Dr Satish Upalkar’s article about Health Benefits of Sesame Oil or Til tel in Marathi.
तीळ तेल – Sesame Oil :
तिळाच्या बियापासून तिळाचे तेल काढले जाते. तिळाच्या तेलात अनेक उपयुक्त पोषक घटक असतात. तीळाचे तेल हे आरोग्यदायी असते. त्यामुळेच आयुर्वेदाने सर्व तेलांमध्ये तिळाचे तेल हे सर्वश्रेष्ठ मानलेले आहे. तिळाच्या तेलात व्हिटॅमिन-E, ओमेगा-6 फॅटी ऍसिड, कॅल्शियम, फॉस्फरस, तांबे, मॅग्नेशियम, प्रोटीन्स अशी महत्वाची पोषकतत्वे असतात. ह्या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी तिळाचे तेल खाण्याचे फायदे व नुकसान याची माहिती सांगितली आहे.
तीळ तेलाचे उपयोग –
तिळाचे तेल खाण्यासाठी तसेच आयुर्वेदिक औषधे, सौंदर्यप्रसाधने यामध्येही वापरले जाते. तीळ तेलाचा बर्याच अन्नपदार्थामध्ये उपयोग केला जातो. तसेच या तेलाच्या औषधी गुणधर्मांमुळे त्वचा उजळण्यासाठी आणि केसांचे पोषण करण्यासाठी सौंदर्यप्रसाधने बनवण्यासाठी देखील तिळाचे तेल वापरतात.
तीळ तेलाचे फायदे –
आरोग्यासाठी तिळाच्या तेलाचे फायदे अनेक आहेत. तीळ तेलात उपयुक्त अँटिऑक्सिडेंट्स असतात. दररोज चार चमचे तीळ तेल पिण्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण कमी होते. दररोज आहारातून तीळ तेल खाल्याने हृदयविकार, स्ट्रोक, धामनीकाठिण्यता अशा घातक आजारांपासून बचाव होतो. तिळाच्या तेलामुळे रक्तातील साखर कंट्रोलमध्ये राहते. त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी तीळ तेल फायदेशीर ठरते.
तीळ तेलामुळे हाडे मजबूत होतात. या तेलातील anti-inflammatory गुणांमुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो. असे तिळाचे तेल खाण्याचे अनेक फायदे असतात.
तिळाचे तेल खाण्याचे फायदे – Health Benefits Of Til tel in Marathi :
1) तिळाच्या तेलात उपयुक्त अँटिऑक्सिडेंट्स असतात ..
तिळाच्या तेलात आरोग्यासाठी महत्वाची असणारी अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. तिळाच्या तेलात प्रामुख्याने सेसामोल (sesamol) आणि सेसमिनॉल (sesaminol) ही दोन अँटिऑक्सिडंट असतात. ह्या अँटिऑक्सिडंट्मुळे फ्री रॅडिकल्समुळे होणारे पेशींचे नुकसान कमी होण्यास मदत होते. यामुळे विविध प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी होतो.
2) तिळाचे तेल खाणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते ..
हृदयाच्या आरोग्यासाठी अनसॅच्युरेटेड फॅट्स फायदेशीर असतात. तिळाच्या तेलात 82% अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात. त्यातही ओमेगा-6 फॅटी ऍसिडचे प्रमाण तीळ तेलात अधिक असते. ओमेगा-6 फॅटी ऍसिड हा घटक आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचा असतो. तिळाचे तेल खाण्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हृदयविकार, पक्षाघात, धामनीकाठिण्यता अशा घातक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.
3) तिळाचे तेल खाणे हे डायबेटिस रुग्णांसाठी उपयुक्त असते ..
तीळाच तेल खाण्यात असल्यास रक्तातील साखर आणि हिमोग्लोबिन A1c (HbA1c) यांचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी जेवणात तिळाच्या तेलाचा जरूर वापर करावा.
4) तीळ तेल हे हाडांसाठी फायदेशीर असते ..
तिळाच्या तेलात फॉस्फरस, कॅल्शियम आणि तांबे हे घटक असतात. हे घटक हाडे मजबूत करण्यास मदत करतात. त्यामुळे रोजच्या आहारात तीळ तेलाचा वापर केल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होते. तिळाचे तेल खाण्यामुळे ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडे ठिसूळ होण्याचा धोका कमी होतो.
5) तीळ तेल वजन कमी करण्यासाठी मदत करते ..
तिळाच्या तेलात भरपूर प्रमाणात असणाऱ्या पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडमुळे वजन कमी होण्यास मदत होते. यामुळे प्लाझ्मा लेप्टिनची पातळी वाढते व भूक कमी लागते. त्यामुळे तिळाच्या तेलाचा रोजच्या आहारात समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
6) केसांच्या आरोग्याससाठी तिळाचे तेल उपयुक्त असते ..
केसांच्या पोषणासाठी तिळाचे तेल खूप फायदेशीर ठरते. यासाठी तिळाचे तेल थोडे कोमट करून ते केसांच्या मुळाशी लावून हलक्या हाताने मसाज करावा. तेल काही वेळ केसांमध्ये तसेच ठेऊन थोड्या वेळाने पाण्याने केस धुवावेत. यामुळे केसांना आतून पोषण मिळते व केस गळणे, कोंडा होणे, केस पांढरे होणे यासारख्या समस्या दूर होतात. तसेच केसांची वाढ योग्यरीत्या होण्यास मदत होते.
7) तिळाचे तेल त्वचेसाठी फायदेशीर असते ..
त्वचेला तिळाचे तेल लावल्यास त्वचा मॉइश्चरायझ होऊन त्वचा चमकदार होते. तीळ तेलात असणाऱ्या अँटिऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन-E घटकांमुळे फ्री रॅडिकल्सपासून रक्षण होते. त्यामुळे त्वचेसाठी तीळ तेल हे सनस्क्रीन म्हणून काम करते. तिळाच्या तेलात मुलतानी माती आणि हळद मिसळा आणि हा फेसपॅक चेहऱ्यावर लावावा व थोड्या वेळाने चेहरा पाण्याने धुवावा. यामुळेही चेहरा चमकदार होईल आणि सन टॅन होत नाही.
8) तिळाचे तेल सांधेदुखीमध्ये गुणकारी असते ..
तिळाच्या तेलात सूज कमी करणारे anti-inflammatory गुणधर्म असतात. त्यामुळे सांधेदुखी, गुडघेदुखी, मांसपेशी दुखणे यासारखे त्रास असणाऱ्यांनी तीळ तेलाचा आहारात समावेश करावा. तसेच तिळाचे तेल थोडे कोमट करून त्या तेलाने सूज आलेल्या ठिकाणी हळुवार मालिश करावी. यामुळे सूज कमी होऊन वेदना कमी होण्यास मदत होते. यासाठीच सांधेदुखी वैगेरे वरील आयुर्वेदिक औषधी तेलांमध्ये तीळ तेल वापरले जाते.
तीळ तेल खाण्याचे नुकसान व तोटे –
तिळाचे तेल जास्त प्रमाणात खाल्यास ते नुकसानदायक ठरू शकते. तिळाचे तेल खाण्यामुळे आरोग्यावर खालील नुकसान होऊ शकतात.
- तिळाचे तेल जास्त प्रमाणात खाल्याने वजन वाढू शकते.
- तिळाच्या तेलामुळे काहीजणांना ऍलर्जीची समस्या होऊ शकते.
- तीळ तेल जास्त प्रमाणात खाल्याने पचन समस्या होऊ शकतात.
तीळ तेल कोणी खाऊ नये ..?
- ज्यांना तिळाच्या तेलाची ऍलर्जी आहे त्यांनी तीळ तेल खाऊ नये.
- रक्त पातळ करणारे औषध घेत असणाऱ्यांनी तिळाचे तेल खाणे टाळावे.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुध्दा वाचा –
भात कोंडा तेल खाण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
Image source – Photo by Dr. Satish Upalkar (Wikimedia Commons)
Information about Sesame Oil Benefits, Uses & Side effects in Marathi language. Til tel is known as Sesame Oil in English. This health article is written by Dr Satish Upalkar.