Dr Satish Upalkar’s article about Bengal gram benefits in Marathi.
हरभरा – Bengal gram :
भारतीय खाद्यसंस्कृतीत हरभऱ्याचे असाधारण महत्त्व आहे. हरभऱ्याची डाळ आणि त्यापासून केलेले बेसन पीठ यांचा आवर्जून समावेश अनेक पदार्थात असतो. तसेच हरभरे भाजून त्यापासून चणे केले जातात. चणेही चवीसाठी मस्त आणि आरोग्यासाठीही उत्तम असतात.
हरभऱ्यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. हरभरा हे फायबर आणि फॉलिक एसिडचा एक चांगला स्रोत आहे. यामध्ये प्रामुख्याने मॅंगनीज, तांबे आणि जस्त मुबलक प्रमाणात असून लोह, सोडियम आणि सेलेनियम अशी पोषकद्रव्येही असतात. या लेखात भिजवलेले हरभरे खाण्याचे तसेच हरभरा डाळ आणि भाजलेले चणे खाण्यामुळे होणारे फायदे आणि नुकसान याची माहिती दिली आहे.
हरभरा खाण्याचे फायदे :
हरभरा खाण्यामुळे शरीराची उर्जाशक्ती वाढते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी आटोक्यात राहण्यास मदत होते. पोट साफ होते, पचनक्रिया सुधारते. अशक्तपणा दूर होतो. यामुळे हिमोग्लोबिन वाढते. हरभरे खाल्याने असे आरोग्यासाठी विविध फायदे होतात.
1) एनर्जी बूस्टर म्हणून काम करते..
हरभरा खाण्यामुळे शरीरातील उर्जाशक्ती वाढविण्यास मदत करते, म्हणूनच ते घोड्यांनादेखील दिले जाते. हरभऱ्यात प्रोटिन्स (प्रथिने) मुबलक असतात. त्यामुळे मांसपेशीच्या व हाडांच्या आरोग्यासाठी ते उपयुक्त असतात.
2) डायबेटीसमध्ये उपयुक्त..
हरभऱ्यामध्ये शरीराची ताकद वाढवणारे व ग्लूकोज शोषण्यास मदत करणारे घटक असतात. त्यामुळे हरभरे मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त असतात. यासाठी मूठभर हरभऱ्याचे चणे जरूर खावेत. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सामान्य राहण्यासाठी मदत होते.
3) पचनक्रिया सुधारते..
हरभऱ्यात फायबर्सचे प्रमाण भरपूर असल्याने नियमित पोट साफ होण्यास मदत होते. त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होऊन पचनक्रिया सुधारण्यास यामुळे मदत होते. यासाठी मूठभर हरभरे रात्रभर पाण्यात भिजत घालून सकाळी ते उपाशीपोटी खावेत.
4)अशक्तपणा दूर करते..
हरभऱ्यात लोह, प्रथिने आणि फोलेट अशी पोषकद्रव्ये असतात. त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यास मदत होते. त्यामुळे रक्ताल्पता (ऍनिमिया) दूर होऊन अशक्तपणा येत नाही. यासाठी रात्रभर भिजवलेले हरभरे व एक चमचा मध असे एकत्रित सकाळी सेवन करावे.
हरभरा भिजवून खाण्याचे हे आहेत फायदे :
रात्रभर पाण्यात मूठभर हरभरे भिजत घालावेत. सकाळी ते भिजलेले हरभरा आणि मध असे एकत्र खाणे आरोग्यासाठी फायदेशीर जास्त असते. तसेच त्याचे उरलेले पाणीही जरूर प्यावे. अंकुरलेले हरभरे देखील जीवनसत्त्वे आणि बी-कॉम्प्लेक्सचा उत्तम स्रोत म्हणून काम करतात. त्यामुळे मोड आलेल्या हरभऱ्याची उसळ आहारात समाविष्ट करावी. यामध्येही प्रोटिन्स व फायबर भरपूर प्रमाणात असतात.
हरभरा डाळीचे फायदे :
हरभरा डाळ ही पचण्यास जड, किंचित उष्ण असून तुरट-गोड चवीचा असते. आयुर्वेदानुसार हरभरा डाळ ही वातदोष वाढवणारी आहे. त्यामुळे वातप्रकृतीच्या व्यक्तिंनी, वात व्याधींनी पिडीत रुग्णांनी याचे सेवन करु नये. पचनशक्ती मंद असणाऱ्यांनी, अपचनाचा त्रास, गॅसेस होणाऱ्या लोकांनी हरभरा डाळीचे, हरभरा पिठापासून बनवलेले पदार्थ सेवन करणे टाळावे.
भाजलेले चणे खाण्याचे हे आहेत फायदे – Roasted Chana :
हलकेफुलके चणे खायायला सर्वांनाच आवडते. चावीबरोबरच आरोग्यासाठीही चणे खाणे फायदेशीर असते. मूठभर भाजलेले चणे खाण्यामुळे आपली भूक भागते, शरीराला ऊर्जा मिळते. त्याचबरोबरचं यात असणारे फायबर्स, प्रोटिन्स, लोह अशी महत्त्वाचे पोषकघटक शरीराला मिळतात.
त्यामुळे मूठभर भाजलेल्या चणा खाल्यास यातील फायबर्समुळे वजन आटोक्यात राहण्यास, पोट साफ होण्यास, ब्लड शुगर आटोक्यात राहण्यास, ब्लड प्रेशर आटोक्यात राहण्यास व वाईट कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. यातील प्रोटिन्समुळे शरीराला ऊर्जा मिळते, मांसपेशी व हाडे मजबूत होण्यास मदत होते.
हरभरे खाण्यामुळे होणारे नुकसान :
हरभरा खाण्याचे फायदे भरपूर असले तरीही हरभरे हे प्रमाणातचं खाणे आवश्यक असते. जास्त प्रमाणात हरभरे खाण्यामुळे आपल्याला अपचन, गॅसेस, पोटफुगी असे त्रास होऊ शकतात. काही जणांना यामुळे ऍलर्जीही होऊ शकते.
हरभऱ्यात ऑक्सॅलिक ऍसिडचे प्रमाण भरपूर असल्याने ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे त्यांनी शक्यतो हरभरे खाणे टाळले पाहिजे.
हरभऱ्यातील पोषणतत्वे –
100 ग्रॅम हरभऱ्यातून मिळणारी पोषणतत्वे पुढीलप्रमाणे आहेत.
कॅलरी | 360 |
प्रथिने | 17.1 ग्रॅम |
स्नेह पदार्थ | 5.3 ग्रॅम |
कर्बोदके | 60.9 ग्रॅम |
तंतुमय पदार्थ | 1 ग्रॅम |
खनिजे | 3 ग्रॅम |
कॅल्शियम | 56 मि. ग्रॅम |
लोह | 19.2 मि. ग्रॅम |
फॉस्फरस | 331 मि. ग्रॅम |
जीवनसत्व ब-1 | 0.47 |
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुद्धा वाचा..
शेंगदाणे खाण्याचे फायदे व तोटे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
In this article information about Chana dal health benefits and side effects in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).