पावसाळा आणि आहार – Rainy season diet plan :

पावसाळ्याच्या दिवसात योग्य आहार घेणे खूप आवश्यक असते. कारण या दिवसात आपली पचनक्रिया मंद झालेली असते तसेच पावसाळ्यात दूषित अन्न व पाण्यामुळे जुलाब, अतिसार, कॉलरा, काविळ असे अनेक आजारही होत असतात. यासाठी पावसाळ्यात योग्य आहाराचे नियोजन ठेवणे गरजेचे असते.

पावसाळ्यात आहार कसा असावा..?

पावसाळ्यामध्ये पचनक्रिया मंद झाल्याने अन्नाचे पचन योग्यप्रकारे होत नाही. यासाठी पावसाळ्यात पचनास हलका आणि ताजा, गरम आहार घ्यावा. आहारात लाह्या, मुगाचे वरण, तूप घालून वरणभात, फळभाज्या, भाज्यांचे गरम सूप यांचा समावेश करावा.

पावसाळ्यात भूक वाढविणारा आणि अन्नाचे पचन करणारा आहार घ्यावा. यासाठी मिरे, हिंग, सुंठी, आले, लसून, जिरे, पिंपळी या दीपन-पाचन करणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. पावसाळ्यात आहारसंबंधीत घ्यावयाची काळजी, पावसाळ्यात आहार कसा असावा, पावसाळ्यात काय खावे, काय टाळावे याची मराठीत माहिती खाली दिली आहे.

धान्ये व कडधान्ये –
पावसाळ्यात धान्याच्या लाह्या खाव्यात. लाह्या पचनास हलक्या असतात. त्यामुळेच पावसाळ्यात येणाऱ्या नागपंचमीच्या सणाला लाह्या खाल्या जातात. पचनास हलकी असणारी मूग डाळ पावसाळ्यामध्ये आहारात घ्यावी. मूग डाळीचे वरण हे भातामध्ये तूप घालून खावे.

पालेभाज्या –
पावसाळ्यामध्ये पालेभाज्या कमी खाव्यात. या दिवसात पालेभाज्यापेक्षा फळभाज्या जास्त खाव्यात. स्वच्छ करुनच भाज्यांचा आहारात उपयोग करावा. भेंडी, कारले, पडवळ, दुधी भोपळा या फळभाज्यांचा आहारात समावेश करावा. विविध भाज्यांचे गरम सूप प्यावेत.

पावसाळ्यातील फळे –
पावसाळ्यात फळे स्वच्छ करुनच खावीत. जास्त पिकलेली फळे खाऊ नयेत. पावसाळ्यात आंबा, फणस, केळी खाणे टाळावे. कारण यांमुळे अपचन होऊन जुलाब, अतिसार होण्याची अधिक शक्यता असते.

मांसाहार –
मांसाहारी पदार्थ हे पचनास जड असतात. पावसाळ्याच्या दिवसात आपली पचनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे पावसाळ्यात मांसाहारी पदार्थ म्हणजे मटण, मासे खाणे शक्यतो टाळावेत. याशिवाय पावसाळा हा मासे आणि इतर जलचरांचा प्रजननाचा काळ असतो. त्यामुळेचं श्रावण महिन्यात मांसाहार वर्ज्य केला जातो.

पाणी –
पावसाळ्यामध्ये पाणी दुषित झालेले असते. अशावेळी पाणी गाळून, उकळवून, स्वच्छ करुनच प्यावे किंवा आहारामध्ये वापरावे. अस्वच्छ पाणी पिण्यामुळे पावसाळ्यात जुलाब, अतिसार, उलट्या, गॅस्ट्रो, काविळ, टायपॉईड असे अनेक आजार होत असतात. यासाठी पाणी उकळूनच प्यावे.

पावसाळ्यात काय खाऊ नये..?

  • पचायला जड असणारे पदार्थ खाणे टाळावे.
  • पावसाळ्यात प्रमाणापेक्षा जास्त आहार घेणे टाळावे.
  • थंडगार पदार्थ, दही, लोणची, ब्रेड, जास्त खारट पदार्थ, फास्टफूड खाणे टाळावे.
  • बाहेरचे उघड्यावरील भेळ, पाणीपुरी यासारखे पदार्थ, माशा बसलेले दूषित अन्न, शिळे पदार्थ, अर्धवट शिजलेले अन्न पावसाळ्यात खाणे टाळावे.
  • मांसाहारी पदार्थ पचनास जड असल्याने पावसाळ्यात नॉनव्हेज पदार्थ खाणे टाळावे.
  • तळलेले पदार्थ पचण्यास जड व पित्त वाढवत असल्याने तळलेले पदार्थ जास्त खाणे टाळावे.

पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...