चेहऱ्यावरील चरबी कमी करणे –
चेहऱ्यावरील चरबी किंवा फुगलेले गाल यामुळे चेहरा चांगला दिसत नाही. यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते तसेच आपण जास्त वयस्करही वाटत असतो. चेहऱ्यावरील चरबीची समस्या बऱ्याच लोकांना भेडसावत असते.
चेहऱ्यावर चरबी का व कशामुळे वाढते ..?
आपल्या चेहऱ्याभोवतीचा भाग हा खूप मऊ असतो. त्यामुळेच पोट आणि कंबरेनंतर बहुतेक चरबी ही चेहऱ्यावर साठत असते. चेहऱ्यावर चरबी वाढण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
- बैठी जीवनशैली व व्यायामाचा अभाव,
- लठ्ठपणा,
- अनुवांशिकता,
- चुकीचे खानपान,
- तेलकट, खारट व चरबीयुक्त पदार्थ खाण्याची सवय,
- अल्कोहोलचे अतिसेवन,
- डिहायड्रेशन,
- अपुरी झोप,
- थायरॉईड हार्मोन्सची कमतरता असणे,
अशा अनेक कारणांमुळे चेहऱ्यावर अधिक चरबी वाढत असते.
चेहऱ्यावरील चरबी कशी कमी करावी ..?
हेल्दी लाईफस्टाईलचा अंगीकार केल्यास म्हणजे नियमित व्यायाम करणे, योग्य आहार घेणे, पुरेशी झोप घेणे, व्यसनांपासून दूर राहणे अशा गोष्टीचे पालन केल्यास शरीराच्या बऱ्याच तक्रारी दूर होतील तसेच चेहऱ्यावर अतिरिक्त चरबीही वाढणार नाही. अशाप्रकारे आपण हेल्दी लाईफस्टाईलचा अंगीकार करून चेहऱ्यावरील चरबी कमी करू शकता. चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहार व विहारमध्ये योग्य बदल करावे लागतील.
चेहऱ्यावरील चरबी कमी करण्याचे उपाय –
1) चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी चरबी वाढवणारे पदार्थ खाणे टाळावे.
चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी तेलकट, चरबी वाढवणारे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, मिठाई, सोडियमयुक्त खारट पदार्थ, जंकफूड, फास्टफूड खाणे टाळावे. आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे.
2) चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी योग्य आहार घ्यावा.
आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, ताजी फळे, सुखामेवा, ग्रीन टी, धान्ये, कडधान्ये, दूध, दही, ताक, अंड्याचा पांढरा भाग, मांस, मासे असे पदार्थ आहारात असावेत. म्हणजे आहारातून शरीराला फायबर्स, प्रोटीन्स, हेल्दी फॅट, कॅल्शियम, व्हिटॅमिन, खनिजे अशा उपयुक्त पोषक घटकांचा पुरवठा होईल व शरीरातील चरबीही आटोक्यात राहील.
3) चेहऱ्यावरील चरबी कमी होण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे.
दिवसभरात किमान सात ते आठ ग्लास पाणी प्यावे. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास डिहायड्रेशनची स्थिती निर्माण होते. डिहायड्रेशनमुळेही चेहऱ्यावर चरबी अधिक जमा होऊ लागते. यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.
4) चेहऱ्यावरील चरबी कमी घालवण्यासाठी व्यसनांपासून दूर राहा.
दारू, अल्कोहोल, सिगारेट अशा व्यसनांमुळे चेहऱ्यावर चरबी अधिक वाढू लागते. कारण अल्कोहोलमुळे शरीर डिहायड्रेट होते आणि पाण्याअभावी शरीरात विविध भागात चरबी जमा होऊ लागते. त्यामुळे चेहऱ्यावरील चरबी कमी करायची असल्यास अशा प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहावे.
5) चेहऱ्यावरची चरबी जाण्यासाठी नियमित व्यायाम करावा.
नियमित व्यायाम केल्याने शरीरातील तसेच चेहऱ्यावरील चरबी कमी होते. यासाठी दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. व्यायामात चालणे, पळणे, मैदानी खेळ, दोरीउडी, पायऱ्या चढणे, सायकलिंग, पोहणे, झुम्बा डान्स असे व्यायाम करू शकता. नियमित व्यायामाने अतिरिक्त चरबी बर्न होते, स्नायू बळकट होतात तसेच शरीरातील रक्तप्रवाहही सुधारतो. त्यामुळे चेहऱ्यावरील चरबी घालवण्यासाठी नियमित व्यायाम करावा.
6) चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी पुरेशी झोप घ्या.
झोपेच्या अभावामुळे शरीराचा ताण वाढतो. ह्याचा परिणाम रक्ताभिसरणावर होत असतो त्यामुळे चेहऱ्यासह शरीरात चरबी जमा होऊ लागते. त्यामुळे दररोज किमान 6 ते 8 तासांची झोप घ्यावी.
7) चेहऱ्यावरील चरबी घालवण्यासाठी चेहऱ्यावर मालिश करा.
चेहऱ्यावर मालिश केल्यामुळे चेहऱ्यावरील रक्ताभिसरण वाढते, चेहऱ्याचे स्नायू बळकट होतात आणि तेथे जमा झालेली चरबी बर्न होण्यास मदत होते. चेहऱ्यावरील चरबी जाण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर मुलतानी मातीचा लेप लावून चेहऱ्याला योग्य प्रकारे मालिश करा. हा मुलतानी मातीचा घरगुती उपाय आठवड्यातून दोनदा करावा.
8) चेहऱ्यावरची चरबी कमी होण्यासाठी चेहऱ्यावर गरम पाण्यात भिजलेला टॉवेल ठेवा.
चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी गरम पाण्यात टॉवेल बुडवून तो टॉवेल पिळून घ्यावा. आणि तो टॉवेल आपल्या चेहऱ्यावर काही वेळ ठेवावा. यामुळे चेहऱ्यावर घाम येऊन अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी व्यायाम –
1) तोंडात हवा साठवून ठेवण्याचा व्यायाम –
तोंडात हवा साठवून आपले गाल फुगवून काहीवेळ रोखून धरावेत. तसेच आपण तोंडात कोमट पाणी भरूनही काहीवेळ रोखून ठेऊ शकता. यामुळेही चेहऱ्याचे स्नायू बळकट होण्यास मदत होते.
2) O आणि E ह्या अक्षरांचा व्यायाम –
तोंडातून ’O’ आणि ‘E’ ह्या अक्षरांचा उच्चार करावा. यामुळेही चेहऱ्याचे स्नायू ताणले जातात आणि ह्या व्यायामाने चेहऱ्यावरील चरबी कमी होण्यासाठी मदत होते.
3) नेक रोल व्यायाम –
ताट बसून आपली मान उजवीकडे वळवून खांद्याला ठेकवावी. त्यानंतर आपल्या हनुवटीचा उजव्या खांद्याला स्पर्श करावा. त्यानंतर पुन्हा मान सरळ करून हीच कृती डावीकडेही करावी. या नेक रोल व्यायामाने डोके आणि चेहऱ्याकडील रक्ताभिसरण व्यवस्थित होते. तेथील मांसपेशी ताणल्या जातात. त्यामुळे हा व्यायाम केल्याने चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी मदत होते.
अशाप्रकारे योग्य आहार, नियमित व्यायाम यांचा आपल्या लाईफस्टाईल मध्ये समावेश करून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी करू शकता. यामुळे तुमचा चेहरा अधिक आकर्षक होण्यास निश्चितच मदत होईल.
हे सुध्दा वाचा → चेहऱ्यावरील वांग घालवण्याचे उपाय जाणून घ्या.
Read Marathi language article about Diet, Exercise and Home remedies to reduce Facial fat. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.