एनीमिया आजार मराठीत माहिती (Anemia in Marathi)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Anemia in Marathi information, Anemia Causes, Types, Symptoms, Diet, and Treatment in Marathi.

एनीमिया म्हणजे काय..?

एनीमिया हा विकार रक्ताल्पता, पांडूरोग (रक्ताच्या कमतरतेमुळे शरीर पांढरे पडते), रक्तक्षीणता, अरक्तता या अन्य नावांनीसुद्धा ओळखला जातो. एनीमिया या विकारामध्ये रक्तातील तांबड्या पेशींची (RBC) संख्या कमी होते. तसेच RBC मधील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते.

हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनला तांबड्या पेशींमार्फत शरीरातील उतींपर्यंत पोहचवण्याचे महत्वाचे कार्य करत असतो. मात्र कोणत्याही कारणाने RBCची संख्या कमी होते किंवा रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते तेंव्हा शरीरातील उतींपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही. हिमोग्लोबिनचे प्रमाण कसे वाढवावे ते जाणून घ्या..

एनीमिया प्रकार आणि कारणे :

Types of Anemia in Marathi
अनीमियाचे अनेक प्रकार असून ते अनेकविध कारणांनी होतात. जसे,
1) Iron deficiency Anemia – रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे होणारा एनीमिया.
2) ‎Pernicious Anemia – विटामिन B12 च्या कमतरतेमुळे होणारा अनीमिया.
3) ‎Megaloblastic Anemia – फॉलिक एसिडच्या कमतरतेमुळे होणारा एनीमिया.
4) ‎Sickle cell diseases, Thalassemia – अनुवंशिक कारणांमुळे ह्यां प्रकारचा एनीमिया होतो

अनीमियाची अन्य सहाय्यक कारणे :
Anemia Causes in Marathi
• रक्तस्त्राव झाल्याने अनीमिया उद्भवू शकतो. प्रामुख्याने अपघात, शस्त्रक्रिया, विविध कैन्सर, अल्सर, मुळव्याध, मासिक पाळी यांमुळे होणाऱया रक्तस्त्रावामुळे अनीमिया उद्भवतो.
• ‎विविध विकारांमध्ये अनीमिया हे लक्षण आढळते. जसे किडनी फेल्युअर, आमवात, संक्रामक TB, विविध कैन्सर, हायपोथायरॉडिजम, रोग प्रतिकारक क्षमतेचे विकारांमध्ये रक्ताल्पता अनीमिया हे लक्षण आढळते.
• ‎भोजनातील लोह, विटामिन B12, फॉलिक एसिडच्या कमतरतेमुळे,
• ‎योग्य वयापुर्वीच गर्भावस्था येणाऱया स्त्रियांमध्ये,
• ‎मासिकस्त्रावावेळी अधिक रक्त स्त्राव झाल्याने महिलांमध्ये,
• ‎अतड्यांतील कृमींमुळे,
• ‎रक्तस्त्रावयुक्त मुळव्यधीच्या विकारांनी पिडीत रुग्णांमध्ये अरक्तता उत्पन्न होते.

ऍनिमिया लक्षणे :

Anemia Symptoms in Marathi
• शरीर पांढरे पडणे, त्वचा पांढरी, निस्तेज होणे,
• ‎चक्कर येणे,
• ‎शारीरीक दुर्बलता, थकवा जाणवणे,
• ‎छातीत धडधडणे,
• ‎रुग्ण भरभर श्वास घेऊ लागतो (Breathlessness)
• ‎भूक मंदावणे,
• ‎चेहरा, पाय, शरीरावर सुज आलेली आढळते,
• ‎अल्प परिश्रमानेसुद्धा धाप लागणे,
• ‎त्वचा, नखे निस्तेज रुक्ष होतात, नखे सहज तुटु लागतात, नखे चपटी होतात ही लक्षणे अनीमिया मध्ये व्यक्त होतात.

अनीमियाचे निदान कसे करतात..?

Anemia diagnosis test in Marathi
पेशंट हिस्ट्री, व्यक्त लक्षणे, शारीरीक तपासणीद्वारे अनिमियाच्या निदानास सुरवात होते. याशिवाय खालिल वैद्यकिय चाचण्यांचा अनीमियाच्या निदानासाठी आधार घ्यावा लागतो.
रक्त परिक्षण – CBC test यामध्ये, रक्तातील तांबड्या पेशींची RBC संख्या मोजली जाते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासले जाते, रक्तातील B12, फॉलिक एसिड, लोह यांचे प्रमाण तपासले जाते. अनीमियाच्या निदानासाठी कधीकधी मल-मूत्र परिक्षणसुद्धा करणे गरजेचे असते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

हिमोग्लोबिनचे नॉर्मल प्रमाण किती असावे..?

पुरुषांमध्ये 13.5 ते 17.5 तर स्त्रियामध्ये 12.0 ते 15.5 इतके हिमोग्लोबिनचे प्रमाण आवश्‍यक असते. हिमोग्लोबिन हा रक्तातील अतिशय महत्त्वाचा घटक असून, तो ‘आयर्न’ (लोह) आणि ‘प्रोटीन’ (प्रथिने) यापासून बनलेला असतो.

अनीमिया उपचार मार्गदर्शन :

Anemia treatments in Marathi
अधिक काळापर्यंत अनीमियाची स्थिती राहिल्यास, शारीरीक दुर्बलता निर्माण होते, कार्य करण्याची क्षमता कमी होते, हृद्यावर अनिष्ट परिणाम होतात. त्यामुळे यावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते. शारीरीक दुर्बलता कमी करण्यासाठी उपचार योजले जातात. पूरक औषधे, व्हिटॅमिन दिले जाते. रक्ताल्पतेसाठी रुग्णास रक्त चढवले जाते, ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो.

ऍनिमिया होऊ नये म्हणून काय करावे, कोणता आहार घ्यावा..?

Anemia Prevention in Marathi
• पोषकतत्वयुक्त संतुलित आहार घ्यावा. विशेषता लोह, फॉलिक एसिड, जीवनसत्व ब12 ह्या पोषकतत्वांनी युक्त आहार घ्यावा.
• ‎खाण्यामध्ये लोह आणि प्रोटीनसारख्या भरपूर तत्त्वाचा वापर करुन हिमोग्लोबिनचा स्तर वाढवता येऊ शकतो.
• ‎बीट, काळ्या मनुका, खजूर, आंबा, पेरू, सफरचंद यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते.
• ‎हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी जास्तीत-जास्त हिरव्या भाज्या खाल्या पाहिजे. या व्यतिरिक्त तीळ, पालक, दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, नारळ, शेंगदाणे, गुळ, मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा यांमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढेल.
• ‎मद्यपान, धुम्रपान इ. व्यसनांपासून दूर राहावे.
• ‎गर्भावस्थेमध्ये अनीमिया उत्पन्न होऊ नये यासाठी डॉक्टरांनी दिलेली लोह आणि फॉलिक एसिडची औषधे वेळच्यावेळी घ्यावीत.
• ‎मासिक पाळीमध्ये अधिक स्त्राव येत असल्यास स्त्रीरोग तज्ञांद्वारा उपचार करुन घ्यावेत.