पाईल्सवरील आयुर्वेदिक औषध उपचार : Ayurvedic Medicine and Home remedies for Piles in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

पाईल्स आणि आयुर्वेदिक औषध उपचार (Piles Ayurvedic treatment) :

पाईल्सच्या त्रासाला आयुर्वेदात अर्श किंवा मूळव्याध असे म्हणतात. Piles मध्ये संडासच्या ठिकाणच्या शिरा सुजतात त्यामुळे त्याठिकाणी वेदना, जळजळ होत असते. आयुर्वेदात पाईल्सचे शुष्क अर्श आणि रक्तार्श असे दोन मुख्य प्रकार सांगितले आहेत.

शुष्क अर्श यामध्ये पाईल्सच्या त्रासात कोंब येणे, गुदभागाच्या नसा सुजणे, त्याठिकाणी आग, जळजळ व वेदना अशी लक्षणे असतात. तर रक्तार्श मध्ये वरील लक्षणांबरोबरच मलविसर्जन करताना शौचावाटे रक्तही जात असते.

पचनास जड असणारे पदार्थ खाणे, अतिप्रमाणात तिखट, मसाल्याचे पदार्थ खाणे, मलावष्टंभ, बैठे काम, वाढलेले वजन अशा कारणांमुळे पाईल्सचा त्रास सुरू होतो. पाईल्सच्या त्रासात असह्य वेदना होत असतात. यासाठी येथे पाईल्सवरील आयुर्वेदिक औषध उपचार आणि आयुर्वेदिक उपायांची माहिती दिली आहे.

पाईल्सवर हे करा आयुर्वेदिक उपाय आणि औषध उपचार :

एरंडाची पाने –
मीठ घातलेल्या कोमट पाण्यातून एरंडाची दोन पाने स्वच्छ धुवून ती पाने बारीक करावीत. त्यानंतर मिक्सरमधून थोडे पाणी घालून मिश्रण तयार करावे. त्यानंतर स्वच्छ फडक्याच्या साहाय्याने मिश्रण गाळून घ्यावे. हा तयार केलेला आयुर्वेदिक रस सलग चार दिवस सकाळी उपाशीपोटी घ्यावा. पाईल्सवर हे अत्यंत गुणकारी असे आयुर्वेदिक औषध आहे.

ताक –
पाईल्समध्ये आहारात ताकाचे सेवन करणे हितकारक असते. यासाठी ताकाबरोबर उकडलेले सुरण काही दिवस घेतल्यास पाईल्सपासून सुटका होण्यास मदत होते. याशिवाय जिरेपूड घालून ताक पिणेही उपयोगी ठरते.

कोरपड – 
कोरपडीच्या गरात सूज कमी करणारे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. त्यामुळे पाइल्समध्ये गुदाच्या ठिकाणी आलेली सूज व जळजळ कमी होण्यास मदत होते. यासाठी गुदाच्या ठिकाणी थोडासा कोरपडीचा गर लावून हळूवारपणे मालिश करावी.

जिरेपूड –
पाईल्स असल्यास जिरे भाजून त्याची बारीक पूड करावी. एक चमचा जिरेपूड ग्लासभर कोमट पाण्यात घालून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण रोज सकाळी उपाशीपोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी काही दिवस नियमित प्यावे.

त्रिफळा चूर्ण –
पाईल्समध्ये पोट साफ न होत असल्यास अर्धा कप कोमट पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण कालवून ते मिश्रण रोज रात्री झोपण्यापूर्वी घ्यावे. यामुळे सकाळी व्यवस्थित पोट साफ होण्यास मदत होते.

दुर्वा –
दुर्वा बारीक कुटून त्या गायीच्या एक कप दुधात उकळाव्यात. त्यानंतर मिश्रण गाळून घेऊन थोडे थंड झाल्यावर प्यावे. यामुळेही पाईल्सचा त्रास कमी होण्यास मदत होते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

पाईल्स आणि आयुर्वेदिक पथ्य :

पाईल्सचा त्रास असल्यास पचनास हलके असणारे पदार्थ खावेत. आहारात तांदूळ, ज्वारी, मूग, कुळीथ, जिरे, हळद, मुळा, दुधीभोपळा, पालक, सुरण, अंजीर, दूध, ताक, लोणी, तूप यासारखे पदार्थ असावेत.

पाईल्स आणि आयुर्वेदिक अपथ्य :

पाईल्समध्ये पचनास जड असणारे पदार्थ, तिखट व मसालेदार पदार्थ, बेकरी प्रोडक्ट खाणे टाळावेत. मांसाहार, चिकन खाणे शक्यतो टाळावे. मटार, वाल, पावटा, चवळी, उडीद, चणे यासारखी जड कडधान्ये खाणे टाळावे.

Information about Piles ayurvedic treatment, medicine and home remedies in Marathi.