टायफॉइड (Typhoid fever) :
टायफॉइड हा आजार ‘साल्मोनेला टायफी’ ह्या बॅक्टेरियापासून होतो. दूषित पाण्यातून याची लागण होत असते.
टायफॉईडची लक्षणे :
- ताप येतो, सुरवातीला हलका ताप असतो नंतर तो 103-104 डिग्री पर्यंत गेलेला असतो.
- पोटात दुखू लागणे,
- डोकेदुखी,
- अंगदुखी,
- थकवा येणे, अशक्त वाटणे,
- भूक कमी होणे.
अशी लक्षणे टायफॉईडमध्ये असतात.
टायफॉईड आणि उपचार :
टायफॉईड हा बॅक्टेरियापासून होत असल्याने यावर अँटीबायोटिक औषधे दिली जातात. रुग्णास ठीक होण्यासाठी 10 ते 14 दिवस लागू शकतात.
टायफॉइड आणि आहार नियोजन :
टायफॉइड झाल्यावर रुग्णाने काय खावे?
टायफॉइड झाल्यावर सहज पचणारा आहार घेतला पाहिजे. जेवण हलके, पचण्यास सुलभ असे असावे.
टायफॉइडच्या रुग्णाच्या आहारात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असले पाहिजे. यासाठी आहारात उकडलेले बटाटे, गाजर किंवा उकडलेले बीट, भात, लाह्या, दही यांचा समावेश असावा.
वरणभात, उकडलेले अंडे, चिकन, कमी फॅटचे दूध, दही असे पदार्थ खावेत. चांगल्या प्रकारे शिजवलेल्या किंवा उकडलेल्या भाज्या खाव्यात. पालक सूप, वेजिटेबल सूप, चिकन सूप प्यावे.
पिकलेली केळी, खरबूज, सफरचंद ही फळे खावीत.
टायफॉइडमुळे तीव्र निर्जलीकरण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अधिकाधिक द्रवपदार्थ शरीरात गेले पाहिजे. यासाठी पुरेसे पाणी प्यावे. यावेळी फिल्टर केलेले किंवा उकळवून थंड केलेले स्वच्छ पाणी पिण्यासाठी वापरावे.
तसेच शहाळ्याचे पाणी, फळांचा ताजा रस, लस्सी, ग्लुकोजचे पाणी, लिंबूपाणी असे द्रवपदार्थ वरचेवर पीत राहावे.
टायफाईड झाल्यावर रुग्णाने काय खाऊ नये?
कच्च्या भाज्या, कच्चे मांस, अर्धवट शिजलेले पदार्थ खाऊ नयेत.
तिखट व मसालेदार पदार्थ खाणे टाळा. चरबीयुक्त, तेलकट पदार्थ, वेफर्स व फास्टफूड खाणे टाळावे.
गॅस होणारे पदार्थ टाळावेत. यासाठी वांगी, फूलकोबी, ब्रोकोली, फ्लॉवर, बीन्स, राजमा, मसूर, शेंगदाणे, हरभरा, वाटाणा यासारखे गॅस होणारे पदार्थ खाणे टायफाईड झाल्यावर टाळले पाहिजे.
सुकामेवा, बेरी, अननस, किवी ही फळे खाणे टाळावे.
उघड्यावरील बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळा. दूषित पाणी पिणे टाळले पाहिजे.
Read a Marathi language article about Typhoid Diet plan. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on March 1, 2024.