थायरॉईड आणि आहार – Thyroid diet) :
थायरॉईडचा त्रास अनेकांना आहे. थायरॉईड समस्या असल्यास योग्य आहार घ्यावा लागतो. हायपरथायरॉईडीझम आणि हायपोथायरॉईडीझम असे थायरॉईड समस्येचे दोन मुख्य प्रकार आहेत.
थायरॉईडमध्ये प्रकारानुसार आहार नियोजन करावे लागते. कारण थायरॉईडचे हायपरथायरॉईडीझम आणि हायपोथायरॉईडीझम असे दोन मुख्य प्रकार असतात. या दोन्ही प्रकारात वेगवेगळे त्रास होत असतात. यासाठी थायरॉईडचा प्रकार काय आहे ते पाहून त्यानुसार आहार ठरवावा लागतो. येथे Hyperthyroidism व Hypothyroidism असल्यास थायरॉईड रुग्णांनी कोणता आहार घ्यावा याची माहित दिली आहे.
1) हायपरथायरॉईडीझम (Hyperthyroidism) –
हायपरथायरॉईडीझम या स्थितीमध्ये थायरॉईड ग्रंथीतून जास्त प्रमाणात थायरॉईड हार्मोन्सची निर्मिती होत असते. हायपरथायरॉईडीझम यामध्ये एकाएकी वजन कमी होणे, भूक वाढणे, तणाव जाणवणे, झोपेच्या तक्रारी सुरू होणे, अधिक गरम वाटणे, घाम जास्त येणे, छातीत अधिक धडधड जाणवणे, हात थरथरणे, अशक्तपणा, दुर्बलता, थायरॉईडचा आकार वाढणे, स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या तक्रारी होणे असे त्रास हायपरथायरॉईडीझममुळे जाणवू लागतात. हायपरथायरॉईडीझम ही थायरॉईड समस्या असणाऱ्या रुग्णांनी पुढीलप्रमाणे आहार घ्यावा.
हायपरथायरॉईडीझम या थायरॉईड त्रासात घ्यायचा आहार –
हिरव्या पालेभाज्या, शेंगभाज्या, फळभाज्या, ताजी फळे, आयोडीन नसणारे मीठ, धान्ये, कडधान्ये, मसूर, हरभरा, शेंगदाणे, काजू, बदाम, भोपळ्याच्या बिया, चिकन, मांस, अंड्याचा पांढरा भाग, बांबूचे कोंब, ब्रोकोली, पालक, फ्लॉवर, भेंडी, हळद, मिरी, हिरव्या मिरच्या, मोहरी, बटाटा, मध ह्या पादार्थांचा आहारात समावेश करू शकता.
हायपरथायरॉईडीझम मध्ये काय खाणे टाळावे ..?
हायपरथायरॉईडीझम या प्रकारच्या थायरॉईड त्रासात आयोडीनयुक्त पदार्थ खाणे टाळावे. आहारातील आयोडीनयुक्त मिठाचा वापर टाळावा. तसेच आयोडीन असणारे पूरक औषधे खाणे टाळावे. मीठ लावलेले मासे, झिंगा, कोळंबी, दूध व दुधाचे पदार्थ, अंड्यातील पिवळा भाग, सोया प्रोडक्ट खाणे टाळावे. तसेच कॅफेनयुक्त पदार्थ म्हणजे चहा, कॉफी, सोडा, चॉकलेट यांचे प्रमाण कमी करावे. यामुळे छातीत अधिक धडधडू लागते. याशिवाय सिगारेट, तंबाखू, अल्कोहोल ह्या व्यसनांपासून दूर राहावे.
त्याचप्रमाणे नायट्रेट्सयुक्त पदार्थ खाणे कमी करावे. नायट्रेट्समुळे थायरॉईडमध्ये अधिकप्रमाणात आयोडीन शोषले जात असते. यासाठी हायपरथायरॉईडीझम समस्या असल्यास नायट्रेट्सयुक्त पदार्थ खाणे कमी करावे. बीट, गाजर, काकडी, भोपळा, बडीशेप, कोबी ह्यामध्ये नायट्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने हे पदार्थ खाणे टाळा. हायपरथायरॉईडीझम (Hyperthyroidism) विषयी सर्व माहिती जाणून घ्या.
2) हायपोथायरायडिझम (Hypothyroidism) –
हायपोथायरायडिझम या स्थितीमध्ये शरीरात मुबलक प्रमाणात थायरॉईड हार्मोन्सची निर्मिती होत नाही. हायपोथायरायडिझममध्ये अशक्तपणा जाणवणे, केस गळणे, वजन वाढणे, थंडी वाजून येणे अशी लक्षणे यात असतात. हायपोथायरायडिझम ही थायरॉईड समस्या असलेल्या रुग्णांसाठी पुढीलप्रमाणे आहार घ्यावा.
हायपोथायरायडिझम या थायरॉईड त्रासात घ्यायचा आहार –
हायपोथायरायडिझम हा थायरॉईडचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी फायबर्स, प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स व मिनरल्स अशी पोषकतत्वे असणारा संतुलित आहार घ्यावा. यासाठी आहारात धान्य, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, विविध फळे, दूध व दुधाचे पदार्थ, मांस, मासे, अंडी याचा समावेश करावा.
हायपोथायरायडिझम पेशंटसाठी व्हिटॅमिन-B12, आयोडीन, सेलेनियम, झिंक, प्रोबायोटिक्स यासारखी पोषकघटक खूप महत्त्वाचे असतात. दूध, अंडी, मांस, मासे, तीळ यात व्हिटॅमिन-B12 मुबलक प्रमाणात असते. याशिवाय दह्यात असणारे प्रोबायोटिक्ससुद्धा उपयुक्त असतात. त्यामुळे दह्याचाही आहारात समावेश करावा.
हायपोथायरायडिझम असल्यास काय खाणे टाळावे ..?
हायपोथायरायडिझममध्ये वजन व रक्तातील कोलेस्टेरॉल वाढण्याची अधिक शक्यता असते. यासाठी आहारात चरबी वाढवणारे पदार्थ, तेलकट पदार्थ, साखरेचे गोड पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, फास्टफूड, जंकफूड खाणे टाळावे.
विशेषतः ग्लूटेन हा घटक असणारे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. त्यामुळे हाइपोथायरायडिज्म असल्यास गहू व गव्हाचे पदार्थ खाणे टाळा. तसेच थायरॉईडवर प्रतिकूल परिणाम करणारे गोयट्रोजेन घटक असणारे कोबी, ब्रोकोली, पालक, स्ट्रॉबेरी, रताळी, सोयाबीन, शेंगदाणे हे पदार्थ खाणे टाळावे. हायपोथायरायडिझम विषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.
हे सुद्धा वाचा..
थायरॉईड टेस्ट विषयी माहिती जाणून घ्या.
Read Marathi language article about Thyroid diet plan. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.