Kiwi fruit health benefits and side effects in Marathi.
किवी फळ (Kiwi fruit) –
किवी हे एक लहान, हिरवे फळ आहे. यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. किवीमध्ये जीवनसत्त्वे सी, के, ई, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फोलेट असे पोषकघटक असतात.
किवी फळ खाण्याचे फायदे –
किवी खाण्याचे अनेक फायदे आहेत. किवी फळ खाण्यामुळे हृदयरोग, हाय ब्लड प्रेशर, पक्षाघात आणि डायबेटिसचा धोका कमी होऊ शकतो. यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते. किवी फळ हे त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले असते. गरोदर स्त्रियांसाठी देखील किवी फळ खाणे हितकारी असते. तसेच यामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. असे फायदे किवी खाण्यामुळे होतात.
1) किवी फळ खाण्यामुळे हृदयरोग, हाय ब्लड प्रेशर, पक्षाघात आणि डायबेटिसचा धोका कमी होतो.
किवीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते. अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सच्या हानीपासून संरक्षण करू शकतात. यातील फायबर घटकामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखली जाते. त्यामुळे किवी खाण्यामुळे हृदयरोग, हाय ब्लड प्रेशर, पक्षाघात आणि डायबेटिस सारख्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.
2) किवी फळ खाण्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते.
किवीमध्ये जीवनसत्त्व सी चे प्रमाण जास्त आहे. जीवनसत्त्व सी हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहे जे रोग प्रतिकार शक्ती वाढवू शकते. त्यामुळे सर्दी, खोकला यासारखे आजार सहसा होत नाहीत. कीवी फळ खाल्याने सर्दीचा त्रास लवकर कमी होत असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे.
3) किवी फळ खाण्यामुळे पचनक्रिया सुधारते.
किवीमध्ये फायबर भरपूर असते. फायबर पचनक्रिया सुधारू शकते आणि बद्धकोष्ठता दूर करू शकते. पोट साफ होत नसल्यास किवी फळ जरूर खावे.
4) किवी फळ त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले असते.
किवीमध्ये त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे जीवनसत्त्वे सी आणि ई भरपूर असते. जीवनसत्त्वे सी एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहे जे त्वचेला मुक्त रॅडिकल्सच्या हानीपासून संरक्षण करू शकते. जीवनसत्त्वे ई हे त्वचेसाठी आवश्यक असे अँटिऑक्सिडंट आहे जे त्वचेला वृद्ध होण्यापासून आणि सुरकुत्या येण्यापासून रोखू शकते.
5) किवी फळ गरोदर स्त्रियांसाठी उपयुक्त असते.
किवीमध्ये जीवनसत्त्वे सी, के, ई आणि फोलेट असे घटक भरपूर असतात. जीवनसत्त्वे सी मुळे गर्भवती महिलांचे आणि पोटातील बाळाचे संसर्गापासून संरक्षण होते. जीवनसत्त्वे के हे रक्त गोठण्यास मदत करते आणि यामुळे गर्भवती महिलांना रक्तस्त्राव होण्यापासून रोखते. तर जीवनसत्त्वे ई हे त्वचेसाठी आवश्यक असणारे अँटिऑक्सिडंट आहे जे गर्भवती महिलांना आणि त्यांच्या बाळांना त्वचेच्या समस्यांपासून संरक्षण करू शकते. फोलेट हा एक गर्भवती महिलांसाठी आवश्यक असणारा पोषक घटक आहे जो गर्भाच्या न्यूरल ट्यूब दोष टाळण्यास मदत करतो.
6) किवी फळ वजन आटोक्यात ठेवते.
किवीमध्ये फायबर भरपूर असते. फायबर, वजन कमी करण्यास मदत करते. तसेच यामुळे भूक कमी लागते आणि वजन आटोक्यात राहते.
किवी फळ खाण्याचे तोटे –
किवी फळ खाण्यामुळे काहीजणांना ॲलर्जी होऊ शकते. अशावेळी जीभ, चेहरा, गळा किंवा ओठ सुजणे, श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे, त्वचेवर लालसरपणा किंवा खाज येणे असे त्रास होऊ शकतात. जर तुम्हाला किवी फळ खाण्यामुळे ॲलर्जीची अशी लक्षणे जाणवत असतील, तर तुम्ही त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.
किवी फळ खाण्यामुळे काही लोकांना पचनसंबंधी समस्या होऊ शकतात. अशावेळी गॅस, अपचन, उलट्या होणे, जुलाब होणे अशा समस्या होऊ शकतात.
किवी फळ कोणी खाऊ नये?
किवी फळात रक्त पातळ करणारा घटक असतो. त्यामुळे, जे लोक रक्त पातळ करणारी औषधे घेत आहेत त्यांनी किवी फळ खाणे टाळावे.
तसेच जर तुमचे कोणतेही ऑपरेशन व्हायचे असेल, तर ऑपरेशनच्या काही दिवस आधी, किवी फळ खाणे टाळावे. कारण किवी फळात असलेल्या पदार्थांमुळे रक्त पातळ होऊ शकते आणि त्यामुळे ऑपरेशन दरम्यान रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो.
तसेच जर तुम्ही ब्लड प्रेशर कमी करणारी औषधे, डायबिटीसची औषधे, कॅन्सरची औषधे घेत असाल तर किवी फळ खाणे टाळावे.
किती किवी फळे खावेत?
एक ते दोनच किवी फळ खावे. यापेक्षा अधिक किवी फळे एका दिवसात खाणे टाळावे.
किवी पोषकघटक (Kiwi Nutrition Facts) –
एका मध्यम आकाराच्या किवी फळात खालील पोषकघटक असतात.
• Calories: 42
• Fat: 0.4g
• Sodium: 3.8mg
• Carbohydrates: 10.1g
• Fiber: 2.1g
• Sugars: 6.7g
• Protein: 0.8g
• Vitamin C: 56mg
• Potassium: 148mg
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुध्दा वाचा – केळी खाण्याचे फायदे व तोटे जाणून घ्या..
In this article information about Kiwi fruit health benefits and side effects in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.