भूक न लागणे – Loss of appetite :
अनेकांना भूक न लागणे ही तक्रार असते. भूक कमी लागण्याची कारणे ही शारीरिक आणि मानसिकही असू शकतात. काही दिवसांसाठी भूक कमी होणे ही सामान्य बाब असू शकते मात्र जर अनेक दिवस ही तक्रार असेल तर नक्कीच चिंतेची बाब असते. कारण आपण घेतलेल्या आहारातूनच आपल्या शरीराचे पोषण होत असते, शरीराला ऊर्जा मिळत असते तसेच शरीराची झीज भरून काढली जाते.
अशावेळी भूक न लागण्याच्या समस्येमुळे पुरेसे अन्न आणि व्हिटॅमिन, खनिजे यासारखी पोषकतत्वे शरीरास न मिळाल्यास याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात म्हणूनच भूक न लागण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नये.
भूक न लागण्याची ही आहेत कारणे –
भूक कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात. अगदी शारिरीक कारणांपासून ते मानसिक कारणामुळेही भूकेवर परिणाम होत असतो.
- शारीरिक कारणांमध्ये विविध आजारांमुळे भूक कमी होते. सर्दी, ताप, काविळ, पोटाचे आजार, उलटी, अपचन, बद्धकोष्ठता, कृमींचा त्रास, पोटात गॅस होणे, पित्ताशयात खडे होणे (gallstone), मधुमेह अशा अनेक आजारांत भूक मंदावते.
- महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेळी, प्रेग्नन्सीमध्ये किंवा रजोनिवृत्तीमध्येही भूक कमी होऊ शकते.
- पौढ व्यक्तीमध्ये वाढत्या वयाबरोबर भूकदेखील मंदावते. उतारवयात पचनक्रीया मंदावल्याने थोडेसे खाल्ले तरी बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे वय वाढल्यानेही भूक कमी होते.
- अनेक औषधांमुळेही भूक कमी होते. विशेषतः अॅण्टीबायोटिक्स, अॅण्टीफंगल्स, आणि Muscle relaxant औषधांमुळे भूक कमी होऊ शकते.
- डिप्रेशन, मायग्रेन, उच्च रक्तदाब, क्रॉनिक आजार आणि कंपवात (पार्किन्सन) या आजारावरील औषधे सुरू असल्यास भूक कमी होते.
- मानसिक कारणांमध्ये ताणतणाव, भीती, डिप्रेशन यांमुळे भूक कमी मंदावते. कामाच्या ताणामुळे किंवा परीक्षेच्या तणावामुळे भूक न लागण्याची समस्या होऊ शकते.
- अपुरी झोप झाल्यामुळेही हा त्रास होऊ शकतो. पुरेशी झोप न मिळाल्यास दिवसभर सुस्ती येते, चिडचिड वाढते आणि थकवा येतो परिणामी भूक न लागण्याची तक्रार सुरू होते.
- अयोग्य आहार म्हणजे फास्टफूड, जंकफूड, चिप्स, स्नॅक्स, कोल्ड्रिंक्स, भरपूर चहा-कॉपी पिण्यामुळेही ‘अन्न जेवताना’ भूक न लागण्याची तक्रार सुरू होते.
- दारू, मद्यपान, सिगारेट, तंबाखू यासारख्या व्यसनांमुळेही भूक कमी होत असते.
भूक वाढीसाठी हे घरगुती उपाय करावे :
(1) दोन ते तीन काळी मिरी आणि लवंग यांचे एकत्र चूर्ण घ्यावे त्यात मध मिसळून चाटण करून खावे. यामुळे भूक वाढते व अन्न पचण्यास मदत होते.
(2) लवंग, लेंड पिंपळी समप्रमाणात घेऊन त्यांचे बारीक चूर्ण करावे. एक ते दीड ग्रॅम चूर्ण घेऊन अर्धा चमचा मध मिसळून मिश्रणाचे सकाळ व संध्याकाळी चाटण करावे.
(3) जेवल्यावर ओवा, तीळ आणि सैंधव मीठ हे एकत्र करून अर्धा किंवा एक चमचा खाल्ल्यास भूक वाढते अन् पोट साफ राहते.
(4) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्यास सकाळी पोट साफ होते आणि भूक वाढते.
(5) काळ्या मनुका किंवा सुखे अंजीर रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी खाल्यास नियमित पोट साफ होते आणि भूक वाढते.
भूक न लागणे यावरील उपचार :
कोणत्या कारणांमुळे भूक कमी झाली आहे त्यानुसार यावरील उपचार ठरतात. उपचारात भूक वाढीची औषधे, योग्य आहार, व्यायाम यांचा अंतर्भाव केला जातो.
भूक वाढीसाठी औषधे –
हिंगापासून बनवलेलं हिंग्वाष्टक चूर्ण’ हे आयुर्वेदिक औषध पचनाच्या समस्येसाठी खूप उपयोगी आहे. आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरमध्ये हिंग्वाष्टक चूर्ण’ उपलब्ध असते. जेवताना तूप आणि हिंग्वाष्टक चूर्ण घालून भात खाल्यास भूक चांगली लागून अन्नाचे पचनही व्यवस्थित होते.
याशिवाय भूक वाढीसाठी झंडू पंचारिष्ट वैगरे टॉनिक घेण्याचाही या समस्येत उपयोग होतो. जर कृमींमुळे भूक न लागण्याच्या तक्रारी होत असल्यास कृमींवरील औषधेही वेळोवेळी घ्यावीत.
भूक वाढीसाठी योग्य आहार –
- भूक कमी झाल्यास सहज पचणारा योग्य आहार घ्यावा.
- फास्टफूड, जंकफूड, स्नॅक्स, कोल्ड्रिंक्सपासून दूर राहावे.
- पोट नियमित साफ राहील याची काळजी घ्यावी. यासाठी आहारात फायबर्सचा समावेश असावा.
- हिरव्या पालेभाज्या, विविध फळे यांमध्ये फायबर्सचे प्रमाण भरपूर असते.
- पुरेसे पाणी प्यावे. दिवसभरात साधारण आठ ग्लास पाणी प्यावे.
- तंबाखू, सिगारेट, मद्यपान अशा विविध व्यसनांपासून दूर राहावे.
नियमित व्यायाम करावा –
व्यायामामुळे कॅलरीज कमी होतात त्यामुळे भूक वाढीसाठी याचा चांगला उपयोग होतो. तसेच व्यायामामुळे घेतलेल्या अन्नाचे पचनही व्यवस्थित होण्यास मदत होते. यासाठी नियमित अर्धा व्यायाम करावा. व्यायामात चालणे, पळणे सायकलिंग पोहणे दोरीउड्या, झुंबा डान्स, मैदानी खेळ असे व्यायाम प्रकार समाविष्ट करावेत.
भूक कमी झाल्यास काळजीचे कारण केंव्हा असते..?
काही दिवसांसाठी भूक कमी लागणे हे सामान्य बाब असू शकते मात्र जर अनेक दिवस भूक मंदावली असल्यास नक्कीच ते काळजीचे कारण आहे. तसेच अनेक दिवस भूक न लागण्याबरोबरच एकाएकी वजन कमी होणे अशी लक्षणे असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण कॅन्सरसारख्या काही गंभीर आजाराचीही ती लक्षणे असू शकतात. त्यामुळे अनेक दिवस भूक कमी झालेली असल्यास आपल्या डॉक्टरांकडून निदान व उपचार करून घ्यावे.
हे सुध्दा वाचा –
Read Marathi language article about Loss of appetite Causes, Home remedies and Treatments. Last Medically Reviewed on February 23, 2024 By Dr. Satish Upalkar.