अपस्मार (Epilepsy) :
आपण अनेकदा रस्त्यावर किंवा आजूबाजूला पाहतो की एखादी व्यक्ती अचानक बेशुद्ध होऊन खाली पडते आणि ती व्यक्ती स्वतःचे हात आणि पाय अगदी घट्ट आवळून ठेवते, शरीराच्या विचित्र हालचाली करते आणि त्याच्या तोंडातून फेस किंवा लाळ येऊ लागतो. या विकारास फिट येणे, फेफरे येणे, मिर्गी किंवा एपिलेप्सी (Epilepsy) असेही म्हणतात.
अपस्मार हा चेतासंस्थेचा (मेंदूसंबंधी) आजार आहे. रुग्णास वरचेवर असे अपस्माराचे झटके येत असतात. जन्मतःच मेंदूत असणारा एखादा दोष किंवा डोक्याला अपघातामुळे झालेली इजा यांमुळे अशा प्रकारचे फेफरे किंवा झटके येतात. अपस्मार हा कोणत्याही वयातील लोकांमध्ये आढळतो. अनेकदा लहान मुलांमध्ये असणारा अपस्माराचा त्रास हा वयानुसार वाढत जातो. या आजारात येणाऱ्या फिटस् टाळता येत नसल्या तरी योग्य उपचारांनी त्यावर नियंत्रण ठेवता येते.
अपस्मार आजाराची लक्षणे (Epilepsy symptoms) :
• रुग्णाचा अचानकपणे शरीराचा संतुलन ढासळतो, अशक्तपणा येतो व तोल जाऊन खाली बेशुद्ध होऊन पडतो.
• शरीर आकडते, झटका येतो.
• शरीराच्या विचित्र हालचाली होतात.
• जीभ किंवा ओट दातांनी चावले जाते, दातखिळी बसते.
• तोंडातून फेस येऊ लागतो.
• रुग्ण डोळे फिरविते, शुद्धी हरपते.
या आजारामुळे येणाऱ्या झटक्यांचा कालावाधी एक ते तीन मिनिटांचा असतो. अशा 1-2 मिनिटांच्या झटक्यांमुळे मेंदूला अंतर्गत इजा होत नाही. पण वारंवार असे झटके येऊ लागल्यास व अशा झटक्यांचा कालावधी काही मिनिटांपासून काही तासांपर्यंत वाढल्यास मेंदूला इजा होऊ शकते. तसेच अचानक बेशुद्ध होऊन खाली पडल्यामुळे शारीरिक इजाही होऊ शकते.
फिट येण्याची कारणे (Epilepsy Causes) :
मानसिक ताणतनावामुळे, अपूर्ण झोपेमुळे, ताप-सर्दी-खोकला हे आजार झाल्यास, रक्तदाब वाढल्यास, रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यास, स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळी, Anti-psychotic किंवा Anti-depressant औषधांच्या दुष्परिणामामुळे, डोक्याला मार लागल्यामुळे, कडक उन्हाच्या त्रासामुळे अपस्माराचा झटका येण्याची संभावना वाढते.
फेफरे येणे याचे असे केले जाते निदान :
वारंवार फिट्स येत असल्यास मेंदूरोग तज्ज्ञाकडून अपस्माराबाबतचे निदान करून घेणे आवश्यक असते. पेशंटची हिस्ट्री, शारीरिक तपासणी आणि E.E.G (Electroencephelography), MRI स्कॅन, CT स्कॅन इ. चाचण्या करून याचे निदान केले जाते.
अपस्मारवर हे आहेत उपचार (Epilepsy treatments) :
तज्ज्ञ डॉक्टरांकडून अपस्माराचे निदान झाल्यानंतर आधी Anti-epileptic औषधे सुरू केली जातात. औषधांनी जर अपस्मार नियंत्रणात येत नसल्यास मेंदूवरील सोपी आणि सुटसुटीत शस्त्रक्रियने (Operation) अपस्मारवर यशस्वी उपचार होऊ शकतात.
एखाद्यास फिट आल्यास काय करावे..?
• जर एखाद्या व्यक्तीस फिट आल्यावर, स्वतः आपण शांत राहा व भयभीत होऊ नका.
• फेफरे येऊन पडलेल्या रुग्णास जबरदस्तीने हलवू नका.
• रुग्णाला इजा पोहोचतील अशा वस्तू आजूबाजूला असल्यास त्या वस्तू दूर करा.
• रुग्णाला डाव्या किंवा उजव्या बाजूस वाळवावे त्यामुळे रुग्णाच्या तोंडात अडकलेली लाळ किंवा फेस बाहेर पडून जाईल.
• त्यानंतर रुग्णाला पाठीवर झोपवावे व त्याच्या डोक्याखाली उशी ठेवावी.
• रुग्णाचे तोंड उघडण्यासाठी चमचा वगैरे कोणतीही वस्तू घालू नका.
• चप्पल, कांदा यासारख्या वस्तू रुग्णाच्या नाकाला हुंगायला लावू नका.
अपस्माराच्या झटक्यामध्ये दोन ते तीन मिनिटे अशा प्रकारे रुग्णाची शुध्द हरपते. थोड्या वेळात रुग्ण आपोआप शुद्धीवर येतो. तर कधीकधी वैद्यकीय इमर्जन्सीचीही गरज पडू शकते. 10-15 मिनिटे होऊनही जर रुग्ण शुद्धीवर आला नाही तर रुग्णास तातडीने दवाखान्यात घेऊन जावे किंवा 108 ह्या क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी.
फिट येणे यावर हे करा घरगुती उपाय :
• डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्यावीत.
• नियमित डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.
• पुरेशी झोप घ्यावी.
• मनशांत ठेवण्यासाठी योगा, प्राणायाम, ध्यानधारणा करावी.
• नियमित व्यायाम करावा.
• चहा, कॉफी, सिगारेट, बीडी, तंबाखू आणि अल्कोहोल यांचे सेवन करणे टाळा.
• रुग्णाने आपल्या खिशामध्ये आपले नाव, पत्ता, घरातील फोननंबर आणि अपस्मार रुग्ण असल्यासंबंधी माहिती लिहिलेली चिट्टी ठेवावी. या चिट्टीमध्ये फेफरे आल्यास आजूबाजूच्या लोकांनी काय करावे याविषयी ही माहिती लिहिलेली असावी.
हे सुद्धा वाचा..
• मायग्रेन ( अर्धशिशीचा त्रास)
• पित्ताचा त्रास आणि उपाय
Read Marathi language article about Epilepsy symptoms, causes and treatment. Last Medically Reviewed on February 19, 2024 By Dr. Satish Upalkar.