एवोकॅडो फळ (Avocado) –
एवोकॅडो हे नाशपातीच्या आकाराचे उष्णकटिबंधीय फळ आहे. याची साल ही जाड असून हिरव्या रंगाची असते. अॅव्होकॅडोमध्ये आरोग्यासाठी आवश्यक असे अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे हेल्दी लाईफस्टाईलमध्ये एवोकॅडोचा आवर्जून समावेश केला जातो. अर्ध्या एवोकॅडोमध्ये सुमारे 160 कॅलरीज असतात. एवोकॅडो खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात आढळणारे फॅटी अॅसिड हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
अवकॅडो मध्ये अनेक उपयुक्त पोषकघटक असतात. अॅव्होकॅडो खाण्यामुळे वजन आटोक्यात राहते, तसेच हृद्यविकाराचा धोका कमी होतो. रक्तदाब नियंत्रित राहतो, रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते. मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. हाडे मजबूत होतात तसेच सांध्यातील सूज व वेदना कमी होतात. यातील फायबरमुळे पोट साफ होते. विविध प्रकारच्या कॅन्सरपासून दूर राहण्यास मदत होते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी अवकॅडो खाणे फायदेशीर असते. तसेच यामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्यही सुधारते.
अॅव्होकॅडो फळ खाण्याचे आरोग्यदायी 9 फायदे –
1) हृदय निरोगी राहते .
अॅव्होकॅडो नियमित खाण्यामुळे हृदयविकारापासून रक्षण होण्यास मदत होते. कारण एवोकॅडोमध्ये असणारी जीवनसत्त्वे, खनिजे, हेल्दी फॅट्स आणि फायबर्स हे सर्व पोषकघटक हृदय व रक्तवाहिन्याच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. एवोकॅडो खाण्यामुळे HDL हे चांगले प्रकारचे कोलेस्टेरॉल वाढते तर LDL ह्या वाईट प्रकारच्या कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत होते. तसेच एवोकॅडोमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील मुबलक असते. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते. अशाप्रकारे अॅव्होकॅडो नियमित खाण्यामुळे हृदय व रक्तवाहिन्या निरोगी राहतात. त्यामुळे एथेरोस्क्लेरोसिस (धामणीकाठिण्यता), हाय ब्लडप्रेशर, हार्ट अटॅक, पक्षाघात यासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो.
2) वजन आटोक्यात राहते .
अॅव्होकॅडोमध्ये कॅलरीज जास्त असल्या तरीही यात अनेक पोषकतत्वे असतात. यात असणाऱ्या फायबर्स आणि हेल्दी फॅट्समुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. अॅव्होकॅडो खाण्यामुळे बराचवेळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळेही भूक कमी लागून वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात अॅव्होकॅडोचा जरूर समावेश करा.
3) पचनक्रिया सुधारते .
एवोकॅडोमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. यामुळे पोट व्यवस्थित साफ होऊन बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर होतात दररोज पोट साफ होत नसल्यास आहारात अॅव्होकॅडोचा जरूर समावेश करा. तसेच आतड्यांच्या कार्यासाठी अॅव्होकॅडो खाणे फायदेशीर असते. नियमित अॅव्होकॅडो खाण्यामुळे पचनक्रिया सुधारते.
4) डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते .
एवोकॅडो खाण्यामुळे डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी मदत होते. कारण यात ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन नावाची फायटोकेमिकल्स अँटिऑक्सिडंट असतात. ज्यामुळे मॅक्युलर डीजेनरेशनचा धोका कमी होऊन वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या मोतीबिंदू आणि डोळ्यांच्या इतर समस्या टाळण्यास मदत होते.
5) सांधेदुखी कमी होते .
एवोकॅडोमध्ये वेदनाशामक आणि सूज कमी करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे सांधेदुखी सारख्या समस्या दूर होण्यास यामुळे मदत होते. तसेच संधिवात टाळण्यासाठी आणि सांधे निरोगी राहण्यासाठी अॅव्होकॅडो खाणे फायदेशीर असते.
6) हाडे मजबूत होतात .
अॅव्होकॅडोमध्ये व्हिटॅमिन-K चे प्रमाण भरपूर असते. हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन-D ह्या घटकांबरोबरच व्हिटॅमिन-K सुध्दा आवश्यक असते. व्हिटॅमिन-K मुळे हाडात कॅल्शियमचे शोषण होण्यास मदत होते. त्यामुळे अॅव्होकॅडो खाल्याने हाडे मजबूत होतात व ऑस्टिओपोरोसिस ह्या हाडे ठिसूळ होण्याच्या आजारापासून बचाव होतो.
7) ब्लड शुगर आटोक्यात राहते .
अॅव्होकॅडो खाण्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. त्यामुळे Type-2 डायबेटिस होण्यापासून रक्षण होण्यास मदत होते.
8) विविध कॅन्सरपासून रक्षण करते .
एवोकॅडोमध्ये अँटिऑक्सिडंट, फायटोकेमिकल्स आणि कॅरोटीनॉइड्सचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे एवोकॅडो खाण्यामुळे तोंडाचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, स्वादुपिंड कॅन्सर आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.
9) त्वचेचे आरोग्य सुधारते .
अवकॅडोमध्ये अँटी एजिंग घटक असल्याने अवकॅडो नियमीत खाल्याने त्वचा चांगली राहण्यासाठी मदत होते.
एवोकॅडो फळ कसे खावे ..?
एवोकॅडो हे फळ प्रामुख्याने कच्चे खाल्ले जाते. अॅव्होकॅडो हे कच्चे खाल्ल्यास सर्वाधिक फायदा होतो. तसेच अॅव्होकॅडोचे लहान तुकडे करून त्यावर काळी मिरी आणि सैंधव मीठ घालून सॅलड म्हणून सर्व्ह करून खाऊ शकता.
रोज किती अॅव्होकॅडो खावे ..?
अधिक प्रमाणात अॅव्होकॅडो खाणे टाळले पाहिजे. दररोज अर्धा ते एक अवकॅडो खावे. यापेक्षा अधिक खाऊ नये.
एवोकॅडो खाण्याचे तोटे (Side effects) :
एवोकॅडो खाण्याचे फायदे भरपूर असले तरीही जास्त प्रमाणात अवकॅडो खाणे टाळले पाहिजे. अवकॅडो खाल्यामुळे काहीजणांना अॅलर्जी होऊ शकते.
एवोकॅडो कोणी खाऊ नये ..?
- ज्यांना लॅटेक्सची अॅलर्जी अशा व्यक्तींनी एवोकॅडो खाणे टाळावे.
- डायबेटिस रुग्णांनी एवोकॅडोचा आहारात समावेश करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कारण एवोकॅडो खाण्यामुळे ब्लड शुगर एकाएकी कमी होऊन गुंतागुंती वाढू शकतात.
- लो ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्यांनी एवोकॅडो खाणे टाळावे. कारण यामुळे ब्लड प्रेशर कमी होण्याची शक्यता असते.
एवोकॅडोतील पोषकतत्वे (Nutrition Facts) :
एवोकॅडोमध्ये उपयुक्त पोषकतत्त्वे भरपूर असतात. अॅव्होकॅडोमध्ये ओमेगा-3 ह्या हेल्दी फॅटी ऍसिडचे मुबलक प्रमाण असते. एवोकॅडोत व्हिटॅमिन C, E, K आणि B6, तसेच रिबोफ्लेविन, नियासिन, फोलेट, पॅन्टोथेनिक ऍसिड, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असे पोषकतत्वे असतात. तसेच ह्यात ल्युटीन, बीटा कॅरोटीन, हेल्दी फॅट्स आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड देखील असते. एवोकॅडोमध्ये फायबर्सही भरपूर प्रमाणात असते. यात असलेल्या पोषक तत्वांमुळे अॅव्होकॅडोला सुपर फूड म्हणूनही ओळखले जाते.
अर्ध्या एवोकॅडोमध्ये 160 कॅलरीज, 2 ग्रॅम प्रोटीन्स, 8.5 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 14.7 ग्रॅम फॅट असे घटक असतात. अॅव्होकॅडो हे मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन-C, व्हिटॅमिन-E आणि व्हिटॅमिन-K यांचे मुबलक प्रमाण असते. अर्ध्या एवोकॅडोमध्ये खालील पोषक घटक असतात.
- कॅलरी : 160
- फॅट : 14.7 ग्रॅम
- सोडियम : 7 मिलीग्राम
- कर्बोदके : 8.5 ग्रॅम
- फायबर : 6.7 ग्रॅम
- साखर : 0.7 ग्रॅम
- प्रथिने : 2 ग्रॅम
- मॅग्नेशियम : 29 मिलीग्राम
- पोटॅशियम : 485 मिग्रॅ
- व्हिटॅमिन सी : 10 मिग्रॅ
- व्हिटॅमिन ई : 2.1 मिग्रॅ
- व्हिटॅमिन के : 21mcg
हे सुध्दा वाचा – केळे खाण्याचे फायदे व नुकसान जाणून घ्या..
Read Marathi language article about avocado fruit Health benefits & Side effects. Last Medically Reviewed on March 10, 2024 By Dr. Satish Upalkar.