Dr Satish Upalkar’s article about Healthy Gums tips in Marathi.
हिरड्या मजबूत करणे –
हिरड्यांना सूज येणे, हिरड्या दुखू लागणे, हिरड्यांमधून रक्त येणे अशा हिरड्यांच्या अनेक तक्रारी होत असतात. यासाठी हिरड्या निरोगी असणे आवश्यक असते. तसेच दातांचे आरोग्य टिकण्यासाठी हिरड्या मजबूत असाव्या लागतात. हिरड्या मजबूत होण्यासाठी कोणते उपाय करावेत याविषयी माहिती या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी सांगितली आहे.
दातांच्या हिरड्या कमजोर होण्याची कारणे –
- तोंडाची व्यवस्थित स्वच्छता न ठेवल्याने हिरड्या कमजोर होतात.
- स्वच्छतेअभावी तोंडात बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा आणि हिरड्यांवर प्लाक तयार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे हिरड्यांना सूज येणे, हिरड्यांना इन्फेक्शन होणे असे त्रास होऊन हिरड्या कमजोर होतात.
- शरीरात व्हिटॅमिन-C ची कमतरता असल्यास त्यामुळेही हिरड्या कमजोर होऊ शकतात. व्हिटॅमिन-C च्या कमतरतेमुळे हिरड्यांमधून रक्तस्राव होतो. याशिवाय हिरड्यांना संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो.
- गरोदरपणात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे देखील काही स्त्रियांच्या हिरड्या कमजोर होऊ शकतात.
- तंबाखूच्या व्यसनामुळेही दात आणि हिरड्या कमकुवत होत असतात.
- दात घासण्यासाठी योग्य ब्रश न वापरल्याने हिरड्यांना दुखापत होऊन हिरड्या कमजोर होऊ शकतात.
दातांच्या हिरड्या कमजोर झाल्याची लक्षणे –
- दात हलू लागणे,
- हिरड्यांना संसर्ग (इन्फेक्शन) होणे,
- हिरड्यांना सूज येणे,
- हिरड्या दुखू लागणे,
- अन्न चवताना हिरड्यामध्ये वेदना होणे,
- हिरड्यांमधून पू आणि रक्तस्त्राव होणे.
- तोंडातून दुर्घंधी येणे,
हिरड्या मजबूत होण्यासाठी 4 सोपे घरगुती उपाय –
1) हिरड्या मजबूत करण्यासाठी तोंडाची स्वच्छता राखा.
हिरड्या निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी तोंडाची स्वच्छता राखणे आवश्यक आहे. यासाठी सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करा. हिरड्या मजबूत होण्यासाठी फ्लोराईड युक्त टूथपेस्ट वापरावी.
2) हिरड्या मजबूत होण्यासाठी ऑईल पूलिंग करा.
हिरड्या मजबूत करण्यासाठी ऑईल पूलिंग करणे फायदेशीर ठरते. यासाठी ब्रश करण्यापूर्वी तोंडात एक चमचा खोबरेल तेल घेऊन ते तोंडाच्या आतील बाजूस फिरवत राहा. आणि 15 मिनिटांनी चूळ भरावी व ते तेल थुंकून टाका. यामुळे हिरड्या स्वच्छ होतात, तेथे इन्फेक्शन होत नाही. हिरड्या मजबूत करण्यासाठी हा घरगुती उपाय खूप उपयोगी पडतो. यामुळे हिरड्या मजबूत होण्यासाठी मदत होते. यासाठी तीळ तेलाचा सुद्धा आपण वापर करू शकता.
3) हिरड्या मजबूत करण्यासाठी कडुनिंबाची पाने चावून खा.
हिरड्या मजबूत होण्यासाठी कडुनिंबाची पाने चावत रहावीत. कडुनिंबाची पाने ही अँटी-बॅक्टेरिअल व अँटी-इनफ्लैमटरी गुणांची असताात. यामुळे हिरड्या निर्जंतूक होतात. तेथे इन्फेक्शन होत नाही. पर्यायाने या आयुर्वेदिक उपायाने दातांच्या हिरड्या मजबूत होण्यासाठी मदत होते.
4) हिरड्या मजबूत होण्यासाठी व्हिटॅमिन-C चा आहारात समावेश करा.
व्हिटॅमिन-C मुळे हिरड्यातून रक्त येणे, हिरड्यांना सूज येणे यासारख्या समस्या दूर राहतात. विविध फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-C असते. यासाठी आपल्या आहारात आवळा, संत्री, मोसंबी, पपई, किवी, स्टॉबेरी अशी व्हिटॅमिन-C युक्त असणारी फळे समाविष्ट करावीत.
हिरड्या मजबूत करण्यासाठी नेमके काय करावे ..?
- तोंडाची स्वच्छता ठेवा.
- दोनवेळा नियमित दात घासा.
- दात घासण्यासाठी फ्लोराईड टूथपेस्ट वापरा.
- माउथवॉश वापरा.
- दात घासताना हिरड्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
- मऊ ब्रिसल्स असलेला टूथब्रश वापरावा.
- वर्षातून एकदा डेंटल चेकअप करून घ्या.
- तंबाखू, पानमसाला, गुटखा, धूम्रपान अशा व्यसनांपासून दूर राहा.
अशी हिरड्यांची काळजी घेतल्यास हिरड्या मजबूत होण्यासाठी मदत होते.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुध्दा वाचा – हिरड्यातून रक्त येण्याची कारणे व उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
4 SourcesIn this article information about Healthy Gums tips in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.