चेहऱ्यावर पिंपल्स येणे – Acne vulgaris :
चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येण्याची समस्या अनेक तरुण तरुणींमध्ये होत असते. पिंपल्सचा परिणाम चेहऱ्याच्या सौंदर्यावर होत असतो. याला तारुण्यपिटिका, मुरुमे, पिंपल्स (pimple) किंवा वैद्यकीय भाषेत acne vulgaris असेही म्हणतात.
आपल्या त्वचेतील तेलग्रंथी जेव्हा हार्मोन्सच्या बदलामुळे किंवा बॅक्टेरियामुळे संक्रमित होतात तेंव्हा चेहऱ्यावर पिंपल्स निर्माण होतात. चेहऱ्यावर पिंपल्स अधिक असल्यास त्यावर वेळीच योग्य उपाय करणे गरजेचे असते कारण त्यावर उपचार न केल्यास नंतर चेहऱ्यावर डाग पडण्याचीही शक्यता असते.
चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची कारणे :
अनेक कारणांनी चेहऱ्यावर मुरूम येत असतात.
• हार्मोन्सच्या बदलामुळे,
• केमिकल्सयुक्त सौन्दर्य प्रसाधनांचा अतिवापर,
• त्वचेतील घाम, हवेतील धूळ व वायू प्रदूषणामुळे,
• तेलकट, मसालेदार आहार आणि फास्टफूड खाण्याच्या सवयीमुळे,
• पाणी कमी पिण्याच्या सवयीमुळे,
• मानसिक ताणतणावामुळे चेहऱ्यावर मुरूम अधिक येत असतात.
चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी हे करा घरगुती उपाय :
मुलतानी माती –
दोन चमचे मुलतानी माती, एक चमचा गुलाबजल आणि चार ते पाच ड्रॉप्स लिंबूरस हे मिश्रण थोडे पाणी घालून एकत्रित करून पेस्ट तयार करावी. हा लेप पिंपल्स च्या ठिकाणी किंवा संपूर्ण चेहऱ्यावर लावावा. 15 मिनिटानंतर चेहरा धुवून घ्यावा. यामुळे चेहऱ्यावरील धूळ निघून जाते आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होते.
कोरपडीचा गर –
चेहऱ्यावर मुरूम असल्यास त्याठिकाणी कोरफडीचा गर लावावा आणि 15 मिनीटांनी चेहरा पाण्याने धुऊन घ्यावा. पिंपल्सवर कोरफडीचा गर खूपच उपयोगी ठरतो. या आयुर्वेदिक उपायाने त्वचेवरील धुळ आणि तेलकटपणा कमी होण्यास मदत होते व पिंपल्सचा त्रास कमी होतो.
लिंबाचा रस –
लिंबाचा रस काढून एका वाटीत ठेवावा. रात्री झोपण्यापूर्वी कापसाचा बोळा त्या रसात बुडवून मुरूम असलेल्या ठिकाणी लावावा. यामुळे पिंपल्स सुजल्याने होणारी वेदना आणि सूज कमी होते. पिंपल्समधील बॅक्टेरियाही ह्यामुळे नष्ट होतात आणि लिंबाच्या रसामुळे मुरुमाचे डागही कमी होतात.
बेकिंग सोडा –
एक चमचा बेकिंग सोडा यामध्ये थोडे पाणी घालून मिश्रण तयार करा. चेहऱ्यावर ही पेस्ट लावण्यापूर्वी चेहरा स्वछ पाण्याने धुवून घ्या. या पेस्टला आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्सवर लावून हलका मसाज करावा. पाच मिनिटानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. एकदा चेहरा धुतल्यावर दुसऱ्यांदा थंड पाण्याने पुन्हा चेहरा धुवून घ्या. त्यानंतर स्वच्छ टॉवेलने चेहरा हळुवार पुसून घ्यावा. हा पॅक आठवड्यातून 2 ते 3 वेळा चेहऱ्याला लावू शकता.
मध –
पिंपल्स असणाऱ्या ठिकाणी मध लावावे व 20 मिनिटांनी चेहरा धुवून घ्यावा. मधामुळे त्याठिकानच्या बॅक्टेरिया नष्ट होतात, त्वचा हायड्रेट होते आणि पिंपल्स नाहीसे होतात.
हळद –
हळदीमध्ये पाणी घालून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट पिंपल्सच्या ठिकाणी किंवा संपूर्ण चेहऱ्यावरही लावावी. 15 मिनिटानंतर चेहरा धुवून घ्यावा. यामुळे चेहऱ्यावरील धूळ निघून जाते, बॅक्टेरिया नष्ट होतात आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होते आणि चेहराही उजळतो.
चेहऱ्यावर मुरूम येऊ नयेत म्हणून अशी घ्यावी काळजी :
योग्य आहार घ्यावा..
आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे यांचा समावेश असावा. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, खनिजे यासारखी पोषकतत्वे असतात. तसेच यात फायबर्सही मुबलक असते त्यामुळे नियमित पोट साफ होण्यास मदत होते. त्यामुळे पिंपल्सचा त्रासही कमी होतो.
फास्टफूड खाणे टाळावे..
तेला-तुपाचे पदार्थ, फास्टफूड, जंकफूड, चरबीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ खाणे टाळावे. जास्त खारट पदार्थ, चिप्स, स्नॅक्स, लोणची, पापड खाणे टाळावे. तसेच चहा, कॉफीही वारंवार पिणे टाळावे.
पुरेसे पाणी प्यावे..
दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होतो, रक्तातील अशुद्धी दूर होते. त्यामुळे त्वचाविकार होण्यापासून रक्षण होते.
चेहरा धुवावा..
चेहरा रोज दोनवेळा स्वच्छ पाण्याने धुवावा. यामुळे चेहऱ्यावरील घाम, धूळ, माती, प्रदूषण दूर होते. त्यामुळे पुढे पिंपल्सचा त्रास होत नाही.
पिंपल्स फोडू नयेत..
चेहऱ्यावर पिंपल्स असल्यास बोटांनी, नखांनी दाबू वा फोडू नयेत.पिंपल्स नखांनी फोडल्यामुळे ते चेहऱ्यावर इतर ठिकाणी पसरू शकतात तसेच त्यामुळे काळे डागही येऊ शकतात. तसेच वारंवार आपला हातही चेहऱ्यास लावू नये.
चेहरा सुंदर होण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.