रक्तदाब कमी करणे :
बदललेली जीवनशैली, मानसिक ताणतणाव, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या आज अनेकांना होत आहे. रक्तदाब हा वारंवार 140/90 mm Hg पेक्षा अधिक असल्यास त्या स्थितीस उच्च रक्तदाब असे म्हणतात. रक्तदाब हा 120/80 mm Hg दरम्यान असणे आवश्यक असते.
रक्तदाब कंट्रोलमध्ये का असावा लागतो ..?
उच्च रक्तदाब ही समस्या असल्यास त्यावर वेळीच योग्य उपचार करून रक्तदाब नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. कारण वाढलेल्या रक्तदाबामुळे हृदयविकार, हार्ट अटॅक, पक्षाघात, किडनी निकामी होणे यासारखे गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. यासाठी येथे रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी काय करावे याची माहिती खाली दिलेली आहे.
रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी काय करावे ..?
1) चरबीचे पदार्थ खाणे टाळावे..
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आहारातील तेला-तुपाचे पदार्थ, फास्टफूड, जंकफूड, खारट पदार्थ, प्राणिज चरबी, चरबीचे पदार्थ, अंड्यातील पिवळा बलक, मैद्याचे पदार्थ खाणे टाळावे. चहा व कॉफीही वारंवार पिणे टाळावे.
2) मीठाचे प्रमाण कमी करा..
रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे. एका दिवसामध्ये 2.3 gm (2300 mg) पेक्षा अधिक मिठाचे सेवन करू नये. यासाठी जेवनाव्यतिरिक्त खाद्य पदार्थांच्या पाकीटावरील सोडियमचे प्रमाणही तपासावे. चिप्स, स्नॅक्स, लोणची, पापड, फास्टफुड यासारखे खारट पदार्थ खाणे टाळावे. खाण्यासाठी सैंधव मिठाचा वापर सुरू करावा.
3) योग्य आहार घ्यावा..
आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे यांचा समावेश असावा. कारण यात फायबर्सचे प्रमाण जास्त असल्याने त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. याशिवाय रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी पोटॅशियम हे पोषकतत्व जास्त फायदेशीर असते. यासाठी केळी, मनुका, पालक भाजी यासारख्या पोटॅशियम मुबलक असणारे पदार्थ जरूर खावेत. तसेच बदाम, काजू, अक्रोड, शेंगदाणे असे सुकामेव्याचे पदार्थ आणि मासे यांचाही आहारात समावेश करावा. कारण यात मुबलक प्रमाणात हेल्दी फॅट्स असते. यामुळे रक्तदाब आटोक्यात राहण्यासाठी मदत होते.
4) पुरेसे पाणी प्यावे..
रक्तदाब कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित होतो, रक्तातील अशुद्धी दूर होते, लघवीस साफ होऊन किडनीचे आरोग्यही चांगले राहते पर्यायाने रक्तदाब आटोक्यात राहतो.
5) वजन आटोक्यात ठेवावे..
वजन जास्त असल्यासही रक्तदाब वाढत असतो. यासाठी वजन नियंत्रणात ठेवावे. नियमित व्यायाम, योगासने करावी. यामुळे वजन आणि रक्तदाबही नियंत्रणात राहतो. दररोज सकाळी अर्धा तास चालण्यास जावे. सायकलिंग, एरोबिक व्यायाम, स्विमिंग, पायऱ्या चढणे हे व्यायाम करावेत. व्यायाम कसा करावा हे जाणून घ्या..
6) मानसिक ताण घेऊ नये..
अचानक बसलेला मानसिक धक्का, भीती, राग, टेन्शन अशा मानसिक कारणांचा परिणाम निश्चितपणे रक्तदाबावर होत असतो. या मानसिक कारणांमूळे रक्तदाबामध्ये 20 ते 30 mm Hg पर्यंत वाढ होते. यासाठी तणावापासून दूर राहावे. मानसिक तणावापासून दूर राहाण्यासाठी प्राणायाम व ध्यानधारणा करावी, एखादा चांगला छंद जोपासावा, मोकळ्या हवेत फिरायला जावे. तसेच पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी. आणि जागरण करणे टाळावे.
7) व्यसनांपासून दूर राहावे..
मद्यपान, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांमुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्याबरोबरच उच्च रक्तदाबाची समस्याही होत असते. रक्तदाब अधिक असल्यास सिगारेटचे व्यसन करणे अत्यंत धोकादायक असून यामुळे हार्ट अटॅक, लकवा याचा धोका वाढतो. यासाठी रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तंबाखू, धूम्रपान, मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहावे.
रक्तदाब कमी करण्याचे घरगुती उपाय :
लसूण –
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज सकाळी लसणीच्या दोन पाकळ्या चावून खाव्यात. लसणीमुळे रक्तातील बॅड कोलेस्टेरॉल कमी होते व धमनीकठिण्यता हा विकार होत नाही. आहारातही लसूणचा वापर वाढवावा. लसूण पाकळ्यांचे बारीक तुकडे करून 5 मिनिटे तशाच ठेवाव्यात त्यानंतरचं ते तुकडे खावेत. असे करण्याने लसूण मधील रक्तदाब नियंत्रित करणारा Alliinase हा उपयुक्त घटक त्यामधून मिळतो. त्यामुळे रक्तदाब कमी करण्यासाठी लसूण उपयोगी पडते. लसूण खाण्याचे फायदे व तोटे जाणून घ्या.
कांदा –
अर्धा चमचा कांद्याचा रसात अर्धा चमचा मध मिसळावे. हे मिश्रण सकाळी व रात्री या मिश्रणाचे चाटण करावे. कांद्याच्या रसात Quercetin हे अँटीऑक्सिडंट असते त्यामुळे रक्तदाब कमी होण्यासाठी मदत होते.
आले –
उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी आले प्रभावी ठरते. दररोज आल्याचा छोटासा तुकडा रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते.
लिंबू रस –
कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळून ते पाणी सकाळी उपाशीपोटी प्यावे. यामुळे रक्तवाहिन्या लवचिक होतात आणि रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते.
बदाम –
रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी रात्रभर भिजवलेले बदाम सकाळी सोलून खाऊ शकता. यामुळे वाईट कोलेस्टेरॉल कमी होतो आणि उच्च रक्तदाबही नियंत्रणात येतो. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास रक्तदाब कमी करण्यासाठी भिजवलेले दोन ते तीन बदाम दररोज खावेत. बदाम खाण्याचे फायदे व तोटे जाणून घ्या.
हे सुध्दा वाचा – रक्तदाब वाढण्याची कारणे, लक्षणे व उपचार जाणून घ्या.
Read Marathi language article about Tips and Home remedies to control high blood pressure. Last Medically Reviewed on February 22, 2024 By Dr. Satish Upalkar.