कुष्ठरोग (Leprosy information in Marathi)

3170
views

महाभयंकर अशा कुष्ठरोग ह्या रोगास ‘महारोग’ असेही ओळखले जाते. मात्र तरीही लवकर निदान व योग्य उपाययोजना करून कुष्ठरोग बरा करणे आत्ता शक्य आहे.

कुष्ठरोग कारणे :
कुष्ठरोग हा ‘मायक्रोबॅक्टेरियम लेप्रे’ ह्या जिवाणूमुळे (Bacteria) मुळे होतो. कुष्ठरोगाच्या जंतूचे एक महत्त्वाचे वेगळेपण असे आहे की, हा अत्यंत मंदगतीने वाढणारा जंतू आहे. कुष्ठरोगाचा जिवाणू दर 12 ते 14 दिवसांनी विभाजित होतो. यामुळे जिवाणू शरीरात शिरून रोगाची लक्षणे दिसेपर्यंत 2 ते 10 वर्षे निघून जातात. मंदगतीने वाढ होणाऱ्या जिवाणूमुळे रोगाची लक्षणे व शरीरातील प्रसार हाही अत्यंत मंदगतीने होतो.

कुष्ठरोगाचा जिवाणू कसा शरीरात प्रवेश करतो..?
कुष्ठरोगाचा जिवाणू हा त्वचा, नाकातील श्लेष्मपटल यांच्याबरोबरच चेतातंतूंमध्ये शिरतो व तेथे हळूहळू वाढत राहतो. अशा प्रकारे चेतातंतूंमध्ये (Nervous System) वाढणारा हा एकमेव जिवाणू आहे. याच कारणाने चेतातंतू हळूहळू नष्ट होऊन चट्टय़ांवर व हातापायामधील संवेदना कमी होऊन बधिरपणा येतो. बधिर भागावर भाजणे किंवा काही जखम झाली तर रुग्णाला काहीच संवेदना नसल्याने जखमा होतात, त्या दुर्लक्षित राहतात व अनेक वर्षे उपचार न केलेल्या रुग्णांमध्ये हातापायाची बोटे झडतात.


कुष्ठरोगाची लक्षणे :

विविध रुग्णांमध्ये त्यांच्या रोगप्रतिकारशक्तिनुसार लक्षणे वेगवेगळी आढळतात. चांगली रोगप्रतिकारशक्ती असलेल्या रुग्णामध्ये रोग नियंत्रित राहिल्यामुळे एक किंवा दोन चट्टय़ांपर्यंतच रोगाची मजल जाते. या प्रकारच्या आजारास टय़ुबरक्युलॉइड आजार म्हणतात.
याउलट ज्या रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती नगण्य असेल त्याची चेहरा, हातपाय, छाती, पाठ अशा सर्व ठिकाणची त्वचा जंतूंची बेसुमार वाढ झाल्याने लालसर, सुजलेली व चकचकीत दिसू लागते. या प्रकारास लेप्रोमॅटस् लेप्रसी म्हणतात.कुष्ठरोगाचे चट्टे पांढरट किंवा लालसर असू शकतात.

काही रुग्णांमध्ये त्वचेवर चट्टे न येता केवळ चेतातंतू नष्ट होतात व अशा रुग्णांमध्ये हातापायास बधिरता येणे अथवा बोटे वाकडी होणे अथवा डोळा बंद न करता येणे अशी लक्षणे दिसतात. टय़ुबरक्युलॉइड रोगाचे निदान चट्टय़ावरील बधिरपणामुळे करता येते.

निदान कसे करतात..?
एखाद्या रुग्णामध्ये त्वचेवर चट्टा, बधिरपणाबद्दल शंका असल्यास त्वचेच्या तुकडय़ाची तपासणी (Biopsy) करून निदान करावे लागते.
लवकर निदान झाल्यास तत्पर उपाययोजना करून विकृती टाळता येतात. निदान होण्यास उशीर झाला तर रोग पसरून बधिरपणा व विकृती येऊ शकतात. त्यामुळे त्वचेवर न खाजणारा व बधिर चट्टा आल्यास किंवा हातापायास मुंग्या, बधिरपणा आल्यास किंवा त्वचा लालसर चमकदार दिसू लागल्यास ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करणे आवश्यक आहे.


कुष्ठरोगाचे उपचार :

बहुविध उपचार पद्धतीद्वारे यावर आत्ता उपचार केले जातात. त्यानुसार सध्या पाचपेक्षा कमी चट्टे असणाऱ्या पॉसिबॅसिलरी रुग्णांना डॅपसोम गोळी रोज व रिफँपिसिन गोळी महिन्यातून एक वेळा या पद्धतीने सहा महिने उपचार दिले जातात.
तर पाचपेक्षा जास्त चट्टे असलेल्या रुग्णांना तीन औषधे असलेली उपचार पद्धत वापरली जाते व कमीत कमी एक वर्ष उपाययोजना केली जाते. अशा रुग्णांना त्यांच्यामध्ये जंतूंची संख्या जास्त असल्याने मल्टिबॅसिलरी रुग्ण म्हणतात व डॅपसोन व क्लोफॅझिमिन गोळ्या रोज तसेच महिन्यातून एक वेळा रिफँपिसिन व क्लोफॅझिमिन गोळ्या दिल्या जातात.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.