Health benefits and side effects Curd in Marathi.
दही – Yogurt :
दही हा एक दुग्धजन्य पदार्थ असून दही खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे असतात. दह्यात कॅल्शियम, व्हिटॅमिन-B12, राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन-D, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस यासारखी अनेक उपयुक्त पोषकतत्वे व मिनरल्स असतात.
आयुर्वेदानुसार दही हे आंबट-मधुर रसाचे, पचावयास जड, उष्ण गुणाचे, पित्त वाढवणारे असते. रुचिकारक असल्याने अरुचि या विकारामध्ये लाभदायक असते. दही खाण्यामुळे शरीरातील मेद, बल, शुक्राची वृद्धि होते. दह्याचे आरोग्यदायी फायदे व तोटे याविषयी माहिती खाली दिली आहे.
दही खाण्याचे फायदे –
आरोग्यासाठी दह्याचे फायदे अनेक आहेत. दही खाण्यामुळे तोंडाला रुची येते, अन्नाचे पचन होते, भूक वाढते. दह्यामुळे हाडे मजबूत होतात, रोग प्रतिकारशक्ती वाढते. रक्तदाब नियंत्रित राहतो, चांगले कोलेस्टेरॉल वाढते. दही खाण्यामुळे वजन आटोक्यात राहते.
1) दही खाण्यामुळे हाडे मजबूत होतात.
दह्यात कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन-D चे मुबलक प्रमाण असते. त्यामुळे दही खाणे हे आपल्या हाडांच्या व दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. याशिवाय दही खाण्यामुळे हाडे ठिसूळ होऊन ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोकाही कमी होतो.
2) दही खाण्यामुळे पचनक्रिया सुधारते.
दह्यात प्रोबायोटिक्स हे घटक असतात. त्यामुळे दही खाण्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होण्यास मदत होते. दही खाण्यामुळे पोटफुगी, अतिसार, बद्धकोष्ठता यासारख्या पचनासंबंधी समस्या दूर होतात. याशिवाय तोंडाला चव नसल्यास व काहीही खाण्याची इच्छा होत नसल्यास दही खाणे उपयुक्त ठरते. दही खाण्यामुळे तोंडाला रुची येण्यास मदत होते.
3) दही खाण्यामुळे रोग प्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढते.
दह्यात प्रोबायोटिक्स या घटकाबरोबरचं विविध व्हिटॅमिन्स आणि मिनरल्ससुद्धा भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे दही खाण्यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती अर्थात इम्युनिटी वाढण्यास मदत होते.
4) दही हृदयासाठी फायदेशीर असते.
दह्यात सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण अधिक असते. असे असूनही दही खाण्यामुळे रक्तातील चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यास व रक्तदाब आटोक्यात राहत असल्याचे संशोधनातून सिद्ध झालेले आहे. याविषयी माहिती PubMed Central ह्या जगविख्यात आरोग्यविषयक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेली आहे. ब्लडप्रेशर नियंत्रित राहणे आणि गुड कोलेस्टेरॉल वाढणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे दही खाणे हे हृदयासाठीही फायदेशीर असते.
5) दही खाण्यामुळे वजन आटोक्यात राहते.
दह्यामध्ये प्रोटिन्सचे प्रमाणसुद्धा भरपूर असते. साधारण 200 ग्रॅम दह्यातून 12 ग्रॅम प्रोटिन्स मिळते. यातील प्रोटिन्समुळे दही खाल्याने, पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे भूक नियंत्रित होते व पर्यायाने वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.
6) दही गरोदर महिलांसाठी फायदेशीर असते.
गर्भवती महिलांच्या आहारात दह्याचा जरूर समावेश करू शकता. प्रेग्नन्सीमध्ये रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन नियंत्रित होण्यासाठी दही प्रभावी ठरते.
दही खाण्यामुळे होणारे नुकसान –
जास्त प्रमाणात दही खाणे आपल्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते. काहीवेळा अधिक प्रमाणात दही खाल्यास आहारातील लोह (आयर्न) आणि जस्त हे मिनरल्स शरीरात शोषण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जास्त प्रमाणात दही खाणे टाळावे.
दही कोणी खाऊ नये..?
ज्या लोकांना सांधेदुखीची समस्या आहे त्यांनी दही खाणे टाळले पाहिजे. तसेच ज्यांना दूध व दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी आहे त्यांनीही दही खाणे टाळले पाहिजे. सर्दी, खोकला अशा समस्या असल्यास दही खाऊ नये.
दही कधी खावे व कधी खाऊ नये..?
दह्याचे फायदे अनेक असले तरीही काहीवेळा दही खाण्यामुळे अपाय होण्याचीही शक्यता असते. यासाठी दही खाण्याची योग्य वेळ आयुर्वेदाने सांगीतली आहे. आयुर्वेदानुसार रात्री कधीही दही खाऊ नये. कारण रात्रीच्या वेळी प्रामुख्याने कफाचे प्राबल्य असते. रात्रीच्या वेळी दही खाल्याने पचनासंबंधीत अनेक तक्रारी होण्याची शक्यता यामुळे असते. त्यामुळे शक्यतो रात्री दही खाऊ नये. याशिवाय पावसाळ्याच्या दिवसातही दही खाऊ नये.
कोणत्या पदार्थासोबत दही खाऊ नये..?
दह्यासोबत काहीपदार्थ एकत्रित खाणे टाळले पाहिजे. कारण काहीवेळा असे पदार्थ दह्यासोबत खाल्ले गेल्यास ते अपायकारक ठरून पोटाच्या तक्रारी होऊ शकतात. त्यामुळे आंबे, केळी, इडली, डोसा, उडदाची डाळ असे पदार्थ कधीही दह्याबरोबर खाऊ नयेत.
खण्याकरिता शक्यतो घरात तयार केलेल्या ताज्या दह्याचा वापर करावा. बाजारातील दह्यामध्ये अतिरिक्त साखर घातली जाऊ शकते. अशा दह्यामुळे वजन वाढण्याची समस्या होऊ शकते. तसेच डायबेटीस रुग्णांसाठीही बाजारातील दही योग्य नसते. याशिवाय योग्यरीत्या न विरजलेले कच्चे दहीही खाऊ नये. दही कधीही गरम करुन खाऊ नये तसेच दररोज दही खाऊ नये.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुद्धा वाचा..
लसूण खाण्याचे फायदे जाणून घ्या..
In this article information about health benefits of Yogurt in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.