युरिक ऍसिड किंवा गाऊट आजार :
गाऊट हा एक प्रकारचा संधिवात (Gout arthritis) असून आपल्या रक्तात यूरिक ऍसिडचे प्रमाण अधिक वाढल्याने हा त्रास होत असतो. युरिक अॅसिड हे एक प्रकारचे अपायकारक घटक असून शरीरात Purines पासून तयार होते. सामान्यतः आपली किडनी ही शरीरातील या विषारी घटकास लघवीवाटे शरीरातून बाहेर टाकत असते.
मात्र कोणत्याही कारणामुळे युरिक ऍसिडचे प्रमाण शरीरात अधिक वाढत राहिल्यास, लघवीवाटे पुरेसे युरिक ऍसिड शरीरातून बाहेर न टाकले गेल्यास रक्तामध्ये युरिक अॅसिडचे प्रमाण वाढते आणि त्यानंतर युरिक अॅसिड छोट्या-छोट्या स्फटिक स्वरूपात आपल्या शरीरातील सांध्यांमध्ये (Joints) जमा होऊन त्याठिकाणी सूज, वेदना, जकड़न इत्यादि लक्षण उत्पन्न करतो. या त्रासाला गाऊट आजार असे म्हणतात.
गाऊट रोग हा आयुर्वेदात वातरक्त या नावाने ओळखला जातो. हा रोग प्रामुख्याने पायाच्या अंगठ्यामध्ये अधिक प्रमाणात झालेला आढळतो. याशिवाय गुडघा, पाय, हात, मनगट किंवा कोपराच्या सांध्यामध्येही होऊ शकतो.
गाऊटची लक्षणे (Symptoms of Gout) :
- गाऊटच्या त्रासात सांध्यांमध्ये युरिक अॅसिड जमा झाल्याने त्याठिकाणी सूज येते व त्याठिकाणी अतिशय वेदना होत असतात.
- त्रास अधिक वाढल्यास रूग्णास चालण्यास-फिरण्यास त्रास होतो.
- सांध्यांना केवळ स्पर्श केले तरी वेदना वाढतात. त्या सांध्याची त्वचा लाल रंगाची दिसते तर यामुळे कधी-कधी सांध्याचा आकारसुद्धा विकृत होतो.
गाऊट ची कारणे (Gout causes) :
शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण सामान्यापेक्षा अधिक वाढल्याने गाऊट विकार होतो. शरीरात युरिक अॅसिड वाढण्यास खालील घटक सहाय्यक ठरतात जसे,
- मांसाहार, दारूचे व्यसन यासारख्या हाय-प्युरिनयुक्त पदार्थ अधिक खाण्यामुळे गाऊटचा त्रास होण्याचा धोका अधिक वाढतो.
- लठ्ठपणामुळे,
- Aspirin आणि मूत्रल अौषधांच्या (Diuretics) अतिवापरामुळे,
- कुटुंबात यापूर्वी असा त्रास कोणाला झालेला असल्यास अनुवांशिक कारणांमुळेही गाऊट आजार होऊ शकतो.
- वयाच्या चाळिशीनंतर हा त्रास होण्याचे प्रमाण अधिक आहे.
- महिलांपेक्षा हा रोग पुरुषांमध्ये अधिक आढळतो. महिलांमध्ये रजोनिवृत्ति नंतर गाऊट रोग होण्याची अधिक शक्यता असते.
- हाय ब्लडप्रेशर, डायबेटीस, किडनीचे आजार, हृदयाचे विकार असल्यासही गाऊटचा त्रास होण्याचा धोका अधिक असतो.
- याशिवाय कोणतीही मोठी शस्त्रक्रिया (Operation) झालेली असल्यास गाऊट रोग होण्याचा धोका जास्त असतो.
हाय-प्युरिनयुक्त पदार्थ कोणते आहेत..?
जे पदार्थ अधिक प्रमाणात युरिक ऍसिड वाढवतात त्यांना हाय-प्युरिनयुक्त पदार्थ असे म्हणतात. दारू-बियर, मासे, सीफूड, कोळंबी, झिंगा, खेकडे, मांसाहारी पदार्थ, चिकन, अंडी, कोल्ड्रिंक्स, चरबीचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, स्नॅक्स, वाटाणा, मटार, उडीद, वाल, पावटा या पदार्थात प्युरिनचे अधिक प्रमाण असते. असे प्यूरिनयुक्त पदार्थ अधिक खाल्यामुळे शरीरात यूरिक एसिडचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे युरिक ऍसिड किंवा गाऊटचा त्रास असल्यास वरील पदार्थ खाणे टाळावे.
गाऊटचे निदान :
पुरुषांमध्ये रक्त तपासणीत युरिक अॅसिडचे प्रमाण 7.2 mg/dl पेक्षा अधिक असल्यास आणि महिलांमध्ये 6.1 mg/dl पेक्षा अधिक प्रमाणात रक्तात युरिक अॅसिड असल्यास Hyperuricemia किंवा गाऊटचे निदान होते.
याशिवाय मूत्र परिक्षण आणि सांध्यातील द्रव्याच्या परिक्षणामध्ये अधिक मात्रेत युरिक अॅसिड आढळल्यास Gout रोगाचे निदान होण्यास मदत होते.
गाऊटवरील उपाय :
- गाऊटमध्ये युरिक अॅसिडवर नियंत्रण ठेवणारा आहार घेतला पाहिजे. यासाठी अधिक Potassium युक्त आहार घ्या. जसे केळी इत्यादि. अधिक Complex Protein युक्त आहार घ्या. जसे जांभूळ, ओवा इ.
- मद्यपान, धुम्रपान, तंबाखूचे व्यसन करणे टाळा.
- Purine युक्त आहार घेऊ नये. जसे मांसाहार, झींगा, कोबी, पालक, मटार, शीतपेये इ. आहार घेणे टाळा.
- आहारात मिठाचा अत्यंत कमी वापर करा.
- हिरव्या पालेभाज्या, फळे, लसूण, आले यांचा आहारात भरपूर समावेश करा.
- दररोज पुरेसे म्हणजे साधारण आठ ग्लास पाणी प्यावे.
- लघवीस वेळच्यावेळी जावे. लघवीस होऊनही थांबवून ठेऊ नये.
- गाऊट हा एक प्रचंड पीड़ादायी असा आजार आहे. त्यामुळे त्याची लक्षणे जाणवू लागताचं योग्य उपचार करून घ्यावे लागतात.
गाऊट आणि उपचार (Treatments):
गाऊटवर वेळीच योग्य उपचार न केल्यास हा त्रास पुढे वाढतच जातो. आयुर्वेदात गाऊटच्या त्रासावर अनेक उपयुक्त औषधे आहेत. यामध्ये आयुर्वेदिक गोळ्या आणि औषधी तेलांचा समावेश असतो. या उपचारांनी रक्तातील युरिक एसिडचे प्रमाण कमी होते तसेच संध्यातील सूज व वेदनाही कमी होतात. गाऊटच्या त्रासावरील उपचारासाठी आपल्या जवळच्या आयुर्वेद तज्ञ डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या.
हे सुद्धा वाचा..
आमवात
गुडघेदुखी
पायात गोळे येणे
Read Marathi language article about Gout or uric acid causes, symptoms & treatment. Last Medically Reviewed on February 19, 2024 By Dr. Satish Upalkar.