पायात गोळा येणे – Leg Cramps :
अनेकांना अचानक पायात गोळा येण्याची समस्या वरचेवर होत असते. या त्रासाला English मध्ये लेग क्रॅम्प्स (Leg Cramps) असेही म्हणतात. पायात गोळे आल्यावर पायाच्या पोटऱ्या अतिशय दुखू लागतत. काहीवेळा हा त्रास रात्री झोपल्यावर सुध्दा सुरू होऊ शकतो.
पायाला गोळे येण्याची कारणे –
अनेक कारणांमुळे पायात गोळे येऊ शकतात. पाणी कमी पिणे, आहारातील पोटॅशियम, मॅग्नेशियम व कॅल्शियम या घटकांची कमतरता असणे किंवा पायाचे स्नायू थकणे यामुळे हा त्रास प्रामुख्याने होत असतो.
- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे पायाला गोळे येतात.
- शरीरातील पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडिअम व कॅल्शियम हे क्षारघटक कमी झाल्यामुळे पायात गोळा येतो.
- अतिश्रम किंवा जास्त व्यायामामुळे पायाच्या स्नायूंवर ताण येऊन मांसपेशी थकल्यामुळे पायात गोळे येऊ शकतात.
- घाम अधिक आल्यामुळे देखील हा त्रास होतो.
- पायाला अपुरा रक्तपुरवठा होत असल्यामुळे ही समस्या होऊ शकते.
- गरोदरपणात बऱ्याच स्त्रियांना पायात गोळे येतात.
- किडनीचे आजार, hypothyroidism ही थायरॉईडची समस्या, मधुमेह, पार्किन्सन्स अशा आजारांमुळे देखील वरचेवर पायाला गोळे येण्याची समस्या हॉट असते.
- मद्यपान मुळेही हा त्रास होतो.
- तसेच काही औषधांमुळेही पायात गोळे येऊ शकतात.
पायाला गोळे येणे यावरील घरगुती उपाय –
- पायात गोळा आला असल्यास कोमट केलेले निर्गुंडीचे तेल पायाच्या पोटरीला लावावे व तेथे थोडी मालीश करावी.
- पायाला गोळा आल्यास तेथे खोबरेल तेल किंवा मोहरीच्या तेलाने मालिश करावी.
- पायाला गोळे आल्यास तेथे गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्यावा.
- बर्फाचे तुकडे कापडात गुंडाळून त्याचा थंड शेक पायाला गोळे आल्यावर द्यावा.
- पायात गोळे आल्यावर पाय लांब करून पायाचा स्ट्रेचिंग एक्सरसाइज करावा.
पायात गोळे येऊ नये यासाठी काय करावे ..?
1) पुरेसे पाणी प्यावे –
कमी पाणी पिण्याची सवय असलेल्या लोकांमध्ये पायात गोळे येण्याची समस्या अधिक असते. तसेच उष्णतेचे दिवस किंवा व्यायाम अधिक केल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन ही समस्या होऊ शकते. यासाठी दिवसभरात पुरेसे म्हणजे साधारण 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीर हायड्रेट होऊन ही समस्या होत नाही.
2) शहाळ्याचे पाणी प्यावे –
शहाळ्याच्या पाण्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम व सोडिअम असे क्षार घटक असून ते नैसर्गिक इलेक्ट्रोलाईट प्रमाणे कार्य करते. त्यामुळे पायाला गोळे येण्याची समस्या दूर करण्यासाठी शहाळ्याचे पाणी जरूर प्यावे.
3) कॅल्शियमयुक्त पदार्थ आहारात असावेत –
पायात गोळा येण्याची समस्या असल्यास रोज रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर दूध प्यावे. दुधात कॅल्शियम व प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे मांसपेशीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. याशिवाय आहारात दुधाचे पदार्थ, अंड्यातील पांढरा भाग यांचाही सामावेश असावा.
4) केळे खावे –
केळ्यामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असते. त्यामुळे जर पायाला वरचेवर गोळे येत असल्यास दररोज एक केळे जरूर खावे.
5) कच्चा मुळा खावा –
पायात गोळे येणे या त्रासावर कच्चा मुळा खाणे उपयोगी ठरते. यामुळेही ही समस्या लवकर दूर होण्यास मदत होते.
6) नियमित व्यायाम करावा –
दररोज व्यायाम केल्यामुळे शरीर व मांसपेशीतील रक्तप्रवाह सुधारतो. त्याचप्रमाणे स्नायूंवरील ताणही कमी होण्यास मदत होते. तसेच व्यायामाने वजन आटोक्यात राहते व जास्त वजनाचा भार आपल्या पायांवर येत नाही. त्यामुळे पायात गोळे येण्याची समस्या असल्यास रोज सकाळी किमान अर्धा तास चालण्यास जावे. तसेच सकाळच्या कोवळ्या उन्हात 10 मिनिटे बसावे. त्यामुळे शरीराला व्हिटॅमिन-D मुबलक प्रमाणात मिळते व कॅल्शिअमचे शोषण हाडांमध्ये होण्यास मदत होते.
7) स्ट्रेचिंग एक्सरसाइज करा –
व्यायाम केल्यानंतर पायांचा स्ट्रेचिंग एक्सरसाइजसुद्धा करावा. यामध्ये पाय पुढे मोकळे सोडून बसावे व हातानी पाय ताणण्याचा प्रयत्न करावा. यामुळे पायाची पेटरी ताणली जाऊन तेथील दुखणे कमी होते. यासाठी विविध योगासनेसुद्धा आपण करू शकता.
8) योग्य स्थितीत बसा –
एकाचं ठिकाणी अधिक वेळ बसणे किंवा अधिक वेळ उभे राहणे टाळावे. तसेच खुर्चीत बसल्यावर पाय हवेत मोकळे ठेवू नयेत, अशावेळी पायाची पावले ही जमिनीला टेकलेली असावीत.
9) रक्तातील क्षार घटकांचे प्रमाण तपासून घ्या –
रक्तामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम अशा क्षार घटकांचे प्रमाण कमी झाल्यास पायात गोळे येण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ब्लड टेस्ट करून रक्तातील पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारख्या क्षारांचे प्रमाण योग्य आहे की नाही ते तपासावे.
पायाला गोळा येत असल्यास डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे..?
पायात गोळा येणे ही समस्या सामान्य वाटत असली तरी वरचेवर हा त्रास होत असल्यास किंवा रक्ताच्या चाचणीत क्षार घटकांचे प्रमाण कमी झालेले असल्यास आपल्या डॉक्टरांकडून यावर उपचार घेणे आवश्यक आहे.
हे सुद्धा वाचा..
Read Marathi language article about Leg Cramps Causes, Symptoms, Prevention, Treatments and Home remedies. Last Medically Reviewed on March 10, 2024 By Dr. Satish Upalkar.
Aayushy upayukta mahiti milalyamule khup samadhan zale Abhari aahe.