पावसाळा आणि आरोग्य – Monsoon care :
पावसाळ्यात ओलसर हवामानामुळे तसेच पावसाच्या पाण्यामध्ये घाण आणि सांडपाणी मिसळून पाणी दूषित झाल्यामुळे, डासांचा प्रादुर्भाव जास्त झाल्याने अनेक साथीचे आजार होत असतात. त्यामुळेच पावसाळ्यात अनेक हॉस्पिटल्स हे हाऊसफुल्ल झालेली असतात. यासाठी पावसाळ्यात ही निरोगी राहण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती खाली दिली आहे.
दूषित पाणी पिऊ नये..
पावसाच्या पाण्यात जमिनीवरील कचरा, घाण, सांडपाणी मिसळून ते प्रदूषित पाणी नदीमध्ये जात असते. त्यामुळे असे दूषित पाणी पिण्यामुळे उलट्या, जुलाब, अतिसार, कॉलरा, हगवण, टायफॉइड आणि कावीळ यासारखे अनेक साथीचे आजार होत असतात. यासाठी पावसाळ्यात गरम करून थंड केलेले स्वच्छ पाणी प्यावे. पाणी गरम करून वापरल्यामुळे पाण्यातील बॅक्टेरिया नष्ट होतात व वरील आजार होण्यापासून दूर राहता येते.
उघड्यावरील दूषित अन्न खाणे टाळावे..
पावसाळ्यात बाहेरील उघड्यावरील पदार्थ, माशा बसलेले दूषित पदार्थ, शिळे अन्न, अर्धवट शिजलेले मांसाहारी पदार्थ खाणे टाळावे. कारण असे दूषित अन्न खाल्यामुळे पोटाचे विविध आजार, उलट्या, जुलाब, अतिसार, कॉलरा, हगवण, कावीळ यासारखे अनेक आजार होत असतात. त्यामुळे पावसाळ्यात बाहेरील उघड्यावरील दूषित अन्न खाणे टाळावे.
योग्य आहार घ्यावा..
पावसाळ्यामध्ये पचनशक्ती कमी झालेली असते त्यामुळे या दिवसात पचनास हलका असणारा आहार घ्यावा. पावसाळ्यात नेहमी ताजा आणि गरम आहार घ्यावा. आहारात लाह्या, मुगाचे वरण, तूप घालून वरणभात, भेंडी-कारले-पडवळ-वांगी यासारख्या फळभाज्या, भाज्यांचे गरम सूप यांचा समावेश करावा. मात्र पावसाळ्यात थंड पदार्थ, तेलकट पदार्थ, जास्त पिकलेली फळे, दही, ब्रेड खाणे टाळावे.
डासांपासून बचाव करावा..
पावसाच्या दिवसात डासांचा उपद्रव भरपूर होतो. घराच्या आजूबाजूला तुंबलेल्या डबक्यात, गटारी, नाले यांमध्ये डासांचीही उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे पावसाळ्यात डासांमुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया हे आजारही मोठ्या प्रमाणात होत असतात. यासाठी पावसाळ्यात डासांपासून बचाव करणे खूप गरजेचे असते.
डासांपासून बचाव करण्यासाठी घर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. घरामध्ये डास प्रतिबंधक जाळ्या, मच्छरदाणी, औषधे, क्रीम यांचा वापर करावा. घरामध्येही फुलदाणी, फिशटॅंक यांची वेळोवेळी स्वच्छता ठेवावी. कारण अशा साठवलेल्या स्वच्छ पाण्यातच डेंग्यूच्या डासांची पैदास होत असते.
पावसात भिजू नये..
पावसाळा सुरू झाल्यावर हवामानात सतत बदल होतात. पावसामुळे हवेत ओलावा आलेला असतो. सूर्य ढगांआड असतो. पुरेसे ऊन नसल्याने हवेतील बॅक्टेरिया आणि जंतूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे आपली प्रतिकार यंत्रणा कमकुवत होते. त्यामुळेच पावसाळ्यात सहजासहजी सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार होत असतात. यासाठी पावसाच्या पाण्यात भिजणे टाळावे.
पावसात भिजल्यास गरम पाण्याने हात-पाय धुवून व वाळलेल्या टॉवेलने स्वच्छ पुसून घ्यावे. पावसाच्या पाण्यात केस भिजल्यास तत्काळ टॉवेलने केस सुखवावे. कारण भिजलेल्या केसात फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. तसेच पावसाळ्यात ओलसर कपडे घालणे टाळावे आणि पावसात भिजलेले कपडेही लवकर बदलावेतत.
वैयक्तिक स्वच्छता राखावी..
पावसाळ्यात ओलसर हवामानात आपल्या त्वचेची योग्य स्वच्छता न ठेवल्यास त्याठिकाणी फंगल इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. यामुळे विविध चर्मरोग, खरूज, गजकर्ण हे आजार होत असतात. पावसाच्या घाण पाण्यामुळे पायाची स्वच्छता न ठेवल्यास पायाला चिखल्या होणे हा आजारही होत असतो.
पावसाच्या घाण पाण्यातुनच लेप्टोस्पायरोसिसचा संसर्गही होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी पावसाळ्याच्या दिवसात साबणाचा वापर करून गरम पाण्याने स्वच्छ अंघोळ करावी. तसेच सर्दी खोकला झाल्यास खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाकावर रुमाल धरावा.
आजार अंगावर काढू नये..
पावसाच्या बदलत्या हवामानामुळे, ओलसर हवामानामुळे, दूषित पाणी पिण्यामुळे किंवा पावसात भिजल्यामुळे अनेक साथीचे आजार होत असतात. हे सामान्य वाटणारे आजार डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू, टायफॉईड किंवा हिपॅटायटीस ही असू शकतात. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप, उलट्या किंवा जुलाब यासारखी आजाराची लक्षणे दिसल्यास आजार अंगावर न काढता आपल्या डॉक्टरांकडून वेळीच उपचार करून घ्यावेत.