हे आहेत मुतखड्यावरील प्रभावी नैसर्गिक उपचार

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

मुतखड्याचा वेदनादायी त्रास :

मुतखड्याचा त्रास अनेकांना आहे. आपली बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार अशी विविध कारणे याला जबाबदार असतात. मुतखड्याच्या त्रासात पोटात, कंबरेत असह्य वेदना होत असतात.

शरीरातील खनिजे, क्षार, युरिक एसिड यांच्या चयापचय संबंधी विकृतीमुळे मुतखडा होत असतो. लघवीचे प्रमाण कमी झाल्यास आणि लघवीत क्षार, युरिक एसिड या घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडा तयार होतो.

मुतखड्यामुळे पाठीत, ओटीपोटात अतिशय वेदना होतात. लघवी करताना त्रास व जळजळ होते, काहीवेळा लघवीत रक्त येणे, लघवी थुंबून राहिल्यास मळमळ व उलट्या होणे असे त्रास मुतखडा असल्यास होत असतात.

मुतखड्याचे प्रभावी नैसर्गिक उपाय :

ऍपल व्हिनेगर –
दोन चमचे ऍपल व्हिनेगर एक ग्लास मिसळावे व ते मिश्रण जेवणापूर्वी प्यावे. यातील उपयुक्त ऍसिडमुळे मुतखड्याचे बारीक कण होऊन ते निघून जातात.

लिंबु रस आणि ऑलिव्ह ऑईल –
एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा ऑलिव्ह तेल ग्लासभर पाण्यात मिसळून हे मिश्रण प्यावे. मुतखड्यावर हा उपाय खूप फायदेशीर आहे.

डाळिंबाचा रस –
डाळिंबातील उपयुक्त अँटीऑक्सिडेंटमुळे शरीर आणि किडणीतील अपायकारक घटक निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे डाळिंबाचा रस मुतखड्यामध्ये प्रभावी ठरतो. 

तुळस –
तुळशीच्या पानांचा रस मधाबरोबर दररोज घेतल्यास काही दिवसात मुतखड्यापासून सुटका होण्यास मदत होते. तसेच यासाठी तुळशीची ताजी पानेही आपण चावून खाऊ शकता.

पानफुटी –
पानफुटीची दोन पाने सकाळी चावून खाण्यामुळे मुतखड्याचे बारीक कण होऊन लघवीवाटे बाहेर निघून जाण्यास खूप मदत होते.

कुळथाचं कढण –
मुतखडा असल्यास आहारात कुळथाचं कढण किंवा हुलगे जरूर समाविष्ट करावे. कुळीथाचे कढण पिण्यामुळे मुतखडा बारीक होऊन पडून जातो.

कांद्याचा रस –
दररोज सकाळी अनशापोटी कांदा किसून त्याचा चमचाभर रस नियमित सेवन केल्यास मूतखड्याचे बारीक कण होऊन ते लघवीवाटे निघून जातात.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

शहाळ्याचे पाणी –
मुतखड्याचा त्रास असल्यास आहारात शहाळ्याचे पाणी जरूर असावे. यामुळे लघवीचे प्रमाण वाढून मुतखडे विरघळून निघून जाण्यास मदत होते.

पाणी –
किडनीमध्ये मुतखडे होण्यापासून दूर ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भरपूर पाणी पिणे. यासाठी दिवसभरात 10-12 ग्लास पाणी प्यावे. यामुळे लघवीला साफ होऊन मुतखडे धरणार नाहीत.

मुतखड्याचा विपरीत परिणाम आपल्या किडनीच्या कार्यावरही होऊ शकतो यासाठी मुतखडा त्रासावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते. मुतखड्यावरील आयुर्वेदिक उपचार विषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.