डोक्यात मुंग्या येणे – Tingling Head in Marathi :

ज्याप्रमाणे हातापयात मुंग्या येत असतात त्याचप्रमाणे काहीवेळा डोक्यातही मुंग्या येऊन डोके सुन्न व बधिर होत असते. डोक्यात अनेक कारणांनी मुंग्या येऊ शकतात. प्रामुख्याने नसा (nerves) आणि शिरांवर जास्त दबाव पडल्याने ही स्थिती होत असते.

डोक्यात मुंग्या आल्यास जाणवणारी लक्षणे :

डोक्यात मुंग्या आल्यास त्याठिकाणी सुन्न होणे, डोके बधिर होणे, सुया टोचल्याप्रमाणे जाणवणे, डोके दुखणे अशी लक्षणे जाणवू शकतात.

डोक्यात मुंग्या येण्याची कारणे – Causes of head tingling :

प्रामुख्याने नसांना रक्तपुरवठा अपुरा झाल्याने, नसा (nerves) आणि शिरांवर जास्त दबाव पडल्याने ही स्थिती होत असते. याशिवाय खालील कारणेही डोक्यात मुंग्या येण्यासाठी जबाबदार ठरतात.
• डोक्याला दुखापत होणे,
डायबेटीस, हाय ब्लडप्रेशर, मल्टीपल स्क्लेरोसिस (MS), ब्रेन ट्युमर, स्ट्रोक यामुळे,
मायग्रेन डोकेदुखी, सायनसचा त्रास किंवा सर्दीमुळे,
• अँटीकॉन्व्हल्संट्स किंवा केमोथेरपी औषधे घेण्यामुळे,
• व्हिटॅमिन-B12 ची कमतरता अशा अनेक कारणांनी डोक्यात मुंग्या येऊ शकतात.

नेमके कोणत्या कारणांमुळे डोक्यात मुंग्या येत आहेत याचे निदान करण्यासाठी आपले डॉक्टर MRI स्कॅन, CT स्कॅन, मज्जातंतू बायोप्सी, Electromyography (EMG) यासारख्या न्यूरोलॉजिकल तपासण्या करतील.

डोक्यात मुंग्या येणे यावरील उपचार :

सामान्य कारणांमुळे डोक्यात मुंग्या येत असल्यास डॉक्टर पुढीलप्रमाणे उपचार करतात. मायग्रेन डोकेदुखी, सायनसचा त्रास, सर्दी यासारख्या कारणांनी डोक्यात मुंग्या येत असल्यास वरील त्रास कमी करण्यासाठी औषधे दिली जातात.

डायबेटीस, उच्च रक्तदाब, मल्टीपल स्क्लेरोसिस यासारख्या स्थितीमुळे डोक्यात मुंग्या येत असल्यास आहार, व्यायाम आणि औषधे याद्वारे उपचार योजले जातात. याशिवाय एक्यूपंक्चर, फिजिओथेरपी, मसाज थेरपी याद्वारे डोक्यात मुंग्या येणे यावर उपचार केले जातात.

डोक्यात मुंग्या येणे यावर हे करा घरगुती उपाय :

• पुरेशी झोप घ्यावी.
• एका बाजूवर जास्तवेळ झोपल्याने डोक्यात मुंग्या येत असल्यास कुशी बदलून झोपावे.
• मानसिक तणावापासून दूर राहावे.
• नियमित व्यायाम करावा. व्यायामाने शरीरात रक्तप्रवाह योग्यरीत्या होण्यास मदत होते.
• सकाळी व संध्याकाळी चालण्यास जावे.
• फिजिओथेरपी, मसाज याचा अवलंब करावा.
• आहारात व्हिटॅमिन-B12 असणारे पदार्थ म्हणजे दूध, दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे यांचा आहारात समावेश करावा.

डोक्यात मुंग्या येत असल्यास हॉस्पिटलमध्ये केंव्हा जाणे आवश्यक असते..?

• डोक्याला मार लागून डोक्यात मुंग्या येत असल्यास,
• डोक्यातील मुंग्या बरोबरचं हात किंवा पाय बधिर झाल्यास,
• शरीराच्या एका बाजूला सुन्न किंवा लुळेपणा जाणवत असल्यास,
• हातापयातील ताकद कमी झाल्यासारखी वाटत असल्यास,
• डोके अतिशय दुखत असल्यास,
• डोळ्यांनी अस्पष्ट दिसत असल्यास,
• बोलताना, चालताना त्रास होत असल्यास,
• श्वास घेताना त्रास होत असल्यास,
• लघवी किंवा शौचावर नियंत्रण राहत नसल्यास तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल होणे आवश्यक आहे. कारण वरील काही लक्षणे ही पक्षाघात (ब्रेन स्ट्रोक) संबंधित असण्याची शक्यता असते.

© लेखक - डॉ. सतीश उपळकर
(महत्वाची सूचना - ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये.)

हे सुद्धा वाचा..
पक्षाघाताची कारणे, लक्षणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.