तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती

Health Benefits of Drinking Water in Copper Vessel in Marathi.

दररोज तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे फायदे :

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात कमीत कमी 8 तास ठेवलेले पाणी प्यायल्यास शरीरातील विविध अपायकारक घटक बाहेर फेकण्यास मदत होते. शरीरातील अशुद्धी दूर झाल्याने यकृत आणि किडनी निरोगी राहण्यास मदत होते. 

शरीरातील अशुद्धी दूर होते..
दररोज सकाळी उपाशीपोटी ग्लासभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिल्यामुळे पित्ताचा त्रास कमी होऊन वारंवार होणारी डोकेदुखी, अर्धशिशी (मायग्रेन), पोटाचे विकार कमी होण्यास मदत होते. या पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात. त्यामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत होते.

पोटाच्या विकारांवर उपयोगी..
पोटाचे कोणतेही विकार झाल्यास तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. तांब्याच्या भांड्यातील पाण्यामुळे पोटदुखी, गॅस, अॅसिडिटी आणि पोट साफ न होणे (बद्धकोष्ठता) यांसारख्या समस्यांवर आराम मिळतो.

रक्त वाढवते..
दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यामुळे रक्ताच्या कमतरतेमुळे होणाऱ्या ऍनिमिया ह्या आजारात तांब्याच्या भांड्यातील पाणी उपयुक्त ठरते.

थायरॉईडच्या त्रासात उपयुक्त..
तांब्यामधील पाणी पिल्याने थायरॉक्सिन हार्मोन्सला संतुलित ठेवण्यास मदत होते. यामुळे थायरॉइडचाही धोका दूर होतो. थायरॉईडचा त्रास असणाऱ्यांनी रात्री तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यावे.

हृदयविकारापासून दूर ठेवते..
तांब्याच्या भांड्यात 8 ते 10 तास ठेवलेले पाणी प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण नियंत्रणात राहते, ब्लड प्रेशर नियंत्रित होते त्यामुळे हृदयविकारापासून बचाव होण्यास मदत होते.

संधीवातात उपयोगी..
तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे शरीरातील वेदना आणि सूज कमी होते. त्यामुळे संधिवात असल्यास तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने फायदा होतो. यासाठी रोज सकाळी व संध्याकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. तसेच तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने शरीरातील युरीक अॅसिड कमी होण्यास मदत होते. यामुळे गाऊट (वातरक्त) या युरिक ऍसिड वाढल्यामुळे सांध्यांच्या ठिकाणी होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होते.

त्वचेच्या विकारांवरही उपयुक्त..
दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येत नाहीत, त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य टिकण्यास मदत होते शिवाय त्वचेच्या विविध समस्या, फोड्या, तारुण्यापीटिका होत नाहीत. 

कँसरपासून दूर ठेवते..
तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात, यामुळे कँसरपासून दूर राहाण्यास मदत होते. अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, कॅन्सरची सुरुवात रोखण्यास तांबे फायदेशीर आहे. त्यामुळे तांब्याच्या भांड्यातील पाण्यात कॅन्सरविरोधी घटक असतात.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

तांब्याची भांडी वापरताना ही खबरदारी बाळगा..

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे आरोग्यासाठी अनेक चांगले फायदे आहेत. मात्र जर आपण तांब्याची भांडी जेवण करण्यासाठी वापरत असाल तर ते धोकादायक आहे कारण त्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते. तांब्याच्या भांड्यात जेवण तयार केल्यास त्या आहाराचा वाईट विषारी परिणाम (Toxic) आपल्या शरीरावर होऊ शकतो.
• तांब्याच्या भांड्यात जेवण तयार करणे किंवा तयार केलेले अन्न तांब्याच्या भांड्यात ठेऊ नये.
• शक्यतो कोणतेच अन्नपदार्थ तांब्याच्या भांड्यात ठेऊ नये. विशेषतः ताक, दही, आंबट पदार्थ अशा भांड्यात ठेऊ नयेत.
• जर एखाद्या भांड्याला बाहेरील बाजूने तांबे व आतील बाजूने स्टेनलेस स्टील वैगरे धातू असल्यास अशी भांडी आपण जेवणासाठी वापरू शकतो.
• शरीराला जशी लोह वैगरे खनिजांची गरज असते तशी तांब्याचीही काही प्रमाणात गरज असते. पूर्ण वाढ झालेल्या व्यक्तींना दिवसाला साधारण 900 mcg इतकी तांबे ह्या खनिजाची गरज असते. मात्र त्यापेक्षा अधिक प्रमाणात तांबे शरीरात गेल्यास विषारी परिणाम होऊ शकतात.
• अधिक प्रमाणात तांबे शरीरात गेल्यास त्यामुळे मळमळणे, उलट्या होणे आणि अतिसार यासारखी लक्षणे होऊ शकतात.

हे सुद्धा वाचा..
गरम पाणी पिण्याचे फायदे जाणून घ्या.
पित्ताचा त्रास कमी करण्याचे उपाय जाणून घ्या.

Amazing Health Benefits of Drinking Water From Copper Vessel in Marathi Information side effects of drinking water from copper vessel.

© लेखक- डॉ. सतीश उपळकर
ही माहिती आपणास आवडल्यास आमचे Youtube चॅनेल subscribe जरूर करा. असेच उपयुक्त माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपणास मोफत उपलब्ध होतील. यासाठी खालील YouTube subscribe बटनावर क्लिक करा.