छातीत दुखणे – Chest Pain :
आजकाल वाढलेले हार्ट अटॅकचे प्रमाण पाहता छातीत दुखू लागल्यास सगळ्यांनाच भीती वाटते. मात्र अनेक कारणांनी छातीत दुखू शकते. यातील काही कारणे ही साधारण तर काही गंभीरही ठरू शकतात. छातीत होणाऱ्या वेदना ह्या हृदय, फुफ्फुस, पचनसंस्था आणि छातीच्या मांसपेशी या संबंधितही असू शकतात. छातीत दुखण्याची कोणकोणती कारणे असू शकतात याची माहिती या लेखात दिली आहे.
छातीत उजव्या बाजूला दुखणे याची कारणे :
खालील कारणांमुळे छातीत उजव्या बाजूला दुखू शकते.
- मांसपेशी अवघडल्यामुळे,
- छातीला मार लागल्यामुळे, बरगड्याना सूज आल्यामुळे,
- ऍसिडिटी (छातीत जळजळ होणे),
- पित्ताशयाला सूज आल्यामुळे (Cholecystitis),
- पित्ताशयात खडे असल्यामुळे,
- स्वादुपिंडाला सूज आल्यामुळे (Pancreatitis),
याशिवाय Pleurisy, न्यूमोनिया, Pneumothorax, Pulmonary embolism, फुफ्फुस कँसर, Pulmonary hypertension ह्या फुफ्फुसाच्या आजारामुळे उजव्या छातीत दुखू शकते.
छातीत डाव्या बाजूला दुखणे याची कारणे :
खालील कारणांमुळे छातीत डाव्या बाजूला दुखू शकते.
- अंजायना,
- हार्ट अटॅक,
- Myocarditis,
- Cardiomyopathy हा हृदयाच्या स्नायूंचा आजार असून यात हृदयाचा आकार वाढतो.
- Pericarditis ह्यात हृदयाभोवतीच्या आवरणावर सूज येते.
- ऍसिडिटी (छातीत जळजळ होणे),
- अन्ननलिकेचे आजार
- Hiatal हर्निया
- छातीला मार लागल्याने किंवा छातीच्या मसल्स अवघडल्यामुळे,
- न्यूमोनिया, फुफ्फुस कँसर, Pulmonary hypertension ह्या फुफ्फुसाच्या आजारामुळेही डाव्या छातीत दुखू शकते.
छातीत दुखणे आणि हार्टसंबंधित कारणे –
हार्ट अटॅक, Pericarditis, Myocarditis (ह्यात हृदयाच्या मांसपेशीना सूज येते), Cardiomyopathy (हृदयाच्या मांसपेशींचा आजार),
आणि Aortic Dissection ह्या हृदयाच्या विविध आजारांत छातीत वेदना होत असतात.
हृदयविकारात छातीत होणाऱ्या वेदनांना अंजायना (Angina) असे म्हणतात. हृदयविकारामध्ये छातीच्या मध्यभागी किंचित डाव्या बाजूस ह्या वेदना सुरू होतात.
छातीत होणाऱ्या वेदना हृदयासंबंधित आहेत का ते कसे समजावे..?
खालील लक्षणे असल्यास छातीत दुखणे हे हार्ट संबंधित असू शकते.
- छातीच्या मध्यभागी वेदना होणे,
- छातीत दडपल्यासारखे वाटणे,
- वेदना ह्या डाव्या बाजूस खांदा, हात, जबडा आणि पाटीकडेही पसरणे,
- हाताला मुंग्या येणे,
- अस्वस्थ व बैचेनी वाटणे,
- दम लागणे, श्वास जोरजोरात घेणे,
- छातीत धडधड होणे,
- चक्कर येणे, मळमळणे,
- डोके हलके वाटणे,
- दरदरून घाम येणे
अशी लक्षणे असल्यास ती ह्रदयासंबंधित असतात. अशावेळी तात्काळ वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे असते.
अशी लक्षणे दिसू लागल्यास काय करावे..?
- धावपळ, हालचाल करू नका.
- आपल्या मदतीस कोणाला तरी बोलावून घ्यावे.
- नायट्रोग्लिसरीन किंवा अॅस्पिरीन किंवा सॉरबिट्रेट ही गोळी जवळ असतील तर ती गोळी घेऊन जिभेखाली ठेवावी. या गोळ्यांमुळे रक्त पातळ होते व रक्तवाहिन्यातील अडथळा दूर होतो. त्यामुळे ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा हृद्याच्या स्नायुंना होतो.
- तातडीने 108 ह्या नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी.
जर पेशंट बेशुद्ध असल्यास रुग्णाला लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळवून द्यावी यासाठी त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावे. हॉस्पिटल जवळ नसल्यास तातडीने 108 ह्या नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी आणि रुग्णावर सीपीआर उपाय करावेत. यामध्ये पेशंटला दुसरी एखादी व्यक्ती आपल्या तोंडाने कृत्रिम श्वासोच्छवास देते व बाहेरून हृदयाला छातीवर दाब दिला जातो. रुग्णवाहिका येइपर्यंत हे उपाय करत राहावेत. त्यामुळे पेशंटला जीवदान मिळू शकते.
छातीत वेदना होणे आणि पचनासंबंधित कारणे –
छातीत होणाऱ्या वेदना ह्या ऍसिडिटी, गॅसेस, छातीत जळजळ होणे, पित्ताशयातील खडे (Gallstones), पित्ताशयाला किंवा स्वादुपिंडाला सूज आल्यामुळे, अन्ननलिका संबंधित आजार ह्यामुळेही होऊ शकतात.
अशावेळी छातीत वेदना होण्याबरोबरच आंबट ढेकर येणे, जेवणानंतर छातीत दुखणे, अन्न गिळाल्यानंतर छातीत दुखणे, गॅसेसमुळे पोट गच्च वाटणे अशी लक्षणे असतात.
छातीत दुखणे आणि फुफ्फुससंबंधित कारणे –
छातीच्या पिंजऱ्यात आपली फुफ्फुसे असतात त्यामुळे काही वेळेस छातीत होणाऱ्या वेदना हया फुफ्फुससंबंधित ही असतात. यामध्ये न्युमोनिया, Viral bronchitis, pneumothorax, Bronchospasm, अस्थमा (दमा), COPD, फुफ्फुसाचा कर्करोग (Lung cancer) ह्या आजार संबंधित लक्षणे असू शकतात.
अशावेळी खोकताना छातीत दुखणे, मोठा श्वास घेताना छातीत दुखणे अशी लक्षणे असू शकतात.
छातीत दुखणे आणि छातीच्या मांसपेशी व बरगड्यासंबंधित कारणे –
कधीकधी छातीत होणाऱ्या वेदना ह्या बरगड्या मोडल्यामुळे, फ्रॅक्चर झाल्यामुळे किंवा त्याठिकाणी मार लागल्यामुळेही होऊ शकतात.
निदान व तपासणी :
छातीत होणाऱ्या वेदना ह्या हृदयासंबंधित आहेत का हे पाहण्यासाठी खालील तपासण्या केल्या जातात.
ECG किंवा EKG तपासणी, छातीचा MRI, छातीचा एक्सरे, Stress test, अँजिओग्राफी, Echocardiogram ह्या तपासण्या कराव्या लागू शकतात.
छातीत दुखणे यावरील उपचार :
हृदयासंबंधित कारणांमुळे छातीत दुखत असल्यास हॉस्पिटलमध्ये रुग्णावर खालील उपचार केले जातात. ब्लॉकेजमुळे किंवा अन्य कारणांनी हृदयाला खंडित झालेला रक्तपुरवठा व्यवस्थित करण्यासाठी रक्त पातळ करणारी औषधे दिली जातात. विविध तपासण्या करून रुग्णाच्या हृदयाची, धमान्यांची स्थिती पाहून Angioplasty किंवा बायपास सर्जरी यांचा अवलंब केला जातो.
ऍसिडिटी, गॅसेस ह्या पचनासंबंधीत कारणांमुळे छातीत दुखत असल्यास Antacids ही औषधे उपयोगी ठरतात याशिवाय घरगुती उपाय म्हणून ओवा खाल्यानेही आराम पडतो किंवा गरम पाण्यात लिंबू पिळून ते पाणी पिल्यानेही आराम पडतो.
छातीत दुखत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका..
छातीत दुखू लागल्यास ऍसिडिटी किंवा गॅसेस मुळे असेल असे समजून दुर्लक्ष करू नका. छातीच्या मध्यभागी व किंचित डावीकडे दुखत असल्यास ते हार्ट संबंधित असू शकते. त्यामुळे अशी लक्षणे दिसून येत असल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्या.
याशिवाय जर तुम्हाला मधुमेह, हाय ब्लडप्रेशर, अतिलठ्ठपणा किंवा सिगारेटचे व्यसन असल्यास विशेष काळजी घेणे आवश्यक असून अशावेळी छातीत दुखत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. तसेच जर थोड्याशा व्यायामाने किंवा थोडे चालल्यावरही धाप लागत असल्यास वेळ न दवडता आपल्या डॉक्टरांकडून तपासणी व उपचार करून घ्यावेत.
हे सुद्धा वाचा..
हार्ट अटॅकची कारणे, लक्षणे व उपचार याविषयी जाणून घ्या.
Read Marathi language article about Chest Pain causes & treatment. Last Medically Reviewed on March 10, 2024 By Dr. Satish Upalkar.