तांब्याच्या भांड्यातील पाणी –
तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे महत्व सांगितलेले आहे. तांब्याच्या भांड्यात कमीत कमी 8 तास ठेवलेले पाणी प्यायल्यास शरीरातील विविध अपायकारक घटक बाहेर फेकण्यास मदत होते. शरीरातील अशुद्धी दूर झाल्याने यकृत आणि किडनी निरोगी राहण्यास मदत होते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे हे मायग्रेन डोकेदुखी, संधिवात, पोटाचे आजार, त्वचा विकार आणि थायरॉईड प्रॉब्लेम यामध्ये उपयोगी असते. रक्त वाढण्याससुध्दा यामुळे मदत होते. तसेच तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. तसेच यातील अँटी-ऑक्सिडेंट्समुळे विविध प्रकारच्या कँसरचा धोका कमी होतो. शरीरातील विषारी घटक बाहेर निघून जाण्यास मदत होते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे –
1) तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे शरीरातील अशुद्धी दूर होते ..
दररोज सकाळी उपाशीपोटी ग्लासभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिल्यामुळे पित्ताचा त्रास कमी होऊन वारंवार होणारी डोकेदुखी, अर्धशिशी (मायग्रेन), पोटाचे विकार कमी होण्यास मदत होते. या पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात. त्यामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत होते.
2) तांब्याच्या भांड्यातील पाणी पोटाच्या विकारांवर उपयोगी ठरते ..
तांब्याच्या भांड्यातील पाण्यामुळे पोटदुखी, गॅस, अॅसिडिटी आणि पोट साफ न होणे (बद्धकोष्ठता) यांसारख्या समस्यांवर आराम मिळतो.
3) तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे रक्त वाढते ..
दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यामुळे रक्ताच्या कमतरतेमुळे होणाऱ्या ऍनिमिया ह्या आजारात तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणे उपयुक्त ठरते.
4) तांब्याच्या भांड्यातील पाणी हे थायरॉईडच्या त्रासात उपयुक्त असते..
तांब्यामधील पाणी पिल्याने थायरॉक्सिन हार्मोन्सला संतुलित ठेवण्यास मदत होते. यामुळे थायरॉइडचाही धोका दूर होतो. थायरॉईडचा त्रास असणाऱ्यांनी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यावे.
5) तांब्याच्या भांड्यातील पाणी हे हृदयविकाराना दूर ठेवते ..
तांब्याच्या भांड्यात 8 ते 10 तास ठेवलेले पाणी प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण नियंत्रणात राहते, ब्लड प्रेशर नियंत्रित होते त्यामुळे हृदयविकारापासून बचाव होण्यास मदत होते.
6) तांब्याच्या भांड्यातील पाणी संधीवातात उपयोगी ठरते..
तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे शरीरातील वेदना आणि सूज कमी होते. त्यामुळे संधिवात असल्यास तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने फायदा होतो. यासाठी रोज सकाळी व संध्याकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. तसेच तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने शरीरातील युरीक अॅसिड कमी होण्यास मदत होते. यामुळे गाऊट (वातरक्त) या युरिक ऍसिड वाढल्यामुळे सांध्यांच्या ठिकाणी होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होते.
7) तांब्याच्या भांड्यातील पाणी त्वचेच्या विकारांवरही उपयुक्त असते..
दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येत नाहीत, त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य टिकण्यास मदत होते शिवाय त्वचेच्या विविध समस्या, फोड्या, तारुण्यापीटिका होत नाहीत.
8) तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो ..
तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात, यामुळे कँसरपासून दूर राहाण्यास मदत होते. अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, कॅन्सरची सुरुवात रोखण्यास तांबे फायदेशीर आहे. तांब्याच्या भांड्यातील पाण्यात कॅन्सरविरोधी घटक असतात. त्यामुळे विविध प्रकारच्या कॅन्सरचा धोका तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याने कमी होतो.
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे तोटे (side effects) :
शरीराला जशी लोह वैगरे खनिजांची गरज असते तशी तांब्याचीही काही प्रमाणात गरज असते. पूर्ण वाढ झालेल्या व्यक्तींना दिवसाला साधारण 900 mcg इतकी तांबे ह्या खनिजाची गरज असते. मात्र त्यापेक्षा अधिक प्रमाणात तांबे शरीरात गेल्यास विषारी परिणाम होऊ शकतात. अधिक प्रमाणात तांबे शरीरात गेल्यास त्यामुळे मळमळणे, उलट्या होणे आणि अतिसार यासारखी लक्षणे होऊ शकतात. यासाठी अधिक प्रमाणात तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे टाळावे. दिवसभरात एक ते दोन ग्लासचं तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.
तांब्याची भांडी वापरताना घ्यावयाची खबरदारी –
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे आरोग्यासाठी अनेक चांगले फायदे आहेत. मात्र जर आपण तांब्याची भांडी जेवण करण्यासाठी वापरत असाल तर ते धोकादायक आहे कारण त्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते. तांब्याच्या भांड्यात जेवण तयार केल्यास त्या आहाराचा वाईट विषारी परिणाम (Toxic) आपल्या शरीरावर होऊ शकतो.
- तांब्याच्या भांड्यात जेवण तयार करणे किंवा तयार केलेले अन्न तांब्याच्या भांड्यात ठेऊ नये.
- शक्यतो कोणतेच अन्नपदार्थ तांब्याच्या भांड्यात ठेऊ नये. विशेषतः ताक, दही, आंबट पदार्थ अशा भांड्यात ठेऊ नयेत.
- जर एखाद्या भांड्याला बाहेरील बाजूने तांबे व आतील बाजूने स्टेनलेस स्टील वैगरे धातू असल्यास अशी भांडी आपण जेवणासाठी वापरू शकतो.
हे सुद्धा वाचा..
Read Marathi language article about Health Benefits & side effects of drinking water from copper vessels. Last Medically Reviewed on March 10, 2024 By Dr. Satish Upalkar.