न्यूमोनिया आजार होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार – Pneumonia disease in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

न्यूमोनिया – Pneumonia :

न्यूमोनिया हा फुफ्फुसांचा (Lungs) आजार असून यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरस आणि बुरशीमुळे फुफ्फुसाला इन्फेक्शन होत असते. न्युमोनियामध्ये एक किंवा दोन्हीही फुफ्फुसांना संसर्ग होऊ शकतो.

या आजारात फुफ्फुसांच्या आतील अल्विओली म्हणजे श्वसनसंस्थेच्या अगदी बारीक नलिका ज्या फुफ्फुसांमध्ये हवेच्या हस्तांतरणाचे काम करतात त्या न्युमोनियाकोकस जीवाणूच्या संसर्गास बळी पडतात आणि परिणामी फुफ्फुसांमध्ये कफसारखा द्रव साठू लागतो. ह्या द्रवामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते.

न्यूमोनिया होण्याची कारणे – Pneumonia causes :

न्यूमोनिया हा आजार स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया या जीवाणूमुळे तसेच काही विषाणू आणि बुरशी यामुळे होतो. जेंव्हा हे रोगकारक सूक्ष्मजीव श्वसनावाटे फुफ्फुसात जाऊन अल्विओली नावाच्या बारीक नलिकामध्ये जातात. तेथे ते सूक्ष्मजीव आपली संख्या वाढवितात आणि त्या ठिकाणी इन्फेक्शन होऊन फुफ्फुसांमध्ये द्रवपदार्थ साठू लागतो. ह्या द्रवामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते.

न्युमोनिया कसा पसरतो..?
निमोनियास कारणीभूत ठरणारे बॅक्टेरिया, व्हायरस हे संसर्गजन्य असतात . त्यामुळे एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत न्यूमोनिया पसरू शकतो. न्यूमोनिया रुग्णाच्या खोकला व शिंकेद्वारे बॅक्टेरिया किंवा व्हायरस दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरत असतात.

न्यूमोनियाची लक्षणे – Symptoms of Pneumonia :

न्यूमोनियाची लक्षणे ही साधारण ते गंभीरही असू शकतात. जीवाणूमुळे झालेल्या न्यूमोनियाची लक्षणे ही व्हायरसमुळे होणाऱ्या न्यूमोनियापेक्षा लवकर दिसून येतात.
• खोकला येणे, बेडके पडणे.
• ‎सर्दी होणे,
• ‎ताप येणे,
• थंडी वाजून येणे.
• ‎श्वास घेण्यास त्रास होणे, रुग्ण श्वास जलदपणे घेत असतो.
• ‎छातीत दुखणे, अंगदुखी, स्नायू दुखणे, अशक्तपणा जाणविणे, भूक मंदावणे, मळमळ व उलट्या, डोकेदुखी ही लक्षणे न्यूमोनियात दिसू लागतात. तसेच काही रुग्णाच्या खोकल्यातून रक्तही येत असते.

न्यूमोनिया होण्याचा धोका कोणाला अधिक असतो..?
फुप्फुसाचा आधीच काही आजार असेल तर न्यूमोनिया होण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय प्रामुख्याने लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला, गंभीर आजाराचे रुग्ण, हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटरवर ठेवलेले रुग्ण आणि रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असलेल्या लोकांना न्यूमोनिया होण्याचा धोका जास्त असतो.

न्युमोनियाचे निदान असे केले जाते :

पेशंटमधील असलेली लक्षणे आणि रुग्ण तपासणी करून, स्टेथोस्कोपद्वारे श्वासाचा आवाज तपासून याचे निदान आपले डॉक्टर करतील.

याशिवाय छातीचा एक्स-रे, सीटी स्कॅन तपासणी, रक्त परीक्षण, बेडक्याची तपासणी, ब्रोंकोस्कोपी आणि  ब्राँकोएलव्हीओलरलवॉज या तापसणीद्वारेही न्यूमोनियाचे निदान केले जाते.

रक्ताच्या वेगवेगळ्या तपासण्यांतून फुप्फुसाचा संसर्ग रक्तात किती प्रमाणात पसरले आहे आणि त्याचा दुसऱ्या अवयवांवर किती परिणाम झाला आहे काय हे निश्चित केले जाते. थुंकी आणि बेडक्याची तापासणीमुळे कोणत्या जिवाणूंमुळे न्यूमोनिया झाला आहे ते कळते त्यानुसार योग्य ते अँटिबायोटिक किंवा इतर औषध दिले जातात.
छातीच्या एक्स- रे किंवा सीटी स्कॅनद्वारे न्यूमोनिया किती प्रमाणात पसरलेला आहे, फुप्फुसात पाणी झाले आहे काय, याची तपासणी केली जाते.

न्यूमोनियावर असे करतात उपचार – Pneumonia treatments :

न्युमोनियावरील उपचारामध्ये डॉक्टर अँटिबायोटिक औषधे, अँटीवायरल औषधे, ऑक्सिजन थेरपी यांचा वापर करतात. जिवाणूंमुळे होणारा न्यूमोनिया दोन ते चार आठवडय़ांत बरा होतो. पण, विषाणूंमुळे होणारा न्यूमोनिया बरा होण्यास अधिक कालावधी लागतो.

पल्स ऑक्सिमीटर या यंत्राने रुग्णाच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासले जाते. त्यानुसार त्याला ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज आहे का, हे डॉक्टर निश्चित करतात.

न्यूमोनिया रुग्णाचा आहार असा असावा – Pneumonia diet chart :

न्यूमोनिया झाल्यावर रुग्णांनी काय खावे..?
न्यूमोनिया असल्यास भूक कमी होते, काहीही न खाण्याची इच्छा होत असते. तसेच न्युमोनियामध्ये शरीरातील पाणी व क्षार घटक कमी होऊन डिहायड्रेशन होण्याचाही धोका असतो. त्यामुळे न्युमोनिया पेशंटसाठी द्रव पदार्थ दिले पाहिजेत. अशावेळी फळांचा ताजा रस, शहाळ्याचे पाणी देऊ शकता.

रुग्णाच्या आहारात दूध व दुधाचे पदार्थ, फळे, हिरव्या पालेभाज्या समाविष्ट कराव्यात. त्यामुळे शरीराला आवश्यक ती व्हिटॅमिन्स, खनिजे व क्षारघटक मिळत असतात. याशिवाय चरबीशिवाय मांस, मासे चांगले शिजवून रुग्णाला देऊ शकता. यामुळे शरीराला आवश्यक प्रोटिन्स मिळण्यास मदत होईल.

न्यूमोनिया रुग्णांनी काय खाऊ नये..?
न्युमोनिया रुग्णांनी तळलेले पदार्थ, चरबीचे पदार्थ, फास्टफूड, कोल्ड्रिंक्स, बाहेरचे उघड्यावरील पदार्थ, शिळे अन्न, कच्चे व अर्धवट शिजलेले पदार्थ खाणे टाळावे.

न्यूमोनिया प्रतिबंधात्मक उपाययोजना – Pneumonia prevention tips :

न्यूमोनियापासून बचाव कसा करावा, न्यूमोनिया होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याची माहिती खाली दिली आहे.
• खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल धरावा.
• वेळोवेळी आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
• सिगारेट, बिडी यासारखे व्यसने करू नका. धूम्रपानामुळे फुफ्फुसाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
• न्यूमोनिया बाधित रुग्णाजवळ गेल्यावर अधिक काळजी घ्यावी.
• न्यूमोनियापासून बचाव होण्यासाठी लस उपलब्ध आहे. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ती आपण घेऊ शकता.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

लसीकरण आणि न्यूमोनिया –
लसीकरणाद्वारे न्यूमोनिया होण्यापासून रक्षण करता येते. न्यूमोनिया टाळण्यासाठी लस उपलब्ध आहे. लहान मुले, गरोदर स्त्रिया, वृद्ध व्यक्ती, गंभीर आजारी रुग्ण किंवा प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना त्याचा फायदा होऊ शकतो.

न्यूमोनियासंबंधित खालील आजारांचीही माहिती जाणून घ्या..
दमा (अस्थमा) कारणे, लक्षणे व उपाय
डांग्या खोकला
क्षयरोग (TB) आजाराची माहिती


Pneumonia causes, symptoms & treatments information in Marathi