स्वाईन फ्लू म्हणजे काय व स्वाईन फ्लू आजार होण्याची कारणे, लक्षणे व उपचार – Swine flu in Marathi

स्वाईन फ्लू आजार – Swine Flu (H1N1) :

स्वाईन फ्लू हा एक संसर्गजन्य आजार असून त्याची लागण ही H1N1 ह्या व्हायरसपासून होते. स्वाईन फ्लूची लक्षणे ही साधारण फ्ल्यू सारखीच म्हणजे सर्दी होणे, खोकला, ताप येणे अशी असतात. स्वाईन फ्लूचा व्हायरस हा डुकरांमधून माणसाकडे पसरला आहे. 2009 साली पहिल्यांदा स्वाईन फ्ल्यू हा आजार माहीत झाला.

स्वाईन फ्लू होण्याची कारणे – Causes of swine flu :

स्वाईन फ्ल्यू बाधित व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला याचा संसर्ग होऊ शकतो. बाधित व्यक्तीच्या शिंकेद्वारे किंवा खोकल्यातून H1N1 विषाणू हे हवेत पसरत असतात. ह्या विषाणूंचा स्वस्थ व्यक्तीच्या नाक, तोंड, डोळे, त्वचा ह्यांचेशी संपर्क झाल्यास विषाणूंचे संक्रमण होते व त्या व्यक्तीलाही याची लागण होते.

स्वाईन फ्ल्यू बाधित रुग्णाच्या एका शिंकेद्वारे हजारो जंतू हवेमध्ये पसरून संसर्ग माजवू शकतात. स्वाईन फ्लूचे विषाणू हवेत 8 तास जीवंत राहू शकतात. म्हणून स्वाईन फ्ल्यूला अतिशय संसर्गजन्य असा आजार असेही संबोधले जाते.

स्वाईन फ्लूची ही आहेत लक्षणे – Swine flu symptoms :

स्वाईन फ्लूची लक्षणे ही सामान्य फ्लू सारखीचं असतात.
• ताप येणे,
• हुडहुडी व थंडी वाजणे,
• ‎ सर्दी येणे, नाक वाहणे,
• ‎ खोकला,
• ‎ घशात दुखणे,
• अंगदुखी, डोके दुखणे,
• पोटात दुखणे,
• अतिसार,
• ‎ मळमळ व उलटी होणे यासारखी लक्षणे स्वाईन फ्ल्यूमध्ये असू शकतात.

स्वाईन फ्लूमुळे जास्त धोका कोणाला असतो..?

65 वर्षावरील वयोवृद्ध व्यक्ती
पाच वर्षापेक्षा कमी वयाची लहान मुले,
गरोदर स्त्रिया,
इम्युन सिस्टीमसंबंधित AIDS वैगेरे आजार असणारे रुग्ण,
हृदयविकार, डायबेटीस, किडनीचे विकार, अस्थमा पेशंट अशा व्यक्तींमध्ये स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्यास आजार अधिक गंभीर बनून जास्त धोकादायक ठरत असतो.

स्वाईन फ्लूचे निदान असे करतात :

स्वाईन फ्ल्यूची साथ परिसरात आलेली असल्यास रुग्णामध्ये सर्दी, ताप अशी लक्षणे असल्यास आपले डॉक्टर स्वाईन फ्ल्यूच्या निदानासाठी काही चाचण्या करतात. यामध्ये रुग्णाच्या घशातील स्त्राव (swab) तपासणीसाठी घेतला जातो व त्याद्वारे स्वाईन फ्ल्यूचे निदान केले जाते.

स्वाईन फ्लूवर हे आहेत उपचार – Swine flu treatments :

पेशंटमध्ये असणाऱ्या लक्षणांनुसार स्वाईन फ्लूवर उपचार केले जातात. यावर उपचारासाठी अँटी-व्हायरल औषधे दिली जातील. यासाठी Tamiflu आणि zanamivir ही औषधे वापरली जातात. रुग्णास ताप, डोकेदुखी आणि अंगदुखी असे त्रास होत असल्यास वेदनाशामक औषधे दिली जातात.

स्वाइन फ्ल्यूची लागण झालेल्या रुग्णाने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. अशा रुग्णांनी पूर्णपणे बरे होईपर्यंत बेडरेस्ट घेणे गरजेचे असते. पूर्णपणे बरे होईपर्यंत इतर लोकांना आपल्यामुळे याची लागण होणार नाही याचीही रुग्णांनी काळजी घ्यावी. शरीरात डिहायड्रेशन होऊ नये म्हणून ओ.आर.एस. सोल्युशन, पाणी व इतर पातळ पदार्थ म्हणजे सूप, फळाचा रस इ. भरपूर प्रमाणात घ्यावे.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

स्वाईन फ्लूपासून बचाव असा करावा – स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक उपाययोजना :

स्वाईन फ्लूचे विषाणू हे बाधित व्यक्तींच्या खोकण्यातून किंवा शिंकाद्वारे हवेच्या माध्यमातून आपल्यामध्ये येऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्यक असते. स्वाईन फ्ल्यूची लागण होऊ नये म्हणून कोणते प्रतिबंधात्मक उपाय (prevention tips) करावेत याची माहिती खाली दिलेली आहे.
• वारंवार आपले हात सॅनिटायजर, साबण किंवा हँड वॉशने स्वच्छ धुवावेत.
• तोंडावर मास्कचा वापर करावा.
• ‎वारंवार आपल्या डोळ्यांना , नाकाला  व तोंडाला हात लावणे टाळावे.
• ‎आपणास सर्दी, खोकला असल्यास घरीच थांबावे. गर्दिच्या ठिकाणी जाऊ नये.
• सर्दी, ताप, घसादुखी असल्यास डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत. घरगुती उपाय करीत बसू नये.
• ‎दारवर्षी स्वाइन फ्लूवर लसीकरण केल्यास यापासून बचाव होऊ शकतो. स्वाइन फ्ल्यूवर अनेक लसी (vaccine) सध्या उपलब्ध आहेत. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या घेऊ शकता.

हे लेख सुद्धा वाचा..
डेंग्यू ताप माहिती
मलेरिया किंवा हिवताप आजार
चिकूनगुण्या आजार
लेप्टोस्पारोसिस आजार

Information about Swine flu symptoms, causes, prevention & treatments in Marathi language.

© लेखक- डॉ. सतीश उपळकर
ही माहिती आपणास आवडल्यास आमचे Youtube चॅनेल subscribe जरूर करा. असेच उपयुक्त माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपणास मोफत उपलब्ध होतील. यासाठी खालील YouTube subscribe बटनावर क्लिक करा.