हाता पायाला मुंग्या येणे – Tingling in Hands and Feet :

बराच वेळ पाय दुमडून बसल्याने, एकाच स्थितीत अधिक वेळ राहिल्याने हाता-पायाच्या शिरेवर दाब आल्यामुळे त्याठिकाणी मुंग्या येत असतात. हातापायाला मुंग्या येणे ही एक सामान्य बाब असली तरीही वारंवार जर मुंग्या येत असल्यास त्यावर योग्य उपचार करणे गरजेचे असते. यासाठी येथे हाता पायाला मुंग्या येतात त्याची कारणे व त्यावरील उपाय याविषयी माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी सांगितली आहे.

हाता पायाला मुंग्या येण्याची कारणे :

प्रामुख्याने एकाच स्थितीमध्ये अधिक वेळ बसून राहिल्यामुळे हा त्रास होत असतो. याशिवाय वारंवार हातापायांना मुंग्या येण्यास खालील कारणेही जबाबदार असतात.

 • अनियंत्रित मधुमेहामुळे नसांवर विपरीत परिणाम झाल्यामुळे वारंवार हाता-पायाला मुंग्या येऊ शकतात. डायबेटीस पेशंटमध्ये हाता-पायाला मुंग्या येण्याचे प्रमाण जास्त आहे.
 • हायपर-थायरॉईझम हा थायरॉईडचा त्रास असल्यामुळे.
 • शरीरातील व्हिटॅमिन-B12 च्या कमतरतेमुळे.
 • कॉम्प्युटरवर सतत टायपिंग केल्याने मनगटाच्या नसा आकुंचित झाल्याने हाताला मुंग्या येतात. या त्रासाला Carpal tunnel syndrome असेही म्हणतात.
 • सर्व्हायकल स्पॉन्डिलायटीसमुळे मानेची नस आखडली गेल्यास पाठीपासून पायापर्यंत व मानेपासून हातापर्यंतच्या भागात मुंग्या येत असतात.
 • प्रेग्नन्सीमध्येही काही स्त्रियांना वारंवार हातापायांना मुंग्या येण्याचा त्रास होऊ शकतो.
 • काही औषधांच्या परिणामामुळे, किमोथेरपी ओषधांमुळेही हा त्रास होऊ शकतो.
 • Autoimmune आजार जसे आमवात (Rheumatoid arthritis), मल्टिपल स्क्लेरोसिस (MS), Lupus किंवा Celiac diseas यांमुळेही हातापायात वारंवार मुंग्या येऊ शकतात.
 • काही आजारांच्या इन्फेक्शनमुळेही हा त्रास होऊ शकतो. यामध्ये हिपॅटायटीस-B आणि C, नागीण आजार (Shingles), कुष्ठरोग (Leprosy), HIV किंवा AIDS यांच्या संसर्गामुळेही वारंवार हातापायाला मुंग्या येऊ शकतात.
 • तसेच सिगारेट आणि दारूच्या व्यसनामुळेही आपल्या नसांवर विपरीत परिणाम होऊन हाता पायाला मुंग्या येतात.

हातापायांना मुंग्या येऊ नयेत म्हणून अशी घ्यावी काळजी :

सवयी बदला..
बराच वेळ एकाच ठिकाणी बसून राहू नका. पाय दुमडून अधिक वेळ बसणे किंवा एकाच बाजूवर जास्त वेळ झोपणे टाळावे. नियमित व्यायाम करावा. दररोज किमान अर्धा तास तरी व्यायाम करावा.

योग्य आहार घ्या..
आहारात व्हिटॅमिन-B आणि प्रोटीन असणारे पदार्थ समावेश करावेत. दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, मासे, सोया मिल्क यामध्ये व्हिटॅमिन-B12 मुबलक असते. तसेच आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, मोड आलेली कडधान्ये आणि विविध फळे यांचा समावेशही असावा.

व्यसनांपासून दूर राहा..
सिगारेट, तंबाखू, दारूचे व्यसन यांमुळे संपूर्ण शरीराचे नुकसान होऊन आरोग्य धोक्यात येत असते. व्यसनांमुळे रक्तप्रवाह योग्यरीत्या होण्यास बाधा निर्माण होते. यासाठी या व्यसनांपासून दूर राहावे.

मधुमेह असल्यास जास्त काळजी घ्या..
अनियंत्रित डायबेटीसमुळे नसांवर विपरीत परिणाम होऊन डायबेटिक न्यूरोपॅथी ही गंभीर स्थिती होऊ शकते. यासाठी आपल्या डॉक्टरांनी दिलेली औषधे, नियमित तपासणी, योग्य आहार, आणि योग्य व्यायाम यांचा कटाक्षाने अवलंब करून साखर नियंत्रित ठेवावी. मधुमेहसंबंधित सर्व माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

डॉक्टरांचा सल्ला घ्या..
वारंवार मुंग्या येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. हातापायात मुंग्या येण्याचा त्रास अधिक प्रमाणात होत असल्यास न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरांकडून होणाऱ्या त्रासाचे निदान व उपचार करून घ्या. उपचारामध्ये आपले डॉक्टर Neuropathic painkillers आणि व्हिटॅमिन सप्लिमेंट्स यांचा समावेश करू शकतात.

हाता पायाला मुंग्या येणे यावरील घरगुती उपाय :

जर जास्त वेळ एकाच ठिकाणी बसल्यामुळे पायाला मुंग्या आल्यास किंवा जास्त वेळ कॉम्प्युटरवर टायपिंग करीत राहिल्याने हाताला मुंग्या आल्यास खालील उपाय करू शकता.

 • मुंग्या आलेल्या ठिकाणी थोडे खोबरेल तेल लावून हलका मसाज करावा. यामुळे मुंग्या आलेल्या ठिकाणी रक्तप्रवाह वाढून हा त्रास कमी होतो.
 • याशिवाय गरम पाण्याचा शेक दिल्यामुळेही त्याठिकाणी रक्तप्रवाह वाढून हातापायांना आलेल्या मुंग्या दूर होतात.
 • कपभर पाण्यात एक चमचा दालचिनी पावडर घालून ते मिश्रण प्यावे. दालचिनीमध्ये मँगनीज व पोटॅशियम हे पोषकतत्वे भरपूर असतात. त्यामुळेही रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.

वारंवार हातापायात मुंग्या येत असल्यास घरगुती उपाय करत न बसता आपल्या डॉक्टरांकडून होणाऱ्या त्रासाचे निदान व उपचार करून घ्यावेत.

© लेखक - डॉ. सतीश उपळकर
(महत्वाची सूचना - ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये.)

हे सुद्धा वाचा..
डोक्यात मुंग्या येण्याची कारणे व त्यावरील उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Tingling in hands and feet – causes, symptoms and treatments in Marathi information. Article written by Dr. Satish Upalkar.