मोहरीचे तेल (Mustard Oil) –

मोहरीपासून हे तेल काढले जाते. हिंदीत मोहरीच्या तेलाला ‘सरसों का तेल’ असे म्हणतात. भारतात उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा या भागात मोठ्या प्रमाणात आहारात मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो. भारतीय खाद्यपदार्थांमध्ये मोहरीचे तेल आवर्जून वापरले जाते. खाण्यापिण्याच्या व्यतिरिक्त औषध, मसाज यासाठीही मोहरीचे तेल वापरले जाते. मोहरीच्या तेलाची चव व वास उग्र असून या तेलाचा स्मोकिंग पॉइंटही जास्त असतो.

मोहरी तेलाचे आरोग्यासाठीचे फायदे –

मोहरीच्या तेलात सूज आणि वेदना कमी करणारे घटक असतात. त्यामुळे सांधेदुखीमध्ये हे तेल फायदेशीर असते. यामुळे सोरायसिसमध्ये त्वचेवर होणारी सूज देखील कमी होते. मोहरीचे तेल आहारात असल्यास रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते, ब्लड शुगर कमी होते तसेच रक्तदाब नियंत्रित राहतो. हे तेल सूक्ष्मजीवांची वाढ रोखण्यास आणि केसांचे व त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.

मोहरीचे तेल त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते ..
केसांचे आणि त्वचेचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मोहरीचे तेलाचा वापर केला जातो. मोहरीच्या तेलात antibacterial गुणधर्म असल्याने त्वचेतील सूक्ष्मजीवांची वाढ रोखली जाते.

यात ओमेगा-3, ओमेगा-6 फॅटी ऍसिडस् आणि व्हिटॅमिन-E चे प्रमाण जास्त असते. हे घटक आपल्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी उपयुक्त असतात. यामुळे त्वचा नितळ दिसण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर आपण करू शकता.

यासाठी आंघोळीच्या अर्धा तास आधी हे तेल त्वचेला लावावे. यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. मोहरीच्या तेलामुळे त्वचेतील काळे डागही दूर होतात. टॅनिंगपासून मुक्त होण्यासाठी या तेलाने तुमच्या त्वचेला नियमित मसाज करा.

मोहरीचे तेल केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते ..
केसांच्या वाढीसाठी हे तेल उपयुक्त असून यात केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, ओमेगा-3, ओमेगा-6 फॅटी अॅसिड असतात.

याव्यतिरिक्त, त्यात अँटीफंगल आणि अँटिबॅक्टेरियल घटक असतात.त्यामुळे केसांना मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास केसातील कोंडा कमी होतो, केस गळणे, तुटणे, केसात खाज सुटणे यासारख्या केसांच्या समस्या दूर होतात.

मोहरीच्या तेलामुळे सांधेदुखीतील वेदना कमी होतात ..
ह्या तेलात ॲलिल आयसोथियोसायनेट (allyl isothiocyanate) हे एक रासायनिक संयुग असते. तसेच मोहरीचे तेल हे अल्फा-लिनोलेनिक ऍसिडने समृद्ध असते. हे दोन्ही घटक सूज कमी करणारे आहेत.

त्यामुळे सांधेदुखी, गुडघेदुखी, स्नायू दुखणे असे त्रास होत असल्यास तेथे कोमट केलेल्या मोहिरी तेलाने हलकी मालिश करावी. यामुळे तेथील सूज व वेदना कमी होण्यास मदत होते. तसेच तेथील रक्तप्रवाह सुधारतो.

मोहरी तेलाच्या मसाजमुळे हाडे मजबूत होतात ..
मोहरीच्या तेलात ओमेगा-3 फॅटी अॅसिड मुबलक असते. त्यामुळे या तेलाने नियमित मसाज केल्याने आपली हाडे मजबूत होण्यास मदत होते.

सोरायसिस या त्वचाविकारत हे तेल उपयुक्त असते ..
मोहरीचे तेल खाण्यामुळे सोरायसिसमुळे त्वचेवर येणारी सूज कमी होऊ शकते. मोहरीच्या तेलामध्ये अल्फा-लिनोलेनिक ऍसिडसह ओमेगा-3 फॅटी ऍसिड मुबलक असते. ज्यामुळे त्वचेतील ऑक्सिडेटिव्ह ताण आणि सूज कमी होऊ शकते.

मोहरी तेल हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते ..
मोहरीच्या तेलात मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड आढळते. मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् व ओमेगा-3 फॅटी ऍसिड हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असते. मोहरीचे तेल आहारात असल्यास रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड हे घातक घटक कमी होण्यास मदत होते.

याशिवाय रक्तदाबही नियंत्रित राहण्यास मदत होते. हे सर्व फायदे पाहता मोहरीचे तेल हे हार्टसाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे हार्ट अटॅक, उच्च रक्तदाब, पक्षाघात, हाय कलेस्टरोल, धमनीकाठिण्य अशा हार्टसंबधित गंभीर आजारांचा धोका कमी होऊ शकतो.

मोहरीचे तेल डायबेटिसमध्ये उपयुक्त असते ..
मोहरी तेल आहारात असल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे डायबेटिस रुग्ण आपल्या आहारात काही दिवस हे तेल समाविष्ट करू शकतात.

ह्या तेलामुळे कोलन कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो ..
मोहरीचे तेल खाण्यात असल्यास कोलन कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होत असल्याचे संशोधनात आढळले आहे. यामुळे कॅन्सरच्या पेशींची वाढ आणि प्रसार कमी करण्यास मदत होत असल्याचे संशोधनात आढळले.

मोहरी तेलाचा स्मोक पॉइंट जास्त असतो ..
स्मोक पॉइंट म्हणजे तेल गरम केल्यास किती तापमानाला त्यापासून धूर येऊ लागतो, यानुसार स्मोक पॉइंट ठरवला जातो.

तेल अधिक गरम केल्यास त्यातील उपयुक्त पोषकघटक नष्ट होऊन त्यात हानिकारक अशी फ्री रॅडिकल्स तयार होत असतात. यासाठी खाण्याच्या कोणत्याही तेलाचा स्मोक पॉइंट हा जास्त असणे गरजेचे असते.

मोहरीच्या तेलाचा स्मोक पॉइंट जास्त असतो. मोहरी तेलाचा स्मोक पॉइंट 480°F (250°C) इतका आहे. स्मोक पॉइंट जास्त असल्याने या तेलाचा वापर पदार्थ तळणे, भाजणे यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.

मोहरीच्या तेलाचे तोटे व नुकसान –

काहीजणांना मोहरी तेलामुळे ऍलर्जी होऊ शकते. यामुळे पित्ताचा त्रास देखील होऊ शकतो. तसेच मोहरीचे तेल त्वचेला वापरण्यापूर्वी त्वचेची तपासणी करून घ्यावी. कारण यामुळे काही लोकांच्या त्वचेचे नुकसान होऊन ऍलर्जीचा त्रास होण्याची शक्यता असते.

भारतीय उपखंडात मोहरीचे तेल मोठ्या प्रमाणात आहारात वापरले जाते. मात्र हे तेल खाण्यासाठी वापरण्यास अमेरिका, कॅनडा आणि युरोपसह जगभरातील अनेक देशांमध्ये बंदी आहे.

कारण मोहरीच्या तेलात एरुसिक ऍसिड (erucic acid) नावाचे एक संयुग असते, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. हा घटक हृदयाच्या आरोग्यासाठी घातक असतो. त्यामुळे अनेक देशात हे तेल खाण्यासाठी वापरण्यास बंदी आहे.

मोहरीचे तेल कोणी खाऊ नये ..?

ज्यांना हृद्यविकार आहे त्यांनी मोहरीचे तेल खाणे टाळले पाहिजे. तसेच या तेलाची ऍलर्जी असणाऱ्यांनीही हे तेल वापरणे टाळावे.

Read Marathi language article about Mustard oil Health benefits and side effects.. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on March 14, 2024.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *