मध – Honey :

अनेक वर्षांपासून मधाचा आहार आणि औषधांमध्ये वापर केला जात आहे. आयुर्वेदातही मधाचे असाधारण महत्त्व दिलेले आहे. मधमाशा फुलांतील मध गोळा करून आपल्या पोळ्यामध्ये साठवत असतात. मधात अनेक उपयुक्त पोषकतत्वे असतात. एक चमचा मधातून 67 कॅलरीज ऊर्जा आणि 17 ग्रॅम फ्रुक्टोज मिळत असते. मधात फॅटचे प्रमाण शुन्य टक्के असते. मध खाण्यामुळे आरोग्यासाठी होणारे फायदे याविषयी माहिती खाली दिली आहे.

मध खाण्याचे फायदे – Honey uses in Marathi :

उपयुक्त अँटीऑक्सिडंट्स मिळतात..
मधात फ्लेव्होनॉइड्स (फेनोलिक कम्पाउंड) व ऑरगॅनिक ऍसिड्स यासारखी अनेक महत्त्वाची अँटीऑक्सिडंट्स असतात. अँटीऑक्सिडंट्समुळे हार्ट अटॅक, पक्षाघात आणि कॅन्सर यासारख्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते. याशिवाय इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासही मधामुळे मदत होते.

ब्लडप्रेशर आटोक्यात ठेवते..
उच्च रक्तदाबामुळे हृदयाच्या अनेक समस्या उदभवू शकतात. यासाठी रक्तदाब नियंत्रित असणे आवश्यक असते. मधात असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्समुळे रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते.

वाईट कोलेस्टेरॉल कमी करते..
रक्तामध्ये LDL प्रकारच्या वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असल्यास हार्ट अटॅक, हाय बीपी आणि पक्षाघाताचा धोका अधिक वाढतो. मध खाण्यामुळे रक्तातील बॅड कोलेस्टेरॉल व triglycerides चे प्रमाण कमी होते. तसेच मधामुळे HDL प्रकारच्या गुड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

हृदयासाठी उपयुक्त..
मधात असणारे अँटीऑक्सिडंट्स हे आपल्या हृदयासाठी खूपच फायदेशीर ठरतात. यामुळे विविध प्रकारचे हृदयविकार होण्यापासून रक्षण होण्यास मदत होते. याशिवाय मधामुळे ब्लडप्रेशर आटोक्यात राहतो तसेच वाईट कोलेस्टेरॉल कमी होत असल्याने एकूणच मधाचा वापर हा हृदयाच्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतो.

सर्दी-खोकल्यावर गुणकारी..
सर्दी होणे, खोकला लागणे, घसा बसणे किंवा घशात खवखवणे या समस्येवर मधाचा वापर गुणकारी असतो. मधात असणाऱ्या अँटीबायोटिक गुणधर्मामुळे सर्दी, खोकल्याची समस्या लवकर दूर होते. या समस्येत मधाबरोबर लवंग, आले, सुंठ किंवा तुळशी यांचा वापर केल्यास जास्त फायदेशीर ठरते.

त्वचेसाठी फायदेशीर..
त्वचा मऊ व मुलायम होण्यासाठी मध उपयोगी पडते. मधाच्या वापराने त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझ होत असल्याने चेहऱ्यावरसुद्धा मध लावू शकता. यामुळे चेहरा तजलेदार होण्यास मदत होते. चेहऱ्यावरील पिंपल्स, सुरकुत्या पडणे यासारख्या समस्यासुद्धा यामुळे दूर होतात.

पोटाच्या विकारावर उपयोगी..
उपाशीपोटी मध खाल्याने बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होतात. नियमित पोट साफ होण्यासाठी उपाशीपोटी मध खाणे फायदेशीर असते.

वजन कमी करण्यास मदत करते..
वजन कमी करण्यासाठी साखरेचे गोड पदार्थ खाणे कमी करणे गरजेचे असते. अशावेळी आपण साखरेऐवजी हेल्दी असणाऱ्या मधाचा आहारात वापर करून वजन आटोक्यात ठेऊ शकता. याशिवाय मधातील अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरातील फॅट आणि कोलेस्टेरॉल यांमधील चयापचय वाढते. त्यामुळे अतिरिक्त चरबी व कोलेस्टेरॉल मध खाण्यामुळे कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी दररोज उपाशीपोटी ग्लासभर कोमट पाण्यात लिंबू रस आणि मध मिसळून प्यावे.

जखम भरण्यास मदत करते..
भाजणे किंवा अन्य कारणांमुळे त्वचेवर जखम झाल्यास त्याठिकाणी मध लावल्यास जखम लवकर भरून येण्यास मदत होते. डायबेटिक फूट अल्सरची समस्या असल्यास जखमेच्या ठिकाणी मध लावणे उपयोगी असते.

झोपेच्या समस्या दूर करते..
व्यवस्थित झोप लागत नसल्यास किंवा झोपमोड होत असल्यास रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मध खावा. यासाठी आपण ग्लासभर गरम दुधात चमचाभर मध मिसळून ते दूध झोपण्यापूर्वी पिऊ शकता. यामुळे झोपेच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

मध खाण्यामुळे होणारे नुकसान :

मधात अनेक उपयुक्त पोषकतत्वे असतात. मात्र असे असूनही मधाचा योग्य प्रमाणात वापर करणे आवश्यक असते. मध खाण्यामुळे होणारे तोटे याची माहिती खाली दिली आहे.

रोज मध अधिक प्रमाणात खाल्याने पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे अतिसार, गॅसेस यासारख्या समस्या होऊ शकतात. याशिवाय रक्तातील साखरेचे प्रमाणही जास्त वाढू शकते.

मध खाण्यामुळे काही लोकांना ऍलर्जी होऊ शकते. काहीवेळा कीटकनाशके फवारलेल्या फुलांतुनही मधमाशा मध गोळा करून आणू शकतात. असा मध खाण्यात आल्यास यामुळे ऍलर्जी होऊन त्वचेवर खाज सुटणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या होऊ शकतात.

मध कोणी खाऊ नये..?

एक वर्षाच्या आतील बालकांना कधीही मध देऊ नये. मधामुळे अशा बाळांमध्ये बोटुलिज़्मची समस्या होत असते. याशिवाय डायबेटीसच्या रुग्णांनीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मध खाऊ नये.

डायबेटीस आणि मध :

मधुमेह असणारे रुग्ण मध खाऊ शकतात की नाही याविषयी अनेकांचे प्रश्न असतात. मधुमेहात इन्सुलिनच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवले जात नाही. त्यामुळे रक्तात साखरेचे प्रमाण अधिक वाढू लागते. म्हणूनचं मधुमेही रुग्णांनी साखरेचे पदार्थ खाणे टाळणे आवश्यक असते. नेहमीच्या साखरेपेक्षा मध हा निश्चितच उपयुक्त असतो. मात्र मधातसुद्धा फ्रुक्टोज आणि ग्लुकोज अशा नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे डायबेटीस असल्यास आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मध खाऊ नये. डायबेटीसविषयी अधिक माहिती जाणून घ्या..

गर्भावस्था आणि मध :

गरोदरपणात मध खावा की नाही याविषयी अनेक गर्भवती स्त्रियांचा प्रश्न असतो. मधामुळे सर्दी, खोकला यासारख्या समस्येवर मध गुणकारी असते तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्याससुद्धा यामुळे मदत होत असते. प्रेग्नन्सीमध्ये आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने काही प्रमाणात मध खाऊ शकता. प्रेग्नन्सीत मध हे सुरक्षित असते. मात्र अधिक प्रमाणात मध खाणे टाळले पाहिजे. तसेच जर गर्भवतीला गरोदरपणातील मधुमेह असल्यास मध खाणे टाळावे.

शुद्ध व चांगला मध कसा ओळखावा..?

चांगला मध हा आरोग्यासाठी गुणकारी असतो तर भेसळयुक्त मध घातक ठरू शकतो. यासाठी मध हा शुद्ध नैसर्गिक आहे की भेसळयुक्त ते तपासून पाहावे लागते. काही सोप्या टेस्ट करून मधाची गुणवत्ता तपासता येणे शक्य आहे. मधामध्ये साखर, गूळ, काकवी यासारखे पदार्थ मिसळून मधाची भेसळ केली जाते. भेसळयुक्त मध खाल्याने घशात खवखव होणे या समस्या होऊ शकतात.

काचेच्या ग्लासात पाणी घेऊन त्यामध्ये मधाचे काही थेंब टाकावे. मध जर पाण्यात न मिसळता ग्लासात तळाशी जाऊन बसल्यास तो शुद्ध मध आहे असे समजावे. आणि जर मध पाण्यात विरघळल्यास ते भेसळयुक्त आहे असे समजावे.

त्याचप्रमाणे हाताच्या अंगठ्यावर मधाचा एक थेंब टाकून थोडे निरीक्षण केल्यास मधाची गुणवत्ता तपासता येईल. भेसळयुक्त मधाचा थेंब अंगठ्यावर पसरतो तसेच अंगठा उलटा केल्यास मध खाली सांडतो. याशिवाय शुद्ध मधात कापूस भिजवून त्याची वात पेटवल्यास आवाज न होता कापूस जळू लागतो. मात्र जर भेसळयुक्त मध असल्यास वात जळताना ‘तडतड’ असा आवाज होऊ लागतो. कारण त्यामध्ये पाण्याचे प्रमाण असते.

कॉपीराइट - डॉ. सतीश उपळकर
(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

हे सुद्धा वाचा..
जवस खाण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Information about health benefits of honey in Marathi language.