ओठ फुटणे – Cracked lips in Marathi :

अनेकांना वरचेवर ओठ फुटण्याची समस्या होत असते. या त्रासाला क्रॅक ओठ, ओठ फाटणे किंवा ओठ फुटणे या नावानेही ओळखले जाते. विशेषतः थंडीच्या दिवसात हे त्रास जास्त प्रमाणात होतात. काहीवेळा फाटलेल्या ओठांच्या ठिकाणी जखमा व वेदनाही होऊ लागतात. यासाठी येथे क्रॅक ओठांपासून सुटका होण्यासाठी कोणते उपाय करावेत याविषयी माहिती दिली आहे.

ओठ फुटण्याची कारणे – Causes of chapped lips :

आपल्या त्वचेवर जशा तैलग्रंथी असतात तशा त्या ओठांच्या त्वचेवर नसतात. त्यामुळे ओठ कोरडे पडून त्याठिकाणी अनेकदा भेगा पडत असतात. याशिवाय खालील कारणांमुळे क्रॅक ओठांची समस्या होत असते.

  • थंडीचे दिवस,
  • डिहायड्रेशन म्हणजेच शरीरातील पाण्याची कमतरता झाल्याने,
  • विशिष्ट औषधांच्या परिणामामुळे,
  • व्हिटॅमिन-A युक्त पूरक औषधे घेणे,
  • सिगारेट, धूम्रपान यासारखे व्यसन असल्यास ओठ फाटण्याची समस्या होत असते.

ओठ फाटणे यावरील घरगुती उपाय :

पुरेसे तरल पदार्थ प्यावेत..
शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास डिहायड्रेशन होऊन क्रॅक ओठांची समस्या होऊ लागते. यासाठी दिवसभरात पुरेसे पातळ पदार्थ प्यावेत. दररोज 8-10 ग्लास पाणी प्यावे. ओठ फाटणे यावर हा उपाय फायदेशीर आहे. याशिवाय शहाळ्याचे पाणी, सरबत, रसदार फळे, फळांचा ताजा रस यांचा आहारात समावेश करावा.

ओठांना मलम लावावे..
ओठांच्या ठिकाणी मॉश्चराइजरयुक्त मलम किंवा लिप बाम लावावा. थंडीच्या दिवसात सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी ओठांना मलम लावावे. व्हिटॅमिन-E किंवा ग्लिसरीन व नैसर्गिक घटक असणारे मलम क्रॅक पडलेल्या ओठांवर उपयुक्त असतात. अशावेळी मात्र कपूर किंवा पेट्रोलियम जेलीयुक्त मलम वापरू नये. तसेच लिपस्टिक लावणेसुद्धा टाळावे.

ओठांवर तेल लावावे..
फाटलेले ओठ असल्यास तेथे थोडे तेल लावून हलका मसाज करणेही फायदेशीर असते. यासाठी क्रॅक पडलेल्या ओठांवर थोडे तेल लावून चोळावे. तेलामुळे ओठ मॉश्चराइज होऊन तेथील वेदना कमी होतात. यासाठी खोबरेल तेल, बदाम तेल, जोजोबा तेल, ऑलिव तेल यांचा वापर करू शकता.

मध आणि कोरपडीचा गर..
क्रॅक पडलेल्या ओठांवर मध लावणेही उपयोगी पडते. मधामुळे ओठांच्या ठिकाणी ओलावा येईल आणि वेदना कमी होऊन बरेही वाटेल. त्याचप्रमाणे क्रॅक पडलेल्या ओठांना कोरफड जेल लावणे देखील चांगले असते.

क्रॅक पडलेल्या ओठांची अशी घ्यावी काळजी..

ओठ फुटल्यास खरबडीत झालेली ओठांची त्वचा बोटांनी ओढून काढू नये तसेच त्याठिकाणी दातांनी चावूही नये. कारण असे करण्याने तेथे जखमा होऊन वेदना वाढण्याची शक्यता अधिक असते.

डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक असेल..?

ओठ फुटणे ही तशी सामान्य समस्या असते. काही घरगुती आयुर्वेदिक उपायांनी ही समस्या लवकर दूर होत असते. मात्र असे असले तरी चीलायटिस (Cheilitis) या वैद्यकीय स्थितीबाबत सावध असावे. या स्थितीमध्ये ओठांना मोठ्या प्रमाणात क्रॅक पडतात, घरगुती उपाय करूनही क्रॅक लवकर बरे होत नाहीत. अशावेळी आपल्या डॉक्टरांकडे जाऊन योग्य उपचार घेणे आवश्यक असते.

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुद्धा वाचा..

ओठ काळे पडण्याची कारणे व त्यावरील उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...