डोके गरगरणे – Dizziness :
डोके गरगरणे ही एक सामान्य अशी आरोग्यविषयक तक्रार आहे. यामध्ये डोके अचानक गरगरल्यासारखे वाटते. काहीवेळा यामुळे डोकेदुखीही सुरू होऊ शकते.
डोके का गरगरते ..?
अचानक डोके गरगरणे याची अनेक कारणे असू शकतात. काही विशिष्ट आरोग्य समस्या आणि आहारविषयक सवयी यासाठी प्रामुख्याने कारणीभूत असतात. खालील कारणांमुळे डोके गरगरू लागते.
- तेलकट, मसालेदार पित्तवर्धक पदार्थ खाण्यामुळे,
- चहा, कॉफी अधिक पिण्यामुळे,
- तंबाखू, अल्कोहोल यासारखी व्यसने,
- मायग्रेन डोकेदुखीचा त्रास,
- लो ब्लड प्रेशरची समस्या,
- झोपलेल्या स्थितीतून लगेच उठून उभे राहिल्यामुळे,
- रक्तातील साखर कमी झाल्यामुळे,
- शरीरातील पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशनमुळे,
- अपुरी झोप,
- मानसिक तणावामुळे,
- जास्त प्रवासामुळे,
- जास्त व्यायामामुळे,
- शरीरातील व्हिटॅमिन ‘बी’, व्हिटॅमिन ‘डी’ची कमतरता,
- अॅनिमिया किंवा शरीरात लोहाची कमतरता असणे,
- कानाचे आजार, कानातील इन्फेक्शन,
- तसेचं काही औषधांच्या दुष्परिणामामुळे डोके गरगरते.
काही अपवादात्मक स्थितीत ब्रेन ट्युमर, पक्षाघात (ब्रेन स्ट्रोक), मल्टिपल स्क्लेरोसिस अशा गंभीर कारणामुळेही डोके गरगरते.
डोके गरगरणे यामधील लक्षणे –
डोक्यात अचानक गरगरल्यासारखे वाटणे हे याचे प्रमुख लक्षण असते. याशिवाय खालील लक्षणे जाणवू शकतात.
- डोके गरगरल्यासारखे वाटणे,
- डोके हलके वाटणे,
- डोळ्यासमोर अंधारी येणे,
- डोके दुखणे,
- शरीराचा तोल जाऊन पडायला होणे,
- अशक्तपणा,
- घाम येणे,
- घाबरणे,
- मळमळ व उलटी होणे यासारखी लक्षणे यामध्ये जाणवतात.
हे सुद्धा वाचा – अर्धे डोके दुखण्याची कारणे व उपाय जाणून घ्या.
डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे ..?
डोके गरगरणे ही तशी सामान्य समस्या आहे. मात्र खालील लक्षणे जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे जाणे आवश्यक असते.
- बराच वेळ डोके गरगरणे,
- डोक्याला मार लागल्याने डोके गरगरत असल्यास,
- डोके गरगरणे याबरोबरच उलट्या होणे,
- डोळ्यांनी अंधुक अस्पष्ट दिसणे,
- ऐकू कमी येऊ लागणे,
- बोलताना त्रास होणे,
- हातापायात किंवा चेहऱ्यावर मुंग्या येणे,
- हातापायात कमजोरी जाणवणे,
- छातीत दुखणे
अशी लक्षणे जाणवू लागल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.
हे सुद्धा वाचा – ब्रेन ट्युमरची कारणे व लक्षणे जाणून घ्या.
डोके गरगरत असल्यास काय उपाय करावे ..?
- डोके गरगरत असल्यास तोल जाऊन पडण्याची शक्यता असल्यास तत्काळ खाली बसावे.
- अशावेळी काहीवेळ झोपून विश्रांती घ्यावी.
- अशावेळी ग्लासभर पाणी प्यावे. फळांचा ताजा रस सुद्धा पिऊ शकता.
डोके गरगरू नये यासाठी हे उपाय करावे ..
- वेळच्यावेळी जेवण करावे. अधिकवेळ उपाशी राहू नये.
- हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, तृणधान्ये, कडधान्ये, दूध व दुधाचे पदार्थ, सुखामेवा, ग्रीन टी, मांस, मासे, अंडी यांचा आहारात समावेश असावा.
- अँटीऑक्सिडेंट, व्हिटॅमिन-D व ओमेगा-3 फॅटी ऍसिड असणारे पदार्थ खाण्यामुळे डोके गरगरण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.
- दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. साधारण 7 ते 8 ग्लास पाणी दिवसभरात प्यावे.
- नियमित व्यायाम आणि योगासने करावीत.
- पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी.
- मानसिक ताण-तणावापासून दूर राहावे.
- चहा, कॉफी अधिक पिणे टाळा.
- आहारात मिठाचा वापर कमी करावा. चिप्स, लोणचे असे खारट पदार्थ खाणे टाळावे.
- तंबाखू, अल्कोहोल यासारखी व्यसने करणे टाळा.
- आयबुप्रोफेन, ऍस्पिरिन अशी वेदनाशामक गोळ्या औषधे वारंवार घेणे टाळावे.
- काहीवेळा बेडवरून झोपलेल्या स्थितीतून लगबगीने उठून उभे राहिल्याने रक्तदाब घसरतो व त्यामुळे डोके गरगरते. यासाठी बेडवरून उठताना थोडावेळ बसून मगच सावकाश उभे राहावे.
- वारंवार डोके गरगरत असल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे जावे.
हे सुद्धा वाचा – चक्कर येण्याची कारणे व उपाय जाणून घ्या.
Read Marathi language article about Dizziness causes, symptoms, treatments and home remedies. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.