Dr Satish Upalkar’s article about Chickenpox information in Marathi.
कांजिण्या म्हणजे काय – Chickenpox in Marathi :
कांजिण्या हा विषाणूपासून होणारा एक संसर्गजन्य आजार आहे. कांजिण्या आजारास Chicken Pox (चिकनपॉक्स) किंवा व्हॅरिसेला (varicella) या नावानेही ओळखले जाते. कांजण्या आजाराची लागण ही प्रामुख्याने लहान मुलांमध्ये अधिक झालेली आढळते. या आजारात शरीरावर खाज सुटणारे लालसर फोड येत असतात. कांजिण्या का व कशामुळे होतो, कांजिण्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपचार अशी कांजिण्या या रोगाची सर्व माहिती डॉ सतीश उपळकर यांनी या लेखात दिली आहे.
कांजण्या या रोगाची कारणे – Chickenpox causes :
कांजिण्या आजार हा Varicella-zoster व्हायरसमुळे होतो. व्हॅरिसेला-झोस्टर व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे कांजिण्या आजाराचा संसर्ग होत असतो. याशिवाय कांजिण्या असलेल्या व्यक्तीकडून याची लागण दुसऱ्याला होऊ शकते. अशाप्रकारे कांजण्या आजार होत असतो.
कांजण्या रोग कसा पसरतो ..?
कांजिण्या हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होत असते. कांजिण्याची लागण झालेल्या रुग्णाच्या खोकला, शिंका, लाळ, रुग्णाची दूषित कपडे किंवा रुग्णाच्या अंगावरील फुटलेल्या फोडातील पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे दुसऱ्या व्यक्तिमध्येही कांजिण्याची लागण होऊन हा आजार पसरत असतो.
कांजिण्याची लक्षणे – Chickenpox Symptoms :
शरीरात व्हायरसची लागण झाल्यापासून लक्षणे दिसण्यासाठी साधारण 7 ते 21 दिवस लागू शकतात. अशावेळी सुरवातीला खालील लक्षणे चिकनपॉक्समध्ये जाणवू शकतात.
- ताप येणे,
- सर्दी व खोकला होणे,
- डोकेदुखी,
- भूक मंदावणे
वरील लक्षणे जाणवू लागल्यानंतर एक किंवा दोन दिवसात अंगावर लाल किंवा गुलाबी रंगाचे पुरळ (फोड) येण्यास सुरवात होते. पुरळ आलेल्या ठिकाणी खाज सुटत असते. त्यानंतर पुढील पाच ते सात दिवसात त्या पुरळात पाणी व पू धरतो. पुढे ते फोड फुटतात व त्याठिकाणी काळसर डाग दिसू लागतात. त्यानंतर काही दिवसात कांजिण्या आजार बरा होतो व त्वचेवर आलेले डागही काही दिवसांनी नाहीसे होतात.
कांजण्या वरील उपचार – Chickenpox treatments :
कांजण्यावर लक्षणानुसार उपचार केले जातात. आपले डॉक्टर ताप आणि खोकला कमी करण्यासाठी औषधे देतील. याशिवाय पुरळावर जंतुनाशक क्रीम लावण्यासाठी देतील. तसेच अंगावरील खाज कमी करण्यासाठी अँटीहिस्टामाइन औषधे किंवा मलहम दिले जाते. एक ते दोन आठवड्यात आजार बरा होतो.
मात्र काही दिवस कांजण्याचे डाग राहू शकतात. कांजण्याचे डाग घालवण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
कांजण्या वर घरगुती उपाय –
कांजण्या मध्ये फोड आलेल्या ठिकाणी दिवसातून दोनवेळा कडुनिंबाच्या पानांची पेस्ट लावावी. कडुनिंबमध्ये अॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे कडुनिंबाच्या घरगुती उपायाने कांजण्यापासून लवकर सुटका होण्यासाठी मदत होते.
कांजिण्या रुग्णांनी घ्यायची काळजी –
- आपल्या डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत.
- डॉक्टरांनी दिलेली जंतुनाशक क्रीम फोडांवर लावावी.
- त्वचेवरील फोड नखांनी फोडू नयेत.
- रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी.
- इतरांना याची लागण होऊ नये यासाठी काही दिवस कांजण्या झाल्यास मुलांना शाळेला पाठवून देऊ नये.
- मोठ्या व्यक्तींनीही कांजिण्या झाल्यास काही दिवस घरीच थांबावे.
- पुरळ डोळ्यांकडे पासरल्यास किंवा अधिक लालसर पुरळ दिसत असल्यास डॉक्टरांकडे जावे.
- तसेच जर चक्कर येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यासही डॉक्टरांकडे जावे.
कांजण्या आणि आहार – Chickenpox diet plan :
कांजिण्या झाल्यास काय खावे ..?
वरणभात, उसळ, डाळ, दुधाचे पदार्थ, उकडलेल्या अंड्याचा पांढरा भाग, मांस, मासे यांचा आहारात समावेश करू शकता. सफरचंद, केळी, खरबूज अशी फळे व ब्रोकोली, पालक सारख्या भाज्याही आहारात असाव्यात. विशेषतः लोह घटक असणारे पदार्थ खाणे कांजिण्यामध्ये उपयुक्त असते.
डिहायड्रेशन होऊ नये यासाठी पुरेसे द्रव पदार्थ पिणेही आवश्यक असते. यासाठी पाणी, शहाळ्याचे पाणी, इलेक्ट्रोलाइट पावडरचे पाणी जरूर प्यावे.
कांजण्या झाल्यावर काय खाऊ नये ..?
कांजिण्यामध्ये केवळ अंगावरचं नव्हे तर तोंडाच्या आतसुद्धा फोड येऊ शकतात. अशावेळी जास्त तिखट, खारट, मसालेदार पदार्थ, लसूण खाण्यामुळे तोंडात जास्त त्रास होऊ शकतो. यासाठी तोंडात फोड आलेले असल्यास काही दिवस असे झणझणीत पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
याशिवाय द्राक्षे, अननस, टोमॅटो, लिंबूवर्गीय फळे, लोणची, लसूण, जास्त खारट पदार्थ, कॉफी हे पदार्थ कांजण्या झाल्यावर खाऊ नयेत.
कांजण्या होऊ नये यासाठी घ्यायची काळजी –
- लहान बालकांना आवश्यक त्या लसी वेळेवर द्याव्यात.
- कांजिण्या झालेल्या रुग्णाच्या संपर्कात जाणे टाळावे.
- कांजिण्या असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्यास आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
- दूषित हातांचा स्पर्श आपले तोंड, डोळे यांना होणार नाही याची काळजी घ्यावी.
- जन्मल्यापासून वयाच्या पंधरा वर्षापर्यंत कधीही कांजिण्या न झालेल्या व्यक्तींनी पुढे कांजिण्या आजार होऊ नये यासाठी कांजण्याची लस घ्यावी. मोठेपणी होणारा कांजिण्या आजार हा जास्त त्रासदायक असतो.
कांजिण्या आजार झाल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये या आजाराची रोगक्षमता निर्माण होते. त्यामुळे अशा व्यक्तींना पुढे सहसा कांजिण्या आजार होत नाही. मात्र त्यांना नागीण (shingles) हा आजार तसेच ramsey syndrome होण्याची संभावना अधिक वाढते.
ज्यांना कांजण्या झालेला असतो त्यांच्या शरीरात मज्जारज्जूमध्ये कांजण्याचा विषाणू लपून बसलेले असतात. आणि जेंव्हा केंव्हा त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते तेव्हा हे लपलेले विषाणू पुन्हा जागृत होतात आणि मज्जारज्जूतून एखाद्या नसेमार्फत पसरून त्वचेवर प्रचंड वेदना असणारे पुरळ निर्माण करतात. या त्रासाला नागीण आजार असे म्हणतात. येथे क्लिक करा व नागीण रोगाबद्दल अधिक माहिती वाचा..
हे सुद्धा वाचा..
5 SourcesIn this article information about Chickenpox symptoms, causes, prevention & treatments in Marathi language. This article is written by Dr Satish Upalkar.