स्नायू दुखणे (Muscle pain) :
काहीवेळा आपले स्नायू दुखू लागतात. स्नायू दुखने ही एक सामान्य समस्या आहे. स्नायू मध्ये होणाऱ्या या वेदनांना वैद्यकीय भाषेत Myalgia (मायलजिया) या नावाने संबोधले जाते. बऱ्याचदा ही समस्या काही घरगुती उपायानेही सहज दूर होते.
अनेक कारणांनी स्नायूंच्या ठिकाणी वेदना होऊ लागतात. विशेषतः स्नायूंना मार लागणे, दुखापत होणे किंवा स्नायू अवघडणे यांमुळे स्नायू दुखत असतात. व्यायाम करताना स्नायूंवर जास्त ताण आल्यामुळेही स्नायू दुखत असतात. याशिवाय,
- थायरॉईडची समस्या असणे,
- शरीरात पोटॅशियमची कमतरता असणे,
- फ्लू सारखे इन्फेक्शन,
- ल्युपस, डर्मेटोमायोसिटिस (dermatomyositis) आणि पॉलीमिओसिटिस (polymyositis) सारखे ऑटोइम्यून डिसऑर्डर,
- फायब्रोमायल्जिया (fibromyalgia),
- गाउट, आमवात, सांधेदुखी यासारखे त्रास,
- विशिष्ट औषधांचा परिणाम अशा अनेक कारणांनी स्नायू दुखत असतात.
स्नायू दुखणे याची लक्षणे :
स्नायूंच्या ठिकाणी वेदना होऊ लागणे हे प्रमुख लक्षण यामध्ये असते. याशिवाय दुखणाऱ्या भागी सूज येते तसेच लालसरपणाही जाणवतो. अशी लक्षणे स्नायू दुखणे यामध्ये असतात.
स्नायू दुखणे यावर घरगुती उपाय –
1) कोल्ड कॉम्प्रेस –
स्नायू दुखत असल्यास थंड पाण्याने शेक घ्यावा. बर्फाचा शेक दुखणाऱ्या स्नायूंच्या ठिकाणी काही वेळ घ्यावा यामुळे स्नायूंना आलेली सूज कमी होऊन वेदना दूर होण्यास मदत होते.
2) सैंधव मीठ व कोमट पाणी –
सैंधव मिठात मॅग्नेशियम सल्फेट असते, ज्यामुळे स्नायू शिथिल होतात व वेदना कमी होण्यास मदत होते. यासाठी पाण्यात थोडे सैंधव मिठ घालून ते पाणी गरम करून घ्यावे. या कोमट पाण्याचा शिडकावा दुखनाऱ्या स्नायूंवर करावा. आंघोळीच्या पाण्यातसुध्दा सैंधव मीठ घालून त्या पाण्याने आंघोळ करू शकता. स्नायू दुखणे यावर हा घरगुती उपाय उपयुक्त आहे.
3) आयुर्वेदिक वेदनाशामक तेल –
स्नायू दुखत असल्यास त्याठिकाणी आयुर्वेदिक वेदनाशमक तेल जसे महानारायण तेल, निर्गुंडी तेल यांचा वापर खूप प्रभावी ठरतो. दुख्णाऱ्या स्नायूंवर तेल लावताना, तेल थोडे कोमट करून घ्यावे. आयुर्वेदिक वेदनाहर तेलामुळे स्नायूंना आलेली सूज व वेदना दूर होण्यास मदत होते.
4) हळद आणि दूध –
हळदीमध्ये अँटी-ऑक्सीडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे स्नायुतील वेदना व सूज कमी होण्यास मदत होते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी हळद घालून दूध प्यावे.
स्नायू दुखणे यावर औषध उपचार –
स्नायू दुखणे यावर आपले डॉक्टर ibuprofen, paracetamol ही वेदनाशामक गोळ्या औषधे देतील. तसेच दुखणाऱ्या भागाला काही दिवस विश्रांती देण्याची सूचनाही ते देतील.
स्नायू दुखल्यास घ्यावयाची काळजी :
- घरगुती उपाय करूनही वेदना कमी होत नसल्यास आपल्या डॉक्टरांकडे जावे,
- स्नायू दुखणे याबरोबरच त्वचेवर पुरळ आल्यास किंवा अधिक वेदना जाणवत असल्यास डॉक्टरांकडे जावे,
- दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. यामुळे शरीर हायड्रेट राहते.
- आहारात दूध, अंडी, मांस, मासे, शेंगदाणे, सुखामेवा अशा प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा समावेश करा.
- व्यायाम करण्यापूर्वी वार्मअप व स्ट्रेचिंग करावे. त्यानंतरच व्यायाम करावा.
Read Marathi language article about Muscle pain causes & home remedies. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.