अल्झायमर म्हणजे काय व अल्झायमरची कारणे, लक्षणे व उपचार – Alzheimer’s disease in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

अल्झायमर – Alzheimer’s disease :

अल्झायमर हा मेंदूशी संबंधित एक विकार असून तो प्रामुख्याने 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांत अधिक प्रमाणात आढळतो. अलझायमर आजारामुळे रुग्णाची स्मरणशक्ती हळूहळू कमी होत जाऊन विसराळूपणा अधिक वाढतो. काहीवेळा 65 पेक्षाही कमी वयाच्या लोकांना हा आजार होऊ शकतो.

अल्झायमर आजार होण्याची कारणे – Alzheimer’s causes :

अल्झायमर हा रोग कशामुळे होतो याचे निश्चित असे कारण शोधण्यात अद्यापही यश आले नाही. मात्र काही मेंदूरोग तज्ज्ञांच्या मतानुसार, मेंदूतील काही पेशीं ह्या वाढत्या वयाबरोबर मृत होत जातात व त्यामुळे मेंदूला काही सिग्नल पोहोचण्यास बाधा निर्माण होते यामुळे अलझायमरची स्थिती वयस्कर व्यक्तींमध्ये उद्भवते.

याशिवाय अल्झायमर होण्यासाठी अनुवंशिकताही कारणीभूत ठरू शकते. जर आपल्या कुटुंबात हा कोणालातरी अल्झायमर विकार झाल्याचा इतिहास असल्यास, आपल्याला हा रोग होण्याचीही अधिक शक्यता असते.

अल्झायमर आजार होण्याचा जास्त धोका कोणाला असतो..?

वयाच्या 65 वर्षानंतरच्या व्यक्ती, कुटुंबात अल्झायमरचा अनुवंशिक इतिहास असणाऱ्या व्यक्ती यांना अल्झायमर होण्याची शक्यता जास्त असते. तसेच पुरुषांपेक्षा महिलांना हा विकार होण्याचा धोका जास्त असतो.

याशिवाय मधुमेह, ह्रदय रोग, उच्च रक्तदाब, बॅड कोलेस्टेरॉलचे वाढलेले प्रमाण, लठ्ठपणा आणि डोक्याला दुखापत झालेल्या व्यक्तींना उतारवयात Alzheimer’s होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो.

अल्झायमरची लक्षणे – Alzheimer symptoms :

अल्झायमरच्या रोगाची लक्षणे हळूहळू वाढतात आणि जर त्यावर कोणतेही उपचार किंवा काळजी घेतली जात नसल्यास अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

अनेक पेशंटमध्ये खालील लक्षणे या आजारात प्रामुख्याने दिसून येतात.
• विसराळूपणा, स्मरणशक्ती कमजोर होणे.
• ‎अलीकडील घडलेल्या घटनाही विसरून जाणे. स्वतःचे नाव किंवा पत्ताही विसरून जाणे.
• ‎कोणत्याही गोष्टीवर निर्णय घेता न येणे.
• ‎योग्यरित्या बोलू शकत नाही.
• ‎वेळ आणि ठिकानाबद्दल गोंधळ उडतो.
• ‎जवळच्या लोकांनाही ओळखता येत नाही.
• ‎दररोजची कामे करण्यास जसे, कपडे घालणे, अंघोळ करणे, ड्रायव्हिंग करणे, पैशांचा व्यवहार करणे किंवा स्वयंपाक करणे यासारखी दररोजची कामे करताना अडचणी निर्माण होणे.
• ‎डिप्रेशन आणि तणावाखाली वावरणे.
• ‎झोप न लागणे यासारखी लक्षणे दिसून येतात.

आजही अल्झायमर ह्या विकाराविषयी आपल्याकडे अनेक लोकांना साधी माहीतीही नाही. त्यामुळे वरील लक्षणे जेंव्हा एखाद्या वृद्ध व्यक्तीमध्ये दिसून येतात तेंव्हा लोक ‘म्हातारा खुळा झालाय’ असे म्हणतात आणि उपचार न करता त्याला त्याच्या अवस्थेवर सोडून देतात. अशा वृद्ध व्यक्तींना त्यांचे परिवारातील लोक ओरडतात, मारहाणही करतात.

मात्र असे करू नका, म्हातारपण प्रत्येकाला येणार आहे. त्यामुळे त्या वृद्ध व्यक्तींना ‘माणूस’ म्हणून समजून घ्या त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊन अल्झायमर किंवा वृद्धवस्थेतील अन्य समस्यांवर उपचार करून घ्यावेत. आज देशात वाढणारी वृद्धाश्रमांची संख्या ही काही गौरवाची बाब नाही. महान भारतीय संस्कृतीची परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या वृद्ध आई-वडिलांची सेवा ही केलीच पाहिजे.

अल्झायमरचे निदान :

वयस्कर व्यक्तींमधील असलेल्या लक्षणांवरून याचे निदान डॉक्टर करतील तसेच मेंदूच्या तपासणीसाठी CT Scan, MRI किंवा PET यासारख्या चाचण्या करण्यात येतील.

अल्झायमर आजारावर हे आहेत उपचार – Alzheimer’s Treatment :

अल्झायमर आजार रोखण्यासाठी कोणतेही ठोस उपचार उपलब्ध नाहीत. मात्र रुग्णातील लक्षणे काही प्रमाणात कमी करण्यासाठी व नवीन त्रास होऊ नये यासाठी डॉक्टर औषधे आणि इतर उपचारांची शिफारस करू शकतात.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

आपल्याला भविष्यात अल्झायमर होऊ नये यासाठी अशी घ्यावी काळजी :

• समतोल पौष्टिक आहार घ्यावा.
• आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे यांचा समावेश असावा. त्यांमध्ये भरपूर प्रमाणात Vitamins आणि Anti-oxidants असते ते मेंदूच्या पेशींची उतारवयात होणारी हानी थांबवते.
• ‎नियमित व्यायाम करावा. व्यायाम केल्याने शरीरात ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते आणि त्यामुळे मेंदूच्या पेशींना रक्त आणि ऑक्सिजन योग्य प्रमाणात प्राप्त होते. तसेच व्यायामामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा यासारखे विकार आठोक्यात राहतात.
• ‎नियमित प्राणायाम, योगासने आणि ध्यान (Meditation) करावे. यामुळे स्मरणशक्ती चांगली राहण्यास आणि तणावमुक्त होण्यास मदत होते.
• ‎मानसिक ताणतणाव रहित राहा.
• ‎विविध कादंबऱ्या, पुस्तके वाचावीत त्यामुळे मेंदूच्या पेशी सक्रिय राहतात.
• ‎डोक्याला दुखापत होऊ देऊ नका.

 जर आपल्या घरात वृद्ध व्यक्ती असल्यास आणि त्यांच्यात अलझायमरची लक्षणे दिसत असल्यास, कृपया त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्या वृद्ध व्यक्तीवर ओरडणे किंवा राग काढण्याऐवजी, त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करून औषधोपचार सुरू करावेत.
उतारवयात होणाऱ्या कंपवात (Parkinson disease) ह्या आजाराविषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Alzheimer’s disease causes, symptoms and treatment information in Marathi.