कोहळा – Winter Melon :

अनेक औषधी गुणधर्म असलेला कोहळा हा आरोग्यासाठी फायदेशीर असतो. असे असूनही अनेकांना कोहळाचे फायदे माहित नसतात. यासाठी येथे कोहळा खाण्याचे फायदे याविषयी माहिती दिली आहे. मिठाईसारख्या बऱ्याच पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. याला english मध्ये Ash Gourd किंवा Winter Melon असे म्हणतात.

आयुर्वेदातही कोहाळ्याला खूप गुणकारी मानले आहे. आयुर्वेदानुसार कोहळा हा शीत, स्निग्ध गुणांचा असून वात-पित्त कमी करणारा, बुद्धीवर्धक आणि बल वाढवणारा आहे.

कोहळ्यातील पोषकघटक :

कोहळ्यात मुबलक प्रमाणात उपयुक्त पोषकघटक असतात जे आपल्याला विविध प्रकारचे आरोग्य लाभ देण्यास मदत करतात. कोहाळामध्ये व्हिटॅमिन-C , व्हिटॅमिन-B1, B3, रायबोफ्लेविन, नियासिन आणि थायमिन सारखे अनेक जीवनसत्त्वे असतात. 

या व्यतिरिक्त यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, जस्त, तांबे, सेलेनियम, मॅंगनीज, कॅल्शियम आणि सोडियम यासारख्या आवश्यक खनिज व क्षारांचे प्रमाणही चांगले असते.

कोहाळ्यात पाण्याचे प्रमाण 95 टक्के इतके असते. तर फायबर्सही मुबलक प्रमाणात असते. या सर्व पोषकतत्वांच्यामुळे कोहाळा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.

कोहळा खाण्याचे फायदे :

कोहाळात पोटॅशियमचे मुबलक प्रमाण असल्याने कोहळा खाणे हृदयासाठी हितकर असते. यामुळे रक्तदाब आटोक्यात राहतो. आम्लपित्ताचा त्रास कोहळा खाल्याने कमी होतो. यातील फायबर्समुळे पोट साफ होते तसेच त्यामुळे कृमी नष्ट होण्यास आणि मूळव्याध कमी होण्यास मदत होते.

कोहळा खाण्यामुळे होणारे सर्व फायदे :

हृदयासाठी उपयुक्त..
कोहाळात भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि व्हिटॅमिन-C असते. हे घटक हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी आवश्यक असतात. पोटॅशियममुळे रक्तवाहिन्यामधील तणाव कमी करून रक्तदाब कमी करण्यास मदत होते. रक्तदाब नियंत्रित करून शरीरात योग्य रक्त प्रवाह राखला जातो. अशाप्रकारे, कोहळा हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते. याशिवाय यामध्ये असलेले व्हिटॅमिन-C हार्ट अटॅकची शक्यता कमी करण्यासाठी उपयुक्त असते.

अ‍ॅसिडिटी कमी करते..
जर आपल्याला अ‍ॅसिडिटीची समस्या असल्यास तर कोहळ्याचा रस तयार करून त्यात थोडीशी हिंगाची पूड घालावी. कोहाळ्याचा रस दररोज सकाळी व संध्याकाळी प्यावा. यामुळे आम्लपित्तपासून आराम मिळण्यास मदत होते. अ‍ॅसिडिटीबरोबरच अल्सरचा त्रासही कमी होण्यास कोहळा फायदेशीर असतो.

नाकातून रक्तस्त्राव थांबविण्यासाठी..
जर नाकातून रक्तस्त्राव होण्याची समस्या असल्यास कोहाळ्याचा रस पिणे आणि कोहळा खाणेही उपयुक्त ठरते.

मळमळ व उलट्या थांबवते..
मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी यासारखे त्रास होत असल्यास चार चमचे कोहळ्याचा रसात साखर मिसळून मिश्रण घ्यावे.

पोट साफ ठेवते व कृमी दूर करते..
कोहाळ्यात फायबर्सचे प्रमाण मुबलक असते. कोहळा खाण्यामुळे नियमित पोट साफ होण्यास मदत होते. तसेच पोटात जंत किंवा कृमींचा त्रास असल्यास त्यावरही कोहळा खूप उपयोगी ठरतो.

मूळव्याधमध्ये उपयुक्त..
मूळव्याधाचा त्रास होत असल्यास त्यावरही कोहळा फायदेशीर ठरतो. यासाठी कोहळ्याचा 2 चमचे गर, 1 चमचा गूळ, 1 चमचा तीळ आणि अर्धा चमचा हिरड्याचे चूर्ण एकत्र मिसळून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण दिवसातून दोनदा दुधाबरोबर प्यावे. यामुळे मुळव्याधची समस्या लवकर दूर होण्यास मदत होते. तसेच मूळव्याधीत होणाऱ्या बद्धकोष्ठता आणि रक्त पडणे या समस्याही दूर होतात.

वजन कमी करण्यास उपयुक्त..
कोहाळ्यात फायबर्सचे प्रमाण भरपूर असून ते कमी कॅलरीज असते त्यामुळे वजन कमी करण्यास कोहळा उपयोगी ठरतो.

किडनीच्या आरोग्यासाठी उपयुक्त..
कोहाळाचा आहारातील सेवनामुळे किडनी निरोगी राखण्यासाठी मदत होते. किडनीचे आरोग्य उच्च रक्तदाबामुळे धोक्यात येत असते. मात्र कोहळा रक्तदाब नियंत्रित ठेवत असल्याने किडन्या निरोगी राहण्यास मदत होते.

लघवीची जळजळ कमी करते..
कोहाळ्याचा रस पिण्यामुळे लघवीला साफ होऊन लघवीला जळजळ होणे दूर होते. मूतखडा झाल्यासही लघवी साफ होत नसल्यास कोहळ्याचा रस प्यावा.

फिट येणे यावर उपयुक्त..
फिट येणे किंवा एपिलेप्सीचा त्रास असल्यास 1 चमचा गाईचे तूप, 9 चमचा ज्येष्टमध चूर्ण, 9 चमचा कोहाळा रस हे मिश्रण एकत्रित करून घ्यावे.

वीर्य वाढवतात..
ज्या पुरुषांची प्रजनन क्षमता कमी असते त्यांच्यासाठी कोहळा खाणे फायदेशीर असते. याच्या नियमित सेवनाने शुक्राणूंची संख्या वाढू शकते.

मुलांसाठी उपयुक्त..
वाढत्या वयातील मुलांच्या आहारात कोहळ्याचा जरूर वापर करावा. कारण मुलांची वाढ योग्यप्रकारे होण्यासाठी यांमुळे मदत होते. तसेच मुलांची बुद्धी व स्मरणशक्ती वाढण्यासाठीही कोहळ्याचा उपयोग होतो.

कोहळा कसा खावा..?

कोहळाचा गर खाणे किंवा कोहळा रस करून पिणे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरते. याशिवाय कोहळ्याचे विविध पदार्थ करून आपण ते खाऊ शकता. यामध्ये कोहळाची थालीपीठ, पराठा, भाजी व सूप असे अनेक पदार्थ करून आपण आहारात कोहळाचा समावेश करू शकता.

कोहळा खाण्यामुळे होणारे नुकसान :

कोहळा आरोग्यासाठी फायदेशीर असतो तसेच काहीवेळा कोहळा खाण्यामुळे त्रासही होऊ शकतो. कोहळा जास्त प्रमाणात खाण्यामुळे वजन अधिक वाढू शकते. तसेच ज्यांना दमा , सर्दी किंवा ब्राँकायटिस त्यांनी कोहळा खाणे टाळावे. कारण या त्रासामध्ये कफ वाढू शकतो.

कोहळा पोषकतत्वे (Nutritional contents) :

एक कप किंवा 100 ग्राम कोहळ्यातील पोषकघटक पुढीलप्रमाणे असतात.

 • कॅलरीज – 17
 • एकूण कर्बोदके – 4 gm
 • फायबर – 3.8 gm
 • प्रथिने – 0.5 gm
 • एकूण चरबी 0.3 gm
 • कोलेस्टेरॉल 0%
 • सोडियम 146.5 मिलीग्राम
 • पोटॅशियम 7.9 मिलीग्राम
 • मॅग्नेशियम 3%
 • कॅल्शियम 2%
 • लोह 2%
 • व्हिटॅमिन बी- 60%
 • व्हिटॅमिन C – 2%
 • व्हिटॅमिन डी 0%
कॉपीराइट - डॉ. सतीश उपळकर
(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

हे सुद्धा वाचा..
कारले खाण्यामुळे होणारे फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Ash Gourd or Winter Melon health benefits in Marathi information.