फिशरची लक्षणे, कारणे, उपचार व फिशरवरील घरगुती उपाय – Anal Fissure treatments in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

फिशर – Anal Fissure in Marathi :

फिशरमध्ये गुदाच्या ठिकाणी चीर पडत असते. त्यामुळे त्याठिकाणी तीव्र वेदना व रक्तस्राव होत असतो. या त्रासात शौचावेळी संडसवाटे रक्त पडत असते. फिशरचा त्रास हा फारसा गंभीर नसून ही समस्या अनेक लोकांना असते.

बहुतेकवेळा साधारण चार ते सहा आठवड्यात गुदद्वारात पडलेली चीर आपोआप बरी होऊन फिशरचा त्रास दूर होत असतो. तसेच आठ आठवड्यानंतरही हा त्रास जाणवत असल्यास त्याला क्रॉनिक प्रकारचा फिशर असे म्हणतात.

फिशरची लक्षणे – Symptoms of anal fissure :

• गुदाच्या ठिकाणी चीर पडणे,
• गुदभागी चीर पडून जखम झाल्याने तेथे वेदना होणे,
• गुदातून रक्त जाणे,
• गुदभागी बारीक फोड जाणवणे,
• गुदभागी आग, जळजळ व खाज होणे अशी लक्षणे फिशरमध्ये जाणवतात.

फिशर होण्याची कारणे – Causes of anal fissure :

फिशरची समस्या होण्यासाठी बद्धकोष्ठता (Constipation) हे प्रमुख कारणे असते. नियमित पोट साफ न झाल्याने मलाचा खडा धरत असतो आणि शौचावेळी घट्ट झालेला मल बाहेर येताना गुदावर अधिक ताण पडतो. त्यामुळे गुदाच्या ठिकाणी चिरा पडून फिशरची समस्या सुरू होते.

याशिवाय अतिसार, इन्फ्लामेट्री बोवेल डिसीज (IBD), Crohn’s डिसीज, अल्सरेटिव कोलाइटिस, Syphilis, गुद भागातील अपुरा रक्तपुरवठा, प्रेग्नन्सी, गुदाचा कर्करोग, जास्त टाईट अंडरवेअर किंवा पॅन्ट वापरल्याने, अधिकवेळ एकचठिकाणी बसणे, दुचाकीवरून अतिप्रवास करणे अशा कारणांमुळेही ही समस्या होत असते.

फिशरचे निदान :

फिशरची लक्षणे मूळव्याध सारखीच थोडीफार असतात. त्यामुळे लक्षणे व गुदाची तपासणी करून डॉक्टर फिशरचे निदान करतात. मूळव्याधविषयी माहिती व उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..

फिशरवर हे आहेत उपचार – Fissure treatment :

फिशरवरील उपचारामध्ये गुदाच्या ठिकाणी पडलेली चीर लवकर बरी होण्यासाठी औषधे व क्रीम दिली जाते. याशिवाय होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी व मलाचा खडा होऊन शौचावेळी त्रास अधिक वाढू नये यासाठी मल पातळ करण्यासाठी औषधे दिली जातात. जर औषध उपचारांनी फिशरचा त्रास कमी होत नसल्यास सर्जरीचा पर्याय निवडला जातो.

फिशरवर हे करा घरगुती उपाय – Fissure home remedies :

• ऑलिव्ह ऑइलमध्ये मध मिसळून ते मिश्रण दिवसातून दोनवेळा फिशरच्या ठिकाणी लावावे.
• कोरपडीचा गर (एलोवेरा जेल) दिवसातून दोनवेळा लावणेही उपयोगी असते.
• गुदाच्या ठिकाणी खोबरेल तेल लावल्यासही फिशरचा त्रास कमी होण्यास मदत होते.
• पोट साफ होत नसल्यास रोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा आयुर्वेदिक त्रिफळा चूर्ण ग्लासभर कोमट पाण्यातून घ्यावे. फिशरसाठी हे घरगुती उपाय उपयुक्त ठरतात.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

फिशर आणि आहार – Fissure diet plan :

फिशरचा त्रास असल्यास योग्य आहार घेणेही आवश्यक असते. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, फळभाज्या, शेंगभाज्या यांचा आवर्जून समावेश करावा. कारण यात फायबर्सचे प्रमाण अधिक असते. फायबर्समुळे व्यवस्थित त्रास न होता पोट साफ होण्यास मदत होते. याबरोबरच दिवसभरात पुरेसे म्हणजे किमान आठ ग्लास पाणी प्यावे.

फिशरमध्ये अशी घ्यावी काळजी – Fissure care tips :

• आहारात फायबर्सयुक्त पदार्थांचाचा समावेश असावा. यासाठी हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळे खावीत.
• दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.
• बद्धकोष्ठता होण्यासाठी जबाबदार असणारे पदार्थ म्हणजे बेकरी प्रोडक्ट, फास्टफूड, मांसाहार, पचनास जड असणारे पदार्थ खाऊ नये.
• शौचावेळी जास्त जोर लावू नये.
• सैलसर अंडरवेअरचा वापर करावा.
• अधिकवेळ एकचठिकाणी बसणे टाळावे.
• दुचाकीवरून जास्त प्रवास करू नये.
• गुदाच्या ठिकाणी खाज होत असल्यास त्याठिकाणी खाजवणे टाळावे. कारण यामुळे तेथे जखम होत असते.

Information about Anal Fissure symptoms, causes & treatments in Marathi language.

वरील माहिती आपणास आवडल्यास आमचे Youtube चॅनेल subscribe जरूर करा. असेच उपयुक्त माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपणास मोफत उपलब्ध होतील. यासाठी खालील YouTube बटनावर क्लिक करा..