित राहिल्याने त्याचा उपयोग वजन आटोक्यात आणण्यासाठी होतो. त्यामुळे पपई खाल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

5) सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
पपईमध्ये कॅरोटीनॉइड्सचे प्रमाण जास्त असते. यामुळे सांध्यातील सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते. त्यामुळे सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी त्यांच्या आहारात पपईचा जरूर समावेश करावा.

6) रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
पपईमध्ये व्हिटॅमिन-C भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन-C मुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होत असते. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यास अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पपई जरूर खावा.

7) महत्वाची अँटिऑक्सिडंट मिळतात.
पपईमध्ये कॅरोटीनॉइड्स (carotenoids) सारखी अनेक महत्वाची अँटिऑक्सिडंट असतात. ज्यामुळे पेशींतील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो व फ्री रॅडिकल्स कमी करते. त्यामुळे अल्झायमर, प्रीडायबिटीज, हायपोथायरॉईडीझम, यकृताचे आजार अशा रोगांचा धोका यामुळे कमी होतो. यातील लाइकोपीन (lycopene) या अँटिऑक्सिडंट मुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.

8) पचनासंबधित तक्रारी दूर होतात.
पपईमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असते. फायबर्समुळे पोट रोजच्या रोज साफ होण्यास मदत होते. पोट व्यवस्थित साफ झाल्याने पचनासंबधित बद्धकोष्ठता, पोटात गॅस होणे, पोटफुगी यासारख्या समस्या दूर होतात. तसेच पपईतील पॅपेन (papain) ह्या एन्झाइममुळे घेतलेल्या अन्नातील प्रोटीन्स पचण्यास सोपे जाते. त्यामुळे पपई खाण्यामुळे पचनक्रियाही सुधारते.

9) पपई आपल्या त्वचेसाठी उपयुक्त असते.
पपई हे त्वचेच्या नुकसानीपासून संरक्षण करते. पपईत असणाऱ्या व्हिटॅमिन-C आणि लाइकोपीन ह्या घटकांमुळे त्वचेचे संरक्षण होते. यामुळे त्वचेला सुरकुत्या पडण्यापासून बचाव होतो. तसेच यामुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत होते.

पपई खाण्याचे तोटे व नुकसान –

  • पपईतील लेटेक्समध्ये पॅपेन हा घटक असतो. जास्त प्रमाणात पॅपेन घटक सेवन केल्याने अन्ननलिकेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
  • पपईत लेटेक्स घटक असल्याने पपई त्वचेवर लावल्याने काही लोकांना याची एलर्जी होऊन त्रास होऊ शकतो.
  • कच्ची पपई गरोदरपणात खाल्ल्याने गर्भाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात.
  • पपई जास्त प्रमाणात खाल्ल्याने थायरॉईडचा त्रास होऊ शकतो.
  • पपई खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे डायबेटिस रुग्णांनी अधिक प्रमाणात पपई खाणे टाळावे. कारण डायबेटिस रुग्णाची एकाएकी कमी होऊन गुंतागुंतीची स्थिती निर्माण होऊ शकते.

पपई कोणी खाऊ नये..?

  • पपई गरोदर स्त्रियांनी खाणे टाळले पाहिजे.
  • कोणत्याही शस्त्रक्रियेच्या 2 आठवड्यांपूर्वी तसेच शस्त्रक्रियेनंतर पुढील काही दिवस पपई खाऊ नये.
  • डायबेटिस रुग्णांनी अधिक प्रमाणात पपई खाऊ नये.

पपई कधी खावी..?

  • पपई सकाळी किंवा संध्याकाळी खाऊ शकता.
  • दररोज पपई खाणार असाल तर रोज थोड्या प्रमाणातचं पिकलेली पपई खावी.

पपई खाल्ल्यावर पाणी पिण्यामुळे काय होते ..?

पपई खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नये. कारण पपई खाल्ल्यावर पाणी पिण्याने पचनक्रिया बिघडू शकते. त्यामुळे पपई खाऊन लगेच पाणी पिऊ नये.

पपई मधील पोषकघटक (Nutrients In Papaya) :

एका पपई मध्ये साधारणपणे पुढीलप्रमाणे पोषकघटक असतात.

  • कॅलरीज : 59
  • कर्बोदके : 15 ग्रॅम
  • फायबर : 3 ग्रॅम
  • प्रथिने : 1 ग्रॅम
  • व्हिटॅमिन-C : RDI च्या 157%
  • व्हिटॅमिन-A : RDI च्या 33%
  • फोलेट (व्हिटॅमिन-B9) : RDI च्या 14%
  • पोटॅशियम : RDI च्या 11%
  • तसेच पपईमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे B1, B3, B5, E व K चे प्रमाणही थोडेफार असते.

हे सुध्दा वाचा –> फणस खाण्याचे फायदे व तोटे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

In this article information about Papaya Health Benefits and Side effects in Marathi language. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on February 11, 2024.

Dr. Satish Upalkar

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *