मलेरिया (Malaria) –
मलेरिया हा एक प्राणघातक असा संसर्गजन्य रोग आहे. मलेरिया आजार हा एनोफिलिस जातीचा बाधित डास (Anopheles mosquito) चावल्यामुळे होत असतो. या बाधित डासात असणाऱ्या ‘प्लाजमोडियम परजिवी’मुळे मलेरिया होत असतो. मलेरिया रोग हा ‘हिवताप’ या नावांनेसद्धा ओळखला जातो.
मलेरिया कशामुळे होतो..?
मलेरिया हा रोग ‘प्लाजमोडियम परजिवी’ मुळे होतो. हे परजीवी एनोफिलिस जातीच्या डासांच्या चाव्यातून स्वस्थ व्यक्तीच्या रक्तात मिसळतात. त्यामुळे मलेरियाची लागण होत असते.
मलेरिया हा आजार कसा होतो..?
एनोफिलिस जातीचा बाधित डास चावल्यामुळे ‘प्लाजमोडियम परजिवी’ हे त्या व्यक्तीच्या रक्तात प्रवेश करतात. त्यानंतर ते परजीवी रक्त प्रवाहातून, यकृतात प्रवेश करतात व तेथे परजीवी आपली संख्या वाढवतात. त्यानंतर ते परजीवी त्या व्यक्तीच्या रक्तातील लाल रक्तपेशींला (RBC) बाधित करतात. अशाप्रकारे मलेरिया आजार होतो.
मलेरियाचे प्रकार (Types) :
प्लाज्मोडियम परजीवीच्या 4 प्रमुख जाती आहेत. यानुसार मलेरियाचे प्रकार होतात.
1) प्लाज्मोडियम वायवॅक्स
2) प्लाज्मोडियम ओवेल
3) प्लाज्मोडियम फैल्सिपैरम
4) प्लाज्मोडियम मलेरी
प्लाज्मोडियम वायवॅक्स आणि ओवेल हे परजीवी 48 ते 72 तासापर्यंत RBC मध्ये राहतात. त्यामुळे ह्यामध्ये दर तीन दिवसांनी ताप येत असतो. प्लाज्मोडियम फैल्सिपैरम हा प्रकार जास्त धोकादायक असून यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण अधिक आहे.
मलेरियाची कारणे (Malaria Causes) :
प्लाजमोडियम परजीवीने बाधित असणारा एनोफिलिस मादी डास चावल्यामुळे मलेरिया होत असतो. मलेरियास कारक असणारे प्लाजमोडियम परजीवी हे एनोफिलिस नावाच्या मादा डासांच्या लाळ ग्रंथीत राहतात. मलेरिया पसरविणारे डास साठलेल्या पाण्याच्या ठिकाणी, अस्वच्छ ठिकाणी अधिक वेगाने वाढतात.
याशिवाय काहीवेळा मलेरियाचा प्रसार हा बाधित रक्त संक्रमन व अवयवदान (organ transplant) यातून होऊ शकतो. म्हणजे जर, मलेरिया आजार असलेल्या संक्रमित व्यक्तिपासून रक्तदानाद्वारे किंवा दुषित सिरिंज किंवा अवयवदानामार्फत ते परजीवी दुसऱ्या व्यक्तीमंध्ये जातात व त्यालाही मलेरिया होऊ शकतो. तसेच मलेरिया बाधित असणाऱ्या प्रेग्नंट स्त्रीद्वारे होणाऱ्या बाळालाही मलेरियची लागण होऊ शकते.
मलेरियाची लक्षणे (Symptoms of Malaria) :
इन्फेक्शन झाल्यानंतर मलेरियाची लक्षणे दिसण्यासाठी 10 दिवस ते चार आठवडे इतका काळ लागू शकतो.
- थंडी वाजून ताप येणे,
- थांबून-थांबून अधिक ताप येणे,
- डोकेदुखी,
- मळमळ व उलट्या होणे,
- पोटदुखी, जुलाब व अतिसार होणे,
- अंग दुखणे,
- सांध्यांमध्ये वेदना होणे,
- नाडीची गती जलद होणे,
यासारखी लक्षणे मलेरियामध्ये असतात.
मलेरियाचे निदान :
पेशंटमध्ये असणारी लक्षणे आणि रुग्णाची शारिरीक तपासणी करून यकृत आणि प्लीहाचा आकार वाढला आहे का ते तपासले जाते. याशिवाय ब्लड टेस्ट करून मलेरियाचे निदान केले जाते.
मलेरियाचे दुष्परिणाम (Complications) :
मलेरियावर वेळेत उपचार करणे आवश्यक असते. कारण यामुळे मेंदूच्या रक्तवाहिन्यांना सूज येऊन सेरेब्रल मलेरिया ही गंभीर स्थिती होऊ शकते. मलेरियामुळे ऍनिमिया, ब्लड शुगर कमी होणे, pulmonary edema असे उपद्रवसुद्धा होत असतात.
याशिवाय किडन्या, लिव्हर, प्लिहा (spleen) हे अवयव निकामी होण्याचा धोकाही वाढू शकतो. त्यामुळे मलेरियावर वेळीच योग्य उपचार न झाल्यास मृत्युही येऊ शकतो. लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि वृद्ध व्यक्तींमध्ये मलेरियाचा धोका अधिक असतो.
मलेरिया उपचार (Treatment of Malaria) :
मलेरियावर हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेणे आवश्यक असते. मलेरिया कोणत्या प्रकाराचा आहे त्यानुसार उपचार केले जातात. भारतामध्ये प्रामुख्याने वायवॅक्स मलेरीया हा प्रकार अधिक आढळतो. वायवॅक्स मलेरीया असल्यास क्लोरोक्वीनच्या गोळ्यांचा डोस तीन दिवस डॉक्टर देतील व त्यानंतर लिवरमधून प्लाज्मोडियम परजीवी नाहीसे करण्याकरीता प्रायमाक्यवीन गोळीचा कोर्स 14 दिवस दिला जाईल. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर नियमितपणे घेणे आवश्यक असते.
फाल्सीपेरम मलेरीयाही काही प्रमाणात भारतात आढळतो. फाल्सीपेरम मलेरीया असल्यास रुग्णांना क्लोरोक्वीनची गोळी देऊ नये. यामध्ये ACT (Arctsunate combination therapy) च्या गोळीचा कोर्स 3 दिवस घेणे आवश्यक आहे, कारण फालसीपेरम मलेरीया हा मेंदूपर्यंत जाऊन प्राणघातक ठरू शकतो. म्हणून हिवतापाची लागण झालेल्या रुग्णाने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूर्ण औषधोपचार करून घ्यावा.
मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजना – (Malaria prevention) :
मलेरियापासून बचाव करण्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही. त्यामुळे मलेरिया होऊच नये म्हणून योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी मलेरियापासून बचाव करण्यासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय खाली दिलेले आहेत.
- डासांपासून बचाव करावा.
- डासनाशक साधनांचा वापर करावा.
- झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.
- घरात डास येऊ नयेत यासाठी खिडक्यांना जाळ्या लावा.
- मलेरियाचे डास हे संध्याकाळी चावत असतात. याकाळात डासनाशक साधने वापरावीत.
- घराचा परिसर स्वच्छ ठेवावा.
- घराच्या आजूबाजूला पाणी साठू देऊ नका. जेणेकरून डासांची पैदास थांबण्यास मदत होईल.
- परिसरात मलेरियाची साथ आलेली असल्यास अधिक काळजी घ्यावी.
- थांबून थांबून ताप येत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि रक्त परिक्षण करुन घ्यावे.
- ताप आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच्या मर्जीने कोणतेही औषध घेऊ नये.
हे लेख सुद्धा वाचा..
Read Marathi language article about Malaria disease. Last Medically Reviewed on February 14, 2024 By Dr. Satish Upalkar.