डायबेटीस रुग्णांसाठी आहार चार्ट असा असावा – Diabetes diet plan in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

मधुमेह आणि आहार पथ्य – Diabetes diet :

मधुमेहामध्ये आहाराचे अत्यंत महत्व आहे. योग्य आहारामुळे मधुमेही तसेच Pre-Diabetes रुग्णांमध्ये रक्तातील वाढलेली साखर नियंत्रणात ठेवली जाते. तसेच वजन योग्य प्रमाणात राखण्यासही सम्यक आहारामुळे शक्य होते. मधुमेही रुग्णाच्या प्रकृतीनुसार आणि मधुमेहाच्या प्रकारानुसार आहाराचे स्वरुप असते यासाठी डायबेटीस रुग्णांनी तज्ञांच्या सल्ल्यानुसार आहाराची योजना करावी.

मधुमेहावर नियंत्रण न ठेवल्यास भविष्यात आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उभ्या रहातात. अनियंत्रित डायबेटीसमुळे हार्ट अटॅक, पक्षाघात (लकवा), किडन्या निकामी होणे, diabetic neuropathy, डोळ्यांचे गंभीर आजार होत असतात.

त्यामुळे मधुमेही रुग्णाने योग्य औषधे, योग्य आहार, नियमित व्यायाम व नियमित तपासणी या चारसूत्री हेल्दी लाइफस्टाइलचा अंगीकार संपूर्ण जीवनभर केला पाहिजे.

असा असावा मधुमेह रुग्णांचा आहार :

डायबेटीस रुग्णांच्या आहारात फायबर्स (तंतुमय पदार्थ) अधिक असावेत तर फॅट्स आणि साखरेचे पदार्थ कमी असणे गरजेचे असते. मधुमेहींसाठी योग्य आहार कोणता, डायबेटीस रुग्णांनी काय खावे, काय खाऊ नये याविषयी माहिती खाली दिली आहे.

डायबेटीस रुग्णांनी काय खावे..?

• हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, मोड आलेली कडधान्ये, नाचणा, कमी पॉलीश केलेला तांदूळ, दूध इ. चा आहारात समावेश करावा.
• हिरव्या पालेभाज्या, जास्त गोड नसणारी विविध फळे खावीत कारण त्यामध्ये तंतूमय घटकांचे प्रमाण अधिक असते.
• तंतुमय पदार्थ (फायबर्सयुक्त पदार्थ) मधुमेहींमध्ये अत्यंत उपयोगी असतात. यांमुळे रक्तातील साखर नियंत्रीत तर होतेच शिवाय रुग्णांमधील हृद्यविकाराचा धोकाही कमी होण्यास तंतुमय पदार्थांमुळे मदत होते.
• सफरचंद, स्ट्रोबेरी, जांभूळ, आवळा, संत्री, मोसंबी, डाळिंब, कलिंगड ही फळे खाऊ शकता.
• फळभाज्यामध्ये गवार, कारले, भेंडी, दुधी भोपळा, बीट यांचा समावेश करावा.
• आहारात मूग, मटकी, उडीद, चवळी यासारखी कडधान्ये समाविष्ट करावीत.
• पुरेसे पाणीही प्यावे. दिवसातून किमान आठ ग्लास पाणी प्यावे.

मधुमेह रुग्णांनी काय खाऊ नये..?

मधुमेहामध्ये खालील आहार पदार्थ खाणे टाळणे गरजेचे असते. यांमध्ये,
• सॅच्युरेटेड फॅट्स असलेले पदार्थ खाणे टाळावे. सॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे पामतेल, तूप, साय, लोणी, प्राणीज चरबी, अंड्यातील पिवळा बलक या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचे अधिक प्रमाण असल्याने वरील पदार्थ टाळावेत. यांच्या अतिसेवनाने वाईट कोलेस्टेरॉलमध्ये वाढ होते. यांमुळे लठ्ठपणा, हृद्यविकार, उच्चरक्तदाब, धमनीकाठिन्यतः, पक्षाघात यासारखे विकार उत्पन्न होतात.
• ट्रांस फॅट्स किंवा कृत्रिम स्निग्धपदार्थांचेही मधुमेहामध्ये सेवन करु नये. उदा. वनस्पती तूप सारख्या पदार्थात ट्रांस फॅट्सचे प्रमाण जास्त असते.
• साखरेचे गोड पदार्थ, गूळ, मध, विविध मिठाया, खव्याचे पदार्थ, बेकरी पदार्थ, केक, बिस्किटे, पाव, मैद्याचे पदार्थ यांपासून दूरच रहावे.
• आहारात मीठाचेही कमी प्रमाण ठेवावे.
• वडापाव, समोसा यासारखी तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
• मांसाहाराचे प्रमाण कमी करावे.
• कोल्ड्रिंक्स, हवाबंद पदार्थ, चिप्स-स्नॅक्स खाणे टाळा.
• केळी, चिकू, सीताफळ, फणस, आंबा ही जास्त गोड फळे शक्यतो टाळा.
• बटाटा, रताळे, गाजर, वांगी ह्या फळभाज्या खाऊ नयेत.
• एकाचवेळी भरपेट जेवणे टाळा. त्यापेक्षा दिवसातून चार ते पाच वेळा थोडे थोडे खावे.
• शिळे भोजन खाऊ नये.

मधुमेह आणि मांसाहार –

मांसाहारामध्ये चरबी म्हणजे सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल वाढून हार्ट अटॅक, पक्षाघात, हाय ब्लडप्रेशर हे आजार होण्याचा धोका जास्त वाढतो. त्यामुळे मधुमेह असल्यास मटण, चिकन, खेकडा, कोळंबी यासारखे मांसाहारी पदार्थ वारंवार खाणे टाळावे.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

मात्र आहारात मासे समावेश करू शकता. माशांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारे ओमेगा-3 फॅटी ऍसिड मुबलक असते. मात्र तळलेले मासे खाणे टाळावे यापेक्षा शिजवलेले मासे खावेत. अंडी खाताना अंड्यातील पिवळा भाग काढून टाकून फक्त पांढरा भाग आहारात समावेश करू शकता. पिवळ्या भागात कोलेस्टेरॉल असते त्यामुळे तो खाणे टाळावे. तर अंड्यातील पांढऱ्या भागात उच्च दर्जाचे प्रोटीन असून त्यात कोलेस्टेरॉल नसते.

मधुमेह असल्यास ही फळे खावीत –

मधुमेहामध्ये जास्त गोड असणारी फळे खाऊ नये. म्हणजे आंबा, फणस, चिकू, सीताफळ, रामफळ, केळी ही फळे खाणे टाळावे. फळांचे ज्यूस पिणेही टाळावे. मधुमेहात सफरचंद, डाळींब, जांभूळ, आवळा, संत्री, मोसंबी ही फळे खाऊ शकता.

मधुमेहाविषयी अधिक माहिती जाणून घ्या..
मधुमेह म्हणजे काय, त्याची कारणे, लक्षणे व त्यावरील उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.