नाचणीची भाकरी –
नाचणीमध्ये भरपूर पौष्टिक घटक असतात. आपल्या आरोग्यासाठी नाचणी धान्य फायदेशीर असून ते ग्लूटेन फ्री असते. आपल्या भागात आहारात नाचणीची भाकरी करून खाल्ली जाते. नाचणीची भाकरी थोडीशी काळपट दिसत असते. त्यामुळे बरेचजण नाचणीची भाकरी खाण्यास टाळतात. मात्र नाचणीची भाकरी ही आरोग्यासाठी खूपच गुणकारी असते. त्यामुळे आपल्या जेवणात नाचणीच्या भाकरीचा आवर्जून समावेश केला पाहिजे.
नाचणी मध्ये अनेक उपयुक्त पोषक घटक असतात. त्यामुळे नाचणीची भाकरी देखील आरोग्यासाठी फायदेशीर असते. ही भाकरी खाल्याने ब्लड शुगर नियंत्रित राहत असल्याने मधुमेह रुग्णांसाठी ही भाकरी योग्य असते. हाय ब्लडप्रेशर असणाऱ्या रुग्णांसाठी देखील नाचणीची भाकरी चांगली असते. नाचणीच्या भाकरीत कॅल्शिअम मुबलक असल्याने हाडे मजबूत होतात. नाचणी भाकरी खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते. ही भाकरी खाल्ल्याने वजन कमी होण्यासाठी मदत होते. आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा ही भाकरी हितकारी असते.
नाचणीची भाकरी खाण्याचे फायदे –
1) नाचणीची भाकरी मधुमेह रुग्णांसाठी चांगली असते..
मधुमेह आजाराने आज बरेच जण त्रस्त आहेत. मधुमेही रुग्णांनी आहारात नाचणीची भाकरी समाविष्ट केल्यास शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी आहारात नाचणीच्या भाकरीचा जरूर समावेश करावा.
2) नाचणीची भाकरी खाल्याने हिमोग्लोबिन वाढते..
शरीरात लोहाची कमतरता असल्यास अॅनिमियाचा त्रास होतो. अशावेळी हिमोग्लोबिनची पातळी कमी होते. त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. यावर नाचणी भाकरी खूप फायदेशीर असते. कारण नाचणीच्या भाकरीत लोहाचे मुबलक प्रमाण असते. त्यामुळे हिमोग्लोबिन वाढते. यासाठी हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यांनी नाचणीची भाकरी जरूर खावी.
3) नाचणीची भाकरी खाल्ल्याने वजन आटोक्यात राहते..
आजकाल अनेकजण हे लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. अशा लोकांसाठी नाचणीची भाकरी खूप उपयोगी ठरते. कारण नाचणीमध्ये भरपूर अमिनो अॅसिड असते. त्यामुळे आपल्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच नाचणीच्या भाकरीमध्ये भरपूर फायबर असल्याने भूक कमी लागते. भूक नियंत्रित होत असल्याने वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास, तुमच्या आहारात नाचणीच्या भाकरीचा समाविष्ट करा.
4) नाचणीची भाकरी खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो..
रोज नाचणीची भाकरी जेवणात असल्यास रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते. त्यामुळे ज्यांना हाय ब्लडप्रेशरची समस्या आहे त्यांनी आपल्या आहारात नाचणीची भाकरी जरूर समाविष्ट करावी.
5) नाचणीची भाकरी हृदयासाठी चांगली असते..
रोज नाचणीची भाकर खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. कारण नाचणीच्या भकरित मुबलक प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे वाईट कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. वाईट कोलेस्टेरॉल कमी झाल्याने धमनीकाठिण्य यासारख्या हृदयरोगास कारणीभूत ठरू शकणाऱ्या समस्या दूर होतात. मुख्य म्हणजे, नाचणी हे “चांगल्या” कोलेस्टेरॉलची पातळी वाढवते आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करते. त्यामुळे दररोज नाचणीची भाकरी खाल्ल्याने तुमचे हृदय निरोगी राहण्यास मदत होऊ शकते.
6) नाचणीची भाकरी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात..
हाडे मजबूत करण्यासाठी आपल्याला कॅल्शियमची आवश्यकता असते. आणि नाचणीच्या भाकरित कॅल्शियम भरपूर असते. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस यांसारख्या हाडांशी संबंधित आजार दूर राहतात. म्हणून हाडे मजबूत करण्यासाठी नाचणीची भाकरी आवर्जून खावी.
7) स्तनपान करणाऱ्या मातांसाठी नाचणीची भाकरी चांगली असते..
जर तुम्ही स्तनपान करणारी आई असाल तर, तुम्ही तुमच्या आहारात नाचणी भाकरीचा समावेश करा. यामुळे आईचे दूध वाढण्यास मदत होते. तसेच यात आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारे अमीनो अॅसिड, लोह आणि कॅल्शियम यासारखे पोषक घटकसुध्दा भरपूर प्रमाणात असतात.
नाचणीची भाकरी कशी करायची ?
ज्वारी, बाजरीच्या पिठाची जशी आपण भाकरी करतो त्याचप्रमाणे नाचणीच्या पिठाची भाकरी केली जाते. यासाठी नाचणीच्या पिठात थोडे पाणी घालून कणीक बनवले जाते. त्यानंतर भाकऱ्या करून तव्यावर भाजल्या जातात.
नाचणी भाकरी कोणी खाऊ नये ?
नाचणीमध्ये कॅल्शिअम चे प्रमाण जास्त असल्यामुळे मूतखडा असणाऱ्या रुग्णांनी नाचणीची भाकरी खाणे टाळावे. तसेच नाचणीची ऍलर्जी असल्यास त्यामुळे ऍलर्जीचा त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे नाचणीची ऍलर्जी असणाऱ्यानी नाचणी खाणे टाळावे.
हे सुध्दा वाचा – ताक पिण्याचे फायदे जाणून घ्या.
Read Marathi language article about Ragi roti benefits. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.